आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Competition Commission Give Inquary Order Against DLF

स्पर्धा आयोगाकडून डीएलएफच्या चौकशीचे आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - रिअल इस्टेट क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी कंपनी डीएलएफ लिमिटेडच्या विरोधात दोन दिवसांत तपास करण्याचे आदेश स्पर्धा आयोगाने (सीसीआय) दिले आहेत. बाजारातील स्वत:च्या उत्तम स्थितीचा लाभ उचलल्याचा आरोप डीएलएफवर आहे. गुडगाव येथे निवासी संकुल बांधणे व त्याची विक्री करण्याच्या प्रकरणी हे आदेश देण्यात आले आहेत.
या प्रकरणात डीएलएफ युनिव्हर्सल लिमिटेडने उचित व्यापारी व्यवहाराचे उल्लंघन केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्याने सीसीआयने हे आदेश जारी केले आहेत. सीसीआयने मंगळवारीही डीएलएफ आणि डीएलएफ न्यू गुडगाव डेव्हलपर्स यांच्याविरोधात चौकशीचे आदेश जारी केले आहेत. यापूर्वी ऑगस्ट २०११ मध्ये डीएलएफ स्पर्धा आयोगाच्या चौकशीच्या फे-यात आलेली आहे. तेव्हा आयोगाने कंपनीवर ६३० कोटींचा भरभक्कम दंड ठोठावला होता. त्यावर कंपनीने स्पर्धा अपिलेट लवादाकडे आव्हान दिले होते. मात्र, लवादाने आयोगाचा निर्णय कायम ठेवला. त्यावर डीएलएफने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

पीई फंडांतून उभे करणार ३००० कोटी :
डीएलएफने काही प्रकल्पांतील हिस्सेदारी खासगी इक्विटी कंपन्यांना विकण्याचा निर्णय घेतला असून त्याद्वारे ३००० कोटी रुपयांची उभारणी करण्याची कंपनीची योजना आहे. तसेच कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी तसेच रोकड स्थिती सुधारणेसाठी कंपनीने दोन रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (आरईआयटी) सादर करण्याची तयारी केली आहे. भांडवल उभारणीसाठी कंपनीने जेपी मॉर्गन आणि मॉर्गन स्टॅनली यांना सल्लागार नियुक्त केले आहे.

मागील तिमाहीत कर्ज ४०० कोटींनी वाढले
चालू आर्थिक वर्षात ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाहीत डीएलएफच्या कर्जात सुमारे ४०० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. कंपनीवरील एकूण कर्ज आता २०,३३६ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. जुलै ते सप्टेंबर तिमाहीत हे कर्ज १९,९४३ कोटी रुपये होते. गुंतवणूकदारांसाठी बनवण्यात आलेल्या माहितीपत्रकात कंपनीने ही माहिती दिली आहे.