आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Commerc Minister Sharma Tell, 500 Tone Gold Put In Morga

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाणिज्यमंत्री शर्मा म्हणतात, 500 टन सोने गहाण ठेवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - चालू खात्यातील तूट कमी कशी करावी, असा गहन प्रश्न केंद्र सरकारला पडला आहे. आता त्यावर उपाय म्हणून वाणिज्यमंत्री आनंद शर्मा यांनी ‘सोने गहाण’ ठेवण्याची नवीन कल्पना मांडली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सध्याच्या किमतीनुसार जर 500 टन सोने गहाण ठेवले तर चालू खात्यातील तूट भरून काढण्यास मोठी मदत होऊ शकेल.


देशामध्ये 31 हजार टन सोन्याचा साठा असल्याचे जाहीर झाले आहे. हे लक्षात घेता देशातील सोने सध्याच्या परिस्थितीत काय करता येऊ शकेल याबाबत बॅँक सचिव, बँका आणि रिझर्व्ह बॅँकेने विचार करावा. बाजारातील आजच्या मूल्यानुसार देशातील 500 टन सोने जरी गहाण ठेवले तरी चालू खात्यातील तूट भरून काढण्यास मदत होऊ शकेल, असे मत शर्मा यांनी व्यापार मंडळाच्या बैठकीत बोलताना व्यक्त केले.


सोने तारण ठेवण्याचा निर्णय मी घेऊ शकत नाही, परंतु आपण केवळ त्या दिशेने कल्पना मांडली आहे. सोने तारण ठेवण्याबाबत आपण काही करू शकतो का, तर माझ्या मते करू शकतो. कारण सध्याच्या परिस्थितीत काही तरी वेगळा विचार करणे गरजेचे आहे.


बाजारातील सध्याच्या मूल्यानुसार 500 टन सोन्याची किंमत 25 अब्ज डॉलर होते. एप्रिल ते जून या कालावधीत जागतिक पातळीवरील सोन्याच्या मागणीत अगोदरच्या वर्षाच्या तुलनेत 12 टक्क्यांनी घट होऊन ती 856 टनांवर आली असल्याचे जागतिक सुवर्ण परिषदेने 15 ऑगस्टला जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे.


चालू आर्थिक वर्षात चालू खात्यातील तूट 3.7 टक्क्यांपर्यंत किंवा जीडीपीच्या तुलनेत 70 अब्ज डॉलरपर्यंत नियंत्रित करण्याचे लक्ष ठेवले आहे, परंतु वस्तू आणि सेवांचे वाढलेले आयातीचे प्रमाण लक्षात घेता मागील वर्षी आर्थिक वर्षात चालू खात्यातील तूट जीडीपीच्या तुलनेत 4.8 टक्के किंवा 88.2 अब्ज डॉलर अशा विक्रमी पातळीपर्यंत गेली होती.


सोन्याच्या आयातीने चिंतेत भर
वाढत्या आयातीमुळे विशेष करून तेल आणि सोन्यामुळे चालू खात्यातील तूट मोठ्या प्रमाणावर फुगली आहे. यंदाच्या एप्रिल ते जुलै या कालावधीत सोन्याची आयात 87 टक्क्यांनी वाढून ती 383 टनांवर गेली. त्यानंतर जूनमध्ये या आयातीने घसरणीचा सूर लावला होता, परंतु जुलै महिन्यात सोन्याची आयात पुन्हा 47 टनांनी वाढली. त्या अगोदरच्या महिन्यात ही आयात 31 टन झाली होती. सोन्याच्या वाढत्या आयातीला लगाम घालण्यासाठी केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅँकेने कडक उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अलीकडेच सोन्यावरील सीमा शुल्कात 10 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला.