आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Crude Oil Bring Rupee Down Side, Gold Important Increases

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कच्च्या तेलाच्या भडक्याने रुपयाचे पानिपत, सोन्याची पतवाढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/ नवी दिल्ली - जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीचा भडका उडाला आणि घसरणीच्या वाटेवर असलेल्या रुपयाचे पानिपत झाले. बुधवारीही सलग तिस-या दिवशी डॉलरने रुपयाची यथेच्छ धुलाई केली. रुपयाने 256 पैसे गमावत 68.80 हा नवा नीचांक नोंदवला. एकाच दिवसात रुपयाची झालेली ही विक्रमी धुलाई आहे. यामुळे सराफा बाजार मात्र तेजीने लखलखला. सोन्याने 34,500 रुपये तोळा असा विक्रम नोंदवला, तर चांदीने 58,500 ची पातळी गाठली.


आयातदार आणि बँकांकडून डॉलरला आलेल्या मोठ्या मागणीमुळे सकाळपासूनच रुपयाच्या घसरणीला वेग होता. इंट्रा-डे व्यवहारात एकवेळ रुपयाने 68.85 हा नीचांक गाठला. रुपया 70 ते 72 रुपयांपर्यंत घसरेल अशी धारणा झाल्याने डॉलरला बुधवारी मोठी मागणी असल्याचे निरीक्षण डेव्हलपमेंट क्रेडिट बँकेचे सहउपाध्यक्ष नवीन रघुवंशी यांनी नोंदवले. सिरियावर लष्करी कारवाईचे संकेत अमेरिकेने दिले. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या. त्याचाही ताण रुपयावर आला आणि रुपयाने विक्रमी नीचांक नोंदवला.


यंदा आतापर्यंत 25 टक्के अवमूल्यन
यंदाच्या वर्षात आतापर्यंत रुपयाची डॉलरच्या तुलनेत 1381
पैशांची घसरण झाली आहे. आठ महिन्यात रुपयाचे 25 टक्के अवमूल्यन झाले आहे. मागील तीन दिवसांत रुपयाच्या मूल्यात 8.86 टक्के अर्थात 560 पैशांची घसरण झाली आहे. ऑगस्ट महिन्यात रुपयाचे 14 टक्के अवमूल्यन झाले आहे.


कोणासाठी किती रुपये
मोजावे लागणार

पाउंड 106.33
येन 70.64
युरो 91.85
डॉलर 66.80


महागाईला निमंत्रण
०आयात महाग ०डाळ, तेल भाववाढ ०पेट्रोल,डिझेल, गॅस भडकणार
०विदेशी शिक्षणाचा खर्च वाढणार ०जीवनावश्यक वस्तू महागणे शक्य
०चालू खात्यातील तूट वाढणार


मंदीचे सावट : रुपयाची होणारी घसरण आणि त्यातच कच्च्या तेलाच्या किमतीचा भडका असा दुहेरी ताण अर्थव्यवस्थेवर आहे. मंदीचे मळभ भारतीय क्षितिजावर जमत आहे. अन्न सुरक्षा योजनेच्या खर्चाचा ताण, विविध रेटिंग एजन्सींनी पतमानांकन व जीडीपी घटीचे दिलेले संकेत यामुळे मंदी दारात असल्याचे चित्र आहे.


सोन्याची विक्रमी तेजी
रुपयाची घसरण आणि जागतिक घडामोडीमुळे एमसीएक्स सराफा बाजार बुधवारी तेजीने चमकला. राजधानीतील सराफा बाजारात सोने तोळ्यामागे 2500 रुपयांनी वाढून 34,500 रुपयांवर पोहोचले. चांदीनेही मागे न राहता किलोमागे 3700 रुपयांची कमाई करत 58,500 ची पातळी गाठली. ज्यावरून देशात सोने -चांदीच्या किमती ठरतात त्या सिंगापूर बाजारात सोने औंसमागे 1.3 टक्क्यांनी वाढून 1433.83 डॉलर झाले. हा तीन महिन्यांचा उच्चांक आहे. चांदी औंसमागे 2.6 टक्क्यांनी चमकून 25.10 डॉलर झाली.


तेजीची कारणे
०डॉलरच्या तुलनेत रुपयाची विक्रमी घसरण
०देशातील शेअर बाजारातील अस्थैर्य
०सिरियातील पेच, अमेरिकेची हल्ल्याची तयारी
०अमेरिका फेडरल रिझर्व्ह आर्थिक पॅकेज सुरू ठेवण्याचे संकेत
०अमेरिकेत बेरोजगारीच्या आकडेवारीत वाढ
०कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
०जागतिक सराफातील सकारात्मक संकेत
०देशातील सणांचा हंगाम, आगामी लग्नसराई


पॅकेज द्या, नोक-या वाचतील : मुख्यमंत्री
रुपयाच्या घसरणीने औद्योगिक क्षेत्रात निराशाजनक स्थिती आहे. राज्यातील अनेक उद्योग अडचणीत आहेत.या उद्योगांना आर्थिक मदतीची गरज आहे. नोक-या वाचवण्यासाठी मदत आवश्यक आहे. त्यादृष्टीने मी दिल्ली आणि राज्यातील संबंधितांच्या संपर्कात आहे.’ पृथ्वीराज चव्हाण, मुख्यमंत्री


पुढे काय : अन्न सुरक्षा योजनेच्या खर्चाचा ताण अर्थव्यवस्थेवर जाणवणार आहे. चालू खात्यातील तूट नियंत्रणासाठी सरकारने सोने आयातीवर निर्बंध लादले. त्यामुळे पुरवठा कमी झाला. सणांचा हंगाम, लग्नसराईत सोन्याची मागणी वाढणार आहे. त्यामुळे सोने तेजीत राहील, असे तज्ज्ञांचे मत आहे.


विचारपूर्वक खरेदी करा : गुंतवणूकदारांनी बाय ऑन डीपच्या सूत्र म्हणजे किमती खाली आल्यावर सोने खरेदी करावी. तेजीत थांबावे. किमती उतरल्यानंतर खरेदी करावी. यामुळे तीव्र चढ-उतारांचा फटका बसणार नाही, असे आनंद राठी शेअर्स अँड ब्रोकर्सचे उपाध्यक्ष विश्वनाथ बोदाडे यांनी सांगितले.