आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘क्रॉसवर्ड’ लवकरच धारण करणार ‘डिजिटल’ अवतार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - वाचनप्रेमींच्या हातातून पुस्तक सुटणे तसे सहजासहजी शक्य नाही, पण इ-बुक, टॅब्लेट, आयपॅडवर ऑनलाइन खरेदीचे प्रमाण वाढल्याने गेल्या तीन वर्षात दुकानातील पुस्तक विक्री जवळपास 15 ते 20 टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे या ऑनलाइन स्पर्धेत टिकून राहण्यासाठी ‘क्रॉसवर्ड’ या आघाडीच्या दुकानाने आता डिजिटल बुक डाऊनलोडिंगकडे आपला मोर्चा वळवण्यासाठी तयारी सुरू केली आहे.


अन्य देशांच्या तुलनेत भारतात डिजिटल बुक डाऊनलोडिंगचे प्रमाण जास्त नाही, परंतु पुढील तीन ते चार वर्षात मात्र हे प्रमाण वाढणार आहे. त्यादृष्टीने आतापासूनच तयारी सुरू केली असून सगळ्या प्रकाशकांकडून हक्क घेण्यात येणार आहेत. कंपनीची वेबसाइट वा अन्य माध्यमांद्वारे आमच्या ग्राहकांना डिजिटल बुक डाऊनलोडिंग कसे करता येईल याचा विचार करीत असल्याचे शॉपर्स स्टॉप लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक गोविंद श्रीखंडे यांनी खास ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.


क्रॉसवर्ड बुक स्टोअर हे शॉपर्स स्टॉपचे लाइफस्टाइल प्रकारातील पुस्तक विक्रीचे खास दुकान असून या ठिकाणी मासिके, सीडी, संगीत, लेखन साहित्य आणि खेळण्यांची विक्री केली जाते. कंपनीची देशभरात 80 दुकाने असून त्यातील अर्धी दुकाने शॉपर्स स्टॉपच्या मालकीची आहेत.


देशात बहुतांश पुस्तकांची विक्री ही अद्याप पारंपरिक पुस्तकांच्या दुकानातून होते. दहा कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या पुस्तक उद्योगात दरवर्षी 1,00,000 लाख पुस्तके प्रकाशित होतात पण यातील ई- बुक्सचा वाटा हा सध्या तरी नगण्य असला तरी त्याची लोकप्रियता वाढू लागली आहे. त्यामुळे अनेक प्रकाशक आणि ऑनलाइन किरकोळ पुस्तक विक्रेत्यांचादेखील ‘ई-बुक्स’साठी विशेष अ‍ॅप विकसित करण्याकडे कल वाढू लागला आहे.


ऑनलाइन माध्यमामध्ये लहान मुलांच्या पुस्तकाचा समावेश झालेला नसल्यामुळे या विक्रीला चांगला प्रतिसाद मिळत आहे, परंतु पुस्तकाबरोबरच गेल्या काही महिन्यांमध्ये इंटरनेटवरील ऑनलाइन आणि डाऊनलोडिंग सुविधांमुळे संगीत आणि चित्रपटांच्या सीडी, डीव्हीडीच्या विक्रीचे प्रमाण कमी झाले आहे.


मनोरंजन क्षेत्रातील सॅटेलाइट वाहिन्यांमुळे नवीन चित्रपट महिभरात घरच्या घरी बघायला मिळतो. या सगळ्याचा दीर्घकाळात सीडी, डीव्हीडीच्या विक्रीवर परिणाम होणार असल्याचे श्रीखंडे यांनी सांगितले. यामुळेच क्रॉसवर्ड्स आता खेळणी आणि लेखन साहित्य विक्रीवर जास्त भर दिला असल्याचे सांगितले.


इतकेच नाही तर अगोदर चार ते सहा हजार चौरस फुटांच्या दुकानाचा आकार कमी करून तो 2,200 ते 3 हजार चौरस फुटापर्यंत आणण्याचादेखील कंपनी विचार करीत आहे.


‘ऑनलाइन’ची झळ
‘फ्लिककार्ट’ तसेच अन्य ऑनलाइन वेबसाइटवर सध्या पुस्तक खरेदीसाठी 30 टक्क्यांपासून ते 40 टक्क्यांपर्यंत देण्यात येणाºया भरघोस सवलतीची झळ आता प्रत्यक्ष पुस्तक विक्रीला बसू लागली आहे. नेहमीच्या पुस्तक विक्रीमध्ये साधारणपणे 40 टक्के रिटेल मार्जिन असते, परंतु आता पुस्तके ऑनलाइन उपलब्ध होऊ लागल्याने गेल्या तीन वर्षात पुस्तक विक्री 15 ते 20 टक्क्यांनी घटली असल्याकडे श्रीखंडे यांनी लक्ष वेधले.