आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारातील घसरणीचा कालखंड अद्याप सुरूच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलग सात दिवसांच्या घसरणीनंतर मंगळवारी शेअर बाजार मोठ्या चढ-उतारानंतर वाढीसह बंद झाला. यात फंड आणि संस्थांकडून खालच्या पातळीवर खरेदी झाल्याने ही वाढ नोंदवता आली. सध्या बाजारातील कल तलवारीच्या धारेप्रमाणे आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकांत आम आदमी पार्टीचा मोठा विजय झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेवर स्वार होऊन भाजप विजयाचे स्वप्न पाहत होता. या मोठ्या राजकीय उलथापालथीमुळे गुंतवणूकदारांत निरुत्साह दिसला तरीही गुंतवणूकदारांनी अर्थसंकल्पापर्यंत प्रतीक्षा करणे योग्य मानले. त्यामुळेच खालच्या स्तरावर बाजारात खरेदी दिसून आली. आता सर्वांची नजर अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडून येत्या २८ तारखेला सादर होणा-या केंद्रीय अर्थसंकल्पावर आहे. त्यात अर्थमंत्री भांडवली खर्चात वाढ करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच खराब कामगिरी करत असलेल्या मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राला चांगल्या सवलती जाहीर होण्याची शक्यता आहे. व्यापकदृष्ट्या बाजारात अंडरटोन सतर्कता आहे. याबरोबरच आणखी घसरणीचा मार्गही मोकळा आहे.

जागतिक पातळीवर ग्रीस युरोझोनमधून बाहेर पडण्याच्या तयारीत असून चीनमधील कमकुवत आर्थिक आकडेवारीने दबाव निर्माण झाला आहे. ग्रीसचे पंतप्रधान एलेक्सिस सिप्रास यांनी रविवारी सांगितले की, आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सल्ल्यानुसार ते खर्चात कपात करणार नाहीत. यामुळे ग्रीसला आंतरराष्ट्रीय स्तरावरून मदत मिळण्याचे मार्ग बंद होण्याची शक्यता आहे. तसेच सिप्रास यांनी स्वत:ला युरोपातील इतर सहकार्याच्या विरोधी असल्याचे वातावरण तयार केले आहे. या संदर्भात जर्मनीने यापूर्वीच ग्रीसला इशारा दिला आहे. ग्रीस युरोझोनच्या बाहेर पडल्यास पर्वा नसल्याचे जर्मनीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ग्रीस युरोझाेनमधून बाहेर पडण्याच्या शक्यतेने युरोप आणि अमेरिकेच्या शेअर बाजारात पडझड सुरू झाली आहे. दुसरीकडे, चीनमध्ये जानेवारीतील औद्योगिक हालचालींची गती मंदावली आहे. वार्षिक तुलनेत निर्यात ३.३ टक्क्यांनी घसरली आहे, तर आयात १९.९ टक्क्यांनी घटली आहे. तज्ज्ञांच्या अपेक्षेपेक्षा हे अत्यंत कमी आहे. यात चीनच्या अर्थव्यवस्थेतील सुस्ती दिसून येते. एकंदरीत जागतिक वातावरणात सतर्कता दिसते आहे. आगामी काळात जगातील प्रमुख शेअर बाजारात आक्रमकतेचा अभाव राहील.

देशातील आघाडीबाबत सांगायचे झाले तर बाजारातील घसरणीचा कालखंड अद्याप संपलेला नाही. निफ्टीला सध्यातरी ८४७१ च्या आसपास चांगला आधार आहे. मात्र, हा फारसा तगडा नाही. निफ्टीला ८३५५ अंकांच्या आसपास तगडा आधार मिळण्याची शक्यता आहे. यापेक्षा जास्त घसरण येईल असे मला वाटत नाही आणि नजर ठेवण्यासाठी हे स्तर उपयुक्त ठरतील.
निफ्टीला वरच्या दिशेने ८६४६ वर अडसर होईल. हा एक मध्यम स्वरूपाचा आधार आहे. या स्तराच्या पार निघाल्यास पुढील अडथला ८७१७ या पातळीवर होण्याची शक्यता आहे. हा एक तगडा अडथळा असून त्यावर बारकाईने नजर ठेवायला हवी. व्यापक दृष्टीने सांगायचे झाल्यास निफ्टी ८३५५ ते ८७१७ या कक्षेत फिरण्याची शक्यता जास्त आहे. समभागांबाबत या आठवड्यात एचडीएफसी लिमिटेड आणि टीव्हीएस मोटर्स लिमिटेड चार्टवर उत्तम दिसताहेत. एचडीएफसीचा सध्याचा बंद भाव १,२४६.१५ रुपये आहे. त्याचे पुढील टार्गेट १,२७२ रुपये आणि स्टॉप लॉस १,१९८ रुपये आहे. टीव्हीएस मोटर्सचा सध्याचा बंद भाव २९५.४० रुपये आहे. त्याचे पुढील लक्ष्य ३०१ रुपये आणि स्टॉप लॉस २८७ रुपये आहे.

लेखक तांत्रिक विश्लेषक व moneyvistas.com चे सीईओ आहेत. vipul.verma@dbcorp.in