आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यमान आर्थिक विकासदर पाच टक्क्यांच्या आत राहणार - सीआयआय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सध्याच्या मंदीच्या वातावरणामुळे देशातील कंपन्यांचा आत्मविश्वास ढळल्यासारखा झाला असून बहुतांश कंपन्यांच्या सीईओंनी आर्थिक सुधारणा रुळावर येण्यासाठी काहीसा कालावधी लागेल, असे मत व्यक्त केले आहे. बहुतांश अधिका-यांनी विद्यमान आर्थिक वर्षात विकासदर पाच टक्क्यांपेक्षा खाली जाण्याची भीती व्यक्त केली असल्याचे ‘सीआयआय’ने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे.


या सर्वेक्षणात जवळपास 42 टक्के अधिका-यांनी आर्थिक विकासदरात साडेचार ते पाच टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. आर्थिक पुनरुज्जीवन होण्यासाठीदेखील वेळ लागण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. पुढील आर्थिक वर्षाच्या दुस-या तिमाहीपर्यंत आर्थिक सुधारणांची वाट बळकट होण्याची शक्यता नसल्याचे मत 65 टक्के अधिका-यांनी व्यक्त केले आहे. सार्वत्रिक निवडणुका काही महिन्यांवर आल्या आहेत. त्यामुळे राजकीय अनिश्चिततेचे निर्माण होणारे वातावरणही कंपन्यांच्या व्यावसायिक आत्मविश्वासावर परिणाम करू शकते, असाही सूर या सर्वेक्षणात आळवण्यात आला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यनदेखील निर्यातीवर विपरीत परिणाम करणारे ठरत असल्याचे मत 82 टक्के अधिका-यांनी व्यक्त केले आहे.


धोरणात्मक बळकटी हवी
गुंतवणुकीची मागणी वाढवण्यासाठी धोरणात्मक बळकटी मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकार आणि रिझर्व्ह बँकेकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे. सरकारने भांडवली खर्चाचे प्रमाण वाढवणे व रिझर्व्ह बँकेने नाणेनिधी धोरणाबाबत मृदू धोरण स्वीकारणे गरजेचे असल्याचे मत ‘सीआयआय’चे महासंचालक चंद्रजित बॅनर्जी यांनी व्यक्त केले.