आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रेडिट हिस्ट्री योग्य राखण्यासाठी आवश्यक बाबी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखादी व्यक्ती कर्जाचा वापर आणि परतफेड कशा पद्धतीने करते हे जाणून घेण्यासाठी बँक त्याची क्रेडिट हिस्ट्री तपासते. यासाठी बँका सिबिलच्या ट्रान्सयुनियन स्कोअरचा वापर करतात. सिबिल हे देशातील पहिले क्रेडिट इन्फर्मेशन ब्युरो आहे. त्यांच्याकडे सर्व प्रकारच्या कर्जदारांची माहिती असते. त्यास ते क्रेडिट इन्फर्मेशन अहवालाच्या स्वरूपात आपल्या सदस्य बँका, वित्तीय संस्थांना गरजेनुसार पुरवते.
क्रेडिट स्कोअर म्हणजे काय : एखाद्याची क्रेडिट हिस्ट्री पाहून सिबिल त्याला 300 ते 900 दरम्यान स्कोअर (गुण) देते. हे गुण जेवढे जास्त तेवढी बँकांची कर्ज देण्याची जोखीम कमी. क्रेडिट स्कोअर कमी झाला तर कर्ज मिळण्याची शक्यता कमी होते. अशा स्थितीत बँक जास्त अटी लादू शकते. म्हणजेच, जास्त व्याज दर, जामीनदार आणणे किंवा सुरक्षेच्या दृष्टीने जास्त रक्कम मागू शकते. त्यासाठी क्रेडिट हिस्ट्री बनवणे व ती चांगली ठेवणे महत्त्वाचे आहे. यासाठी आवश्यक आहे...
1. आपल्या क्रेडिट स्कोअरबाबत जागरूक राहा : आपल्या सध्याचा क्रेडिट स्कोअर काय आहे याची माहिती हवी. सिबिलकडे 450 रुपये, ओळखपत्र आणि राहण्याचा पुरावा सादर केल्यानंतर क्रेडिट स्कोअरची माहिती मिळते.
2. सावकाश प्रारंभ करा, हळूहळू गती वाढवा : क्रेडिट स्कोअर प्रोफाइल तयार करण्यासाठी नेहमी सावकाश प्रारंभ करायला हवी. नंतर हळूहळू गती वाढवावी. कमी कालावधीत चार ते पाच क्रेडिट कार्ड घेण्यापेक्षा एकच कार्ड घ्या आणि क्रेडिट लिमिटचा वापर कसा करायचा हे माहिती करून घ्यावे.
3. वेळेवर परतफेड करा : आपल्या सर्व कर्जाचे मासिक हप्ते वेळेवर भरा. आपल्या कर्जाच्या खात्यात फेडीबाबत चूक दिसली तर परतफेडीबाबत आपण सक्षम नाहीत, असे मानले जाईल. तसेच बँकेसाठी जोखमात वाढ होईल.
4. असुरक्षित कर्जाबाबत दक्षता घ्या : क्रेडिट कार्ड किंवा पर्सनल लोन असुरक्षित असतात. यासाठी बँक काहीच सेक्युरिटी ठेवत नाही. सुरक्षित कर्जाच्या तुलनेत या कर्जाच्या परतफेडीतील चूक क्रेडिट स्कोअर कमी करू शकते.
5. क्रेडिट लिमिटचा योग्य वापर हवा : जर एखाद्याने क्रेडिट लिमिटवर खूप उधारी केली असेल तर लिमिटचा जास्त वापर होत असल्याचे मानले जाते. यामुळे क्रेडिट स्कोअर कमी होतो.
6. कर्ज घेण्यावर नियंत्रण हवे : जर अनेक बँकांकडून वेळोवेळी क्रेडिट लिमिट घेतले तर कर्ज घेण्याची प्रवृत्ती जास्त असल्याचे मानले जाते. तसेच उत्पन्नापेक्षा जास्त पैशाची गरज असल्याचे मानण्यात येते. आगामी काळात थकबाकीदार म्हणून याकडे पाहिले जाते.
7. कर्जाचे प्रकार : किती प्रकारचे कर्ज घेतले आहे याची माहिती सिबिल घेते. विविध प्रकारच्या कर्जाचे प्रमाण योग्य राखले आहे की नाही हेही सिबिल पाहते.
8. काही प्रमाणात क्रेडिट आवश्यक : देणेदारांचे देणे कसे फेडायचे याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी काही क्रेडिट असणे आवश्यक आहे. हे नसल्यास बँक कर्ज देण्यास मागे-पुढे पाहतात.
9. वेळेपूर्वी कर्ज फेडण्याचा प्रयत्न करा : एकरकमी मोठी रक्कम हाती आल्यास कर्ज फेडण्याचा विचार करा. असे केल्याने क्रेडिटचा योग्य वापर केल्याचे मानले जाते.
10. क्रेडिट हिस्ट्रीचे परीक्षण करा : एक चांगली क्रेडिट हिस्ट्री तयार करणे एखादी इमारत उभी करण्यासारखे आहे. आपल्या क्रेडिट स्कोअरचे नियमित परीक्षण करा.
एक चांगली आणि मजबूत क्रेडिट हिस्ट्री कर्ज सुलभरीत्या व लवकर मिळण्यासाठी सहायक ठरते. क्रेडिट हिस्ट्री मजबूत ठेवण्यासाठी कर्ज आणि उधारीवर नेहमी नियंत्रण ठेवायला हवे.

adhil.shetty@dainikbhaskargroup.co
(लेखक bankbazaar.com चे सीईओ आहेत.)