आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगणकामुळे अलीकडे वित्त भांडवल झाले अतिशय चंचल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

65 हजार कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक बाजारातून काढून घेतल्याने सेन्सेक्स 500 अंकांनी खाली आला :
1991 मध्ये अंगीकारलेल्या खाउजा धोरणामुळे काही काळ परकीय भांडवलदारांनी भारतात गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढले. ते डॉलर देऊन व त्या बदल्यात रुपये घेऊन भारतात जमीन खरेदी करत, कच्चा माल विकत घेत, मजुरी देत. त्यामुळे डॉलर या परकीय चलनाचा आपला साठा त्या वेळी वाढला, पण ते भांडवल आज ना उद्या परत जाणारच होते. कारण परकीय भांडवल हे परकीय कर्जच असते, कर्ज परत होते. त्या वेळी परकीय चलनसाठा कमी होणार. आता तसे घडू लागले आहे. अमेरिकेतील मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिझर्व्हने 2008 च्या मंदीच्या फटक्याची तीव्रता कमी व्हावी यासाठी कारखानदारांना सवलतीवर कर्जे देणे सुरू केले होते. आता ते आखडते घेतले आहे. त्यामुळे अमेरिकन व इतर परदेशी कारखानदारांना त्यांच्या तिथल्या व्यवहारासाठी भारतातील गुंतवणूक कमी करून पैसा मायदेशी न्यावा लागत आहे. आॅगस्ट 2013 च्या चौथ्या आठवड्यात एक अब्ज डॉलर म्हणजे 65000 कोटी रुपये भारताच्या बाजारातून काढून घेतले गेले. त्यामुळे शेअर बाजारात खरेदी कमी व विक्री जास्त झाली. सेन्सेक्स हा निर्देशांक साडेपाचशे अंकांनी घसरला. अलीकडे संगणकामुळे एका देशातील फार मोठी रक्कम शेअर बाजारातील खेळाडू दुस-या देशात एका क्षणात पोहोचतात. वित्त भांडवल हे अतिशय चंचल झाले आहे. त्यांच्या तसल्या खेळामुळे 1995-96 मध्ये थायलंड, फिलिपाइन्स, इंडोनेशिया आदी आशियाई वाघ म्हणून ओळखल्या गेलेल्या देशांत गंभीर आर्थिक संकटे ओढवली होती. राजकीय उलथापालथही झाली.


सेन्सेक्स कोसळला तर अर्थव्यवस्था कोसळली असे नसतेच :
सेन्सेक्सच्या आकड्याला प्रसारमाध्यमे खूप महत्त्व देतात. पण तो आकडा फक्त शेअर्सच्या खरेदी-विक्रीची त्या दिवसाची स्थिती काय होती ते सांगतो. देशातील उद्योग-व्यवसायातील गुंतवणूक किंवा उत्पादन याच्याशी त्याचा काही संबंध नाही. त्या दिवशी ज्या कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी कमी झाली त्यांचे उत्पादन घटले असाही त्याचा अर्थ नाही. 2004 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले, काँग्रेसप्रणीत यूपीएला बहुमत मिळाले. सोनिया गांधींची नेतेपदी निवड झाली. मात्र, भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनी त्यास तीव्र विरोध केला. त्या वेळी देशात गोंधळ होईल अशी शंका येऊन शेअर बाजारात खरेदी एकदम कमी व विक्री भरमसाट झाली. त्या दिवशीही सेन्सेक्स असाच पाचशे अंशांनी घसरला होता. शेअर्सची खरेदी-विक्री ही अर्थव्यवस्थेची सुदृढता व दुबळेपणा दाखवत नसून चटकन खूप पैसा कमावू इच्छिणा-यांच्या मनातील भावना दाखवतात. सेन्सेक्स कोसळला तर अर्थव्यवस्था कोसळली असे मानण्याचे कारण नाही. यंदा मान्सून चांगला झाल्याने शेतीचे उत्पादन चांगले येणार असे दिसते. पण शेतीची किंवा शेतमालाची खरेदी-विक्री शेअर बाजारात होत नाही. सेन्सेक्स घसरला तरी शेती व त्याआधारित वस्तूंचे उत्पादन वाढणारच आहे. साखरेचे उत्पादन तर कितीतरी वाढून 75 लाख टनांची पातळी ओलांडेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. सेन्सेक्सच्या हेलकाव्यामुळे प्रसारमाध्यमात घबराट पसरते कारण त्यांना सम्यक अर्थव्यवस्थेचे दर्शन घेण्याची सवय नाही.


परकीय चलनाबाबतही विनाकारण गैरसमज :
परकीय चलनाचा साठा कमी झाला तर अनर्थ ओढवेल व वाढला तर सुबत्तेचा स्वर्ग गाठला जाईल असे मानणे हा भ्रम आहे. परकीय कर्जे जास्त आल्याने परकीय चलनाचा साठा त्या वेळी वाढेल. कारण ती कर्जे डॉलरमध्ये आली व देशात रुपयात खर्च झाली. पण तो साठा तसा वाढणे हे अतिशय चिंताजनक आहे देशावरील परकीय कर्जाचा बोजा वाढणे हे चिंताजनक आहे हे कोण नाकारील?


परकीय कर्जाचा बोजा कमी होणे हे चांगलेच :
परदेशी कर्जे फेडली गेली तर रुपया जास्त जाऊन डॉलरचा साठा कमी होईल. काही काळ परकीय चलनाची तंगी जाणवेलही. पण लांबचा विचार करता देशावरील परकीय कर्जाचा बोजा कमी होणे हे चांगले झाले म्हणायचे.


कमी निर्यात हेच रुपया घसरणीचे कारण आहे, अर्थव्यवस्था हे नव्हे :
रुपयाची घसरण ही भारतीय अर्थव्यवस्था गडबडल्यामुळे झाली असे नाही. त्याचे मुख्य कारण आपण आपल्या निर्यातीपेक्षा आयात खूप जास्त करतो आहोत. हे आहे. म्हणून रुपयाची घसरण थांबवण्यासाठी खरा उपाय करायचा तो नजीकच्या काळात आयात कपातीचा व लांबच्या पल्ल्यात निर्यात वाढवायचा.