आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Come Forward For Nations Development Narendra Modi

देशातील उद्योजक तरुणाईला पंतप्रधान नरेंद्र मोदींची साद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - तुमचे कौशल्य, बुद्धिवैभव यांना तंत्रज्ञानाची जोड देऊन जगभरचा पैसा खेचू शकता. जगात सर्वाधिक वेगाने आपली अर्थव्यवस्था वाढत आहे. त्यामुळे जगातील उद्योगविश्वाचे लक्ष आपल्यावर केंद्रित झाले आहे. या पार्श्वभूमीवर देशाच्या विकासासाठी तरुणाईने पुढे यावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे केले.

जीई कंपनीच्या चाकण येथील प्रकल्पाचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते झाले. या वेळी राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार आढळराव पाटील तसेच जीई कंपनीचे उपाध्यक्ष जॉन राईस उपस्थित होते. मोदी म्हणाले, ‘शेती, सेवा आणि कौशल्याधारित उत्पादने या तीन क्षेत्रांत विकासाच्या प्रचंड क्षमता आहेत. तरुणाईने या क्षेत्रांत काम करावे.

देशाच्या विकासाच्या धोरणातही युवावर्ग हाच केंद्रस्थानी असणार आहे.’ उद्योजकांना उद्देशून मोदी म्हणाले, ‘भारतात व्यवसाय, उद्योग, व्यापार करणे अधिक सोयीचे व सुलभ व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सध्या उद्योगांसाठी सुमारे ११० परवाने घेणे अनिवार्य आहे, हे प्रमाण २० पर्यंत कमी करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. ‘मेक इन इंडिया’अंतर्गत जीई कंपनीने भारतात जहाजबांधणी प्रकल्प उभारावा.

दुसरा टप्पाही दृष्टिपथात : राइस
जीई कंपनीने चाकण येथील प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात १२०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. प्रकल्पाचा दुसरा टप्पाही दृष्टिपथात आहे. त्यासाठी आणखी ४०० कोटी रुपये गुंतवले जाणार आहेत. सुमारे दीड हजार लोकांना थेट रोजगार मिळाला आहे. कंपनीने या प्रकल्पासाठी ६८ एकर जागा घेतली आहे. एकाच प्रकल्पात अनेक उत्पादनांची निर्मिती असणारा कंपनीचा हा एकमेव प्रकल्प आहे. भारताची अर्थव्यवस्था ७.४ टक्के दराने वेगाने विकसित होत आहे. त्यामुळे जगभरातील उद्योगविश्वाचे लक्ष भारताने आकर्षून घेतले आहे, असे उद्गार कंपनीचे उपाध्यक्ष जॉन राइस यांनी पत्रकारांशी बोलताना काढले.