आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Coming Period Pharmacutical Industry Get Growth Dose

येणा-या काळात औषध उद्योगाला मिळणारा वृध्‍दीचा मोठा डोस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - देशातील औषधांच्या निर्यातीमध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाने (एमएसएमई) 35 हजार कोटी रुपयांच्या उलाढालीसह देशातील उत्पादनामध्ये जवळपास 35 ते 40 टक्के योगदान दिले आहे. त्यामुळे औषध उद्योगाला येणा-या काळात या क्षेत्राकडून वृद्धीचा मोठा ‘डोस’ मिळण्याचा अंदाज इंडिया मायक्रो या एसएमएसई क्षेत्रातील दिग्गज उद्योगाच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.


2006 - 2007 मध्ये 6.23 अब्ज डॉलरची असलेली देशातील औषधी उत्पादनांची निर्यात 21.25 टक्के संकलित वार्षिक वाढीची नोंद करीत 2012 - 13 या वर्षात 8.7 अब्ज डॉलरवर गेली. निर्यातीची ही भरारी लक्षात घेऊन वाणिज्य मंत्रालयाने औषध क्षेत्राला निर्यातीसाठी 25 टक्के वार्षिक वाढीसह 2014 पर्यंत 25 अब्ज डॉलरच्या निर्यातीचे लक्ष्य समोर ठेवले आहे.


भारतीय औषध उद्योगाच्या वाढीसाठी एमएसएमई क्षेत्राचे कार्य अमूल्य असून हे क्षेत्र औषध उद्योगाचा एक अविभाज्य भाग झाला आहे. औषध उद्योग मोठ्या प्रमाणावर विखुरलेला असला तरी एसएमई क्षेत्रात अंदाजे 9 हजार 456 विभाग असून त्यांचे औषध उत्पादनांमध्ये जवळपास 87 टक्के, तर मूल्य स्वरूपात 40 टक्के योगदान असल्याचे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग अहवालात म्हटले आहे.


औषधी उत्पादनांच्या निर्मात्यांची संख्या आणि रोजगार निर्मितीमध्येदेखील एसएमई क्षेत्र आघाडीवर असून देशातील एकूण औषध निर्यातीमध्येदेखील या क्षेत्राने 48 टक्के वाटा कायम ठेवला असल्याचे या अहवालात म्हटले आहे. मोठ्या औषध कंपन्यांच्या साखळ्यांसाठी आवश्यक भाग आहे. त्यामुळे देशातील औषध क्षेत्राला एसएमईमुळे बळकटी मिळत आहे. औषध क्षेत्रात एकूण 24 हजार नोंदणीकृत विभाग असून त्यांच्यामुळे देशातील जवळपास 70 टक्के औषधांची गरज भागवली जाते. त्यामुळे देशातील औषध क्षेत्रात कार्यरत असलेला सूक्ष्म, लघु आणि मध्यम क्षेत्र हे ख-या अर्थाने पाठीचा कणा ठरत आहे.


लघु आणि मध्यम उद्योगातील औषध उत्पादक कंपन्या या बव्हंशी स्थानिक बाजारपेठांसाठी काम करतात आणि प्रामुख्याने ते मोठ्या प्रमाणावर उपयोगात येणा-या औषधांशी निगडित फॉर्म्युलेशन्सची निर्मिती करतात; परंतु या उद्योगाने आपले अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी या क्षेत्रातील कंपन्यांनी बदलत्या व्यावसायिक स्वरूपानुसार आपल्यामध्येदेखील झटपट बदल घडवून आणणे गरजेचे असल्याकडे या अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे.


सुटसुटीत धोरण हवे
बहुतांश वेळी ‘एमएसएमई’ क्षेत्राकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आज अनेक कंपन्यांना तग धरून राहणे कठीण झाले आहे. कडक नियम, अपुरा आर्थिक पुरवठा, जागतिक बाजारपेठेत शिरकाव करण्यास मर्यादा, वाजवी खर्चात औषध उपलब्ध करून देण्याची अन्य देशांकडून वाढती स्पर्धा आदी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अन्य विकसनशील देशांमधील सर्वाधिक उत्पादन नोंदणी शुल्कदेखील या क्षेत्राकडून केल्या जाणा-या निर्यातीच्या आड येत आहे. आर.बी. स्मार्टा, एम.डी, इंटरलिंक मार्केटिंग कन्सल्टन्सी.