ग्राहकांचे समाधान हीच / ग्राहकांचे समाधान हीच यशाची किल्ली

May 05,2013 09:02:00 AM IST

भारतीय कार बाजारात गेल्या पाच वर्षांत तीन जर्मन कार निर्माता कंपन्यांत जोरदार स्पर्धा दिसून येत आहे. बीएमडब्ल्यू कंपनीने 2009 मध्ये मर्सिडीझला पहिल्या स्थानावरून खाली खेचले होते. तेव्हापासून बीएमडब्ल्यू अग्रस्थानी कायम आहे. मात्र, गेल्या 15 महिन्यांपासून ऑडीने बीएमडब्ल्यू समोर कडवे आव्हान उभे केले आहे. ताज्या आकडेवारीनुसार ऑडीने बीएमडब्ल्यूला दुसर्‍या स्थानावर ढकलून अग्रस्थान पटकावले आहे.

ऑडीने यंदाच्या जानेवारी ते मार्च या तिमाहीतील वाहन विक्रीचे आकडे जाहीर केलेले नाहीत. अहवालानुसार बीएमडब्ल्यू इंडियाने 2013 च्या पहिल्या तिमाहीत 1465 कारची विक्री केली. यात बीएमडब्ल्यू ब्रँडच्या 1410 कार आणि मिनी ब्रँडच्या 55 कारचा समावेश आहे. वर्षापूर्वीच्या याच तिमाहीच्या तुलनेत हे प्रमाण 40 टक्के कमी आहे. तर ऑडीने याच कालावधीत 2616 कारची विक्री करत 15 टक्के वाढ नोंदवली आहे. मर्सिडीझ बेंझने 2009 कारची विक्री करत 5 टक्के वाढ नोंदवली आहे.

चालू आर्थिक वर्षात (2013-14) भारतीय कार बाजारात या तीन लक्झरी कार निर्मात्या कंपन्यांत कडवी स्पर्धा दिसून येईल. तीनही कंपन्यांनी आगामी काळात नवे मॉडेल्स बाजारात आणण्याची योजना आखली आहे. या माध्यमातून या कंपन्या आपले कार्यक्षेत्र विस्तारणार आहेत.

मर्सिडीझ बेंझ लक्झरी कॉम्पॅक्ट कार सेगमेंटमध्ये मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत आहे. मर्सिडीझची पाच मॉडेल्स लवकरच भारतात सादर होणार आहेत. ऑडीने काही दिवसांपूर्वीच आर 8 व्ही 10 हायपर कार सादर केली. या महिन्याच्या प्रारंभी ऑडीने ए-6 चे नवे मॉडेल बाजारात आणले आहे. कंपनी लवकरच क्यू-2 मिनी एसयूव्ही बाजारात आणण्याच्या तयारीत आहे.

भारतात आपापल्या कारची विक्री आणि मार्केटिंग नेटवर्क वाढवण्यावर तीनही कंपन्यांचे खास लक्ष आहे. ऑनलाइन संशोधनानुसार बीएमडब्ल्यूचे उच्च पदस्थ अधिकारी इतर कंपनीच्या कार विक्रीच्या तुलनेत आपल्या कंपन्यांच्या विक्रीबाबत नाराज आहे. कंपनीच्या वितरकांकडून ग्राहकांना समाधानकारक वागणूक मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. ऑडी आणि मर्सिडीझच्या बाबतीत अशा तक्रारींचे प्रमाण अगदी कमी आहे.

या तीनही प्रतिष्ठित कार निर्माता कंपन्यांनी या विशाल बाजारातील इतर प्रतिस्पर्धी कंपन्यांकडून धडा घेण्याची गरज आहे. ग्राहकांचे समाधान लक्षात घेणार्‍या कार कंपन्यांच्याच कारची विक्री भारतीय बाजारात जास्त होते हे या कंपन्यांनी लक्षात घ्यावे. मारुतीपासून ते ह्युंदाईपर्यंत, एवढेच नव्हे, तर टोयोटाचाही यात समावेश केल्यास हीच बाब समोर येते. श्रीमंत आणि विख्यात लोकही जास्त किमतीच्या व किरकोळ दुरुस्तीसाठी अधिक वेळ लावणार्‍या कंपन्यांच्या कार खेरदी करणे टाळतात.

टाटाच्या मालकीची जग्वार लँड रोव्हरदेखील भारतात पाय रोवण्याच्या तयारीत आहे. लक्झरी कार सेगमेंटमधील सीबीयूच्या आयातीवर 75 ते 100 टक्के कस्टम ड्यूटी लावण्यात आली आहे. देशातील मंदावलेली अर्थव्यवस्था, इंधनाच्या वाढत्या किमती आणि रुपयाच्या किमतीतील चढ-उतार पाहता कार निर्मात्या कंपन्यांसाठी अग्रस्थानापर्यंत पोहोचण्याची शर्यत कठीण राहील. तसेच अग्रस्थानी कायम राहणे अवघड राहील. शेवटी ग्राहकांचे समाधान हीच यशस्वितेची किल्ली आहे, हे लक्षात घ्यावे.
(लेखक ब्रिटनस्थित ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील पत्रकार आहेत.)
[email protected]

X