आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रेडिट कार्ड : बँकेकडून ही माहिती मिळायला हवी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रेडिट कार्ड देणा-या बँक किंवा कंपनीने आपल्या कार्डधारकांशी कसा व्यवहार करावा यासंदर्भात बँकिंग कोड्स अँड स्टॅँडर्ड बोर्ड ऑफ इंडियाने (बीसीएसबीआय) काही नियम आखले आहेत. बँक किंवा कंपनीने या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. ज्या वेळी तुम्ही क्रेडिट कार्डसाठी अर्ज कराल त्या वेळी पुढे देण्यात आलेल्या नियमांकडे लक्ष द्या...
सूचना : क्रेडिट कार्ड देणा-यांकडून त्या कार्डसाठीची फी, व्याज, बिलाची पद्धत, पेनल्टी, नूतनीकरण आणि टर्मिनेशन प्रक्रिया या बाबत ग्राहकाला विस्तृत माहिती द्यावी, अशी अपेक्षा आहे. या शिवाय कार्डबाबतची सर्व माहिती असणारे सर्व्हिस गाइड किंवा बुकलेटही द्यावे. ग्राहकाने अर्ज दिल्यानंतर त्याला सर्व अटींची माहिती असणारी एक प्रत द्यावी.
अर्जावर निर्णय कालावधी : कार्ड घेण्याबाबत ग्राहकाने अर्ज दाखल केल्यानंतर त्या अर्जावर किती दिवसांत निर्णय होईल, याची स्पष्ट कल्पना संबंधित बँक किंवा कंपनीने ग्राहकाला देणे अपेक्षित आहे.
ऑनलाइन अलर्ट : पाच हजार किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या इंटरनेट व्यवहाराबाबतची माहिती संबंधित बँक किंवा कंपनीने त्या ग्राहकाला ऑनलाइन किंवा मोबाइलद्वारे कळवणे आवश्यक आहे.
क्रेडिट कार्ड/पिन डिस्पॅच : क्रेडिट कार्ड किंवा पिन आपल्या ई-मेल पत्त्यावर किंवा पर्यायी पत्त्यावर मिळवण्याचा ग्राहकाला हक्क आहे. ग्राहक स्वत: बँकेच्या शाखेत किंवा कंपनी कार्यालयात जाऊन व्यक्तिश: पिन घेऊ शकतो. मात्र, सुरक्षिततेसाठी बँक किंवा कंपनीने पिन नेहमी टपालाने पाठवणे योग्य राहील.
अनुमतीविना कार्ड अ‍ॅक्टिव्हेट करणे : बँक किंवा कंपनीने ग्राहकाची अनुमती न घेता कार्ड अ‍ॅक्टिव्हेट करून बिल पाठवले किंवा फी आकारणी केली, तर अशा प्रकरणात लावण्यात आलेल्या शुल्काच्या दुप्पट रक्कम बँकेने ग्राहकाला द्यावी लागते.
लिमिट घटवण्याची सूचना : एखाद्या ग्राहकाच्या क्रेडिट कार्डवरील लिमिट घटवण्याची सूचना संबंधित ग्राहकाला एसएमएस किंवा ई-मेलद्वारे पाठवणे बँकेकडून अपेक्षित आहे. बँक किंवा कंपनीकडून तशी लेखी सूचना पाठवणे नियमास धरून राहील.
क्रेडिट लिमिट / कर्ज वाढवणे : क्रेडिट लिमिट किंवा कर्जात कोणत्याही स्वरूपातील वाढ करणे यासाठी बॅँक किंवा कंपनीला ग्राहकाची लेखी अनुमती घेणे आवश्यक आहे.
क्रेडिट कार्ड स्टेटमेंट : निर्धारित तारखेला क्रेडिट कार्डचे स्टेटमेंट बँकेने पाठवले पाहिजे. ते ग्राहकाला मिळाले नसल्याची तक्रार आल्यास स्टेटमेंटची प्रत ग्राहकाला देणे.
बदलासाठी नोटीस अवधी : फी, शुल्क आणि अटी यातील बदल, फेरफार मासिक स्टेटमेंटसह किमान एक महिन्याच्या नोटीसनंतर लागू होईल. केवळ व्याज दरातील बदल आणि नियामकाच्या निर्देशानुसार बदल त्या-त्या तारखेपासून लागू होतील.
व्यवहाराचा पुरावा : विवादास्पद व्यवहाराबाबत बँकेने ग्राहकाला मूळ कागदपत्रे दाखवणे बंधनकारक आहे. समजा ग्राहकाला एखाद्या व्यवहाराबाबत आठवत नसेल, माहिती नसेल तर बँकेने त्या ग्राहकाला सर्व माहिती देणे आवश्यक आहे.
क्रेडिट कार्ड देणा-या बँक किंवा कंपनीकडून : व्यवस्थित सेवा मिळते की नाही हे समजण्यासाठी हे नियम उपयुक्त ठरणारे आहेत.
समजा उचित सेवा मिळत नसेल तर बँकिंग लोकपालाकडे त्याबाबत तक्रार करता येते.


लेखक bankbazaar.com चे सीईओ आहेत.