आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिका-इंग्लंडमध्ये स्थिरावलेली मंदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

असोचेम’ म्हणजेच असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अ‍ॅँड इंडस्ट्रीजतर्फे देशांतर्गत नव्यानेच करण्यात आलेल्या सर्वेक्षणात सद्य:स्थितीत विविध उद्योग आणि महानगरांमध्ये उपलब्ध असणार्‍या वा नजीकच्या काळात उपलब्ध होऊ घातलेल्या रोजगार संधींचा जो ऊहापोह करण्यात आला आहे तो अनेकार्र्थांनी विचारणीय आणि चिंतनीय ठरला आहे.

या सर्वेक्षणात रोजगार संधींच्या संदर्भात प्रामुख्याने आढळून आलेली बाब म्हणजे पुणे आणि परिसरातील उद्योगांमधील रोजगार संधींमध्ये सुमारे 17 टक्क्यांनी घट झाली असून, रोजगार संधींमध्ये सर्वाधिक वाढ ही राजधानी क्षेत्र-दिल्ली महानगर परिसरात झाली असून, या सर्वाधिक वाढीची टक्केवारी 27 टक्के आहे.

संगणक, संगणक सेवा उद्योगामधील रोजगारांबाबत प्रामुख्याने ‘जैसे थे’ स्थिती : महानगरांमधील वाढीव रोजगार संधींच्या संदर्भात सांगायचे झाल्यास सर्वाधिक रोजगार वाढीची टक्केवारी कोलकोता येथे 18टक्के असून बंगळुरूमधील रोजगार संधीची वाढीव टक्केवारी अवघ्या 8 टक्क्यांवर स्थिरावली आहे. याउलट रोजगारांमधील अंदाजेच होणारी घट सर्वाधिक घट मुंबईमध्ये 28 टक्के चेन्नई येथे टक्के तर हैदराबाद येथे पाच टक्के नोंदविण्यात आली आहे. द्वितीय श्रेणीच्या महानगरांमधील रोजगार संधींमधील अनुमानित घट सर्वेक्षणात नमूद केल्यानुसार सूरत 38 टक्के, इंदूर 23 टक्के, पुणे 17 टक्के तर भोपाळ येथे 12 टक्के याप्रमाणे नमूद करण्यात आली आहे.

सद्य:स्थितीत उद्योगनिहाय रोजगार संधींत सर्वाधिक 14 टक्के वाढ ही शिक्षणक्षेत्रात तर बँका, वित्तीयसेवा, विमाक्षेत्रातील रोजगारवाढीचे प्रमाण सहा टक्के : ‘असोचेम’चे हे सर्वेक्षण एप्रिल-जून 2013 या नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत करण्यात आले असून, या सर्वेक्षण प्रकल्पाचा मुख्य उद्देश राष्ट्रीयस्तरावर विविध उद्योगक्षेत्र आणि महानगरांमधील प्रचलित रोजगार स्थितीचे आकलन करणे हा होता. उद्योगांच्या प्रस्तावित रोजगार संधींच्या संदर्भात या सर्वेक्षणाच्या माध्यमातून स्पष्ट झालेली प्रमुख बाब म्हणजे औद्योगिक स्तरावरील प्रचलित परिस्थितीत संगणक, संगणक सेवा उद्योगामधील रोजगारांबाबत प्रामुख्याने ‘जैसे थे’ स्थिती असून, त्या उलट बांधकाम व मूलभूत सेवा-सुविधा, उत्पादन क्षेत्र, रिटेल, वाहन उद्योग या क्षेत्रातील मंदीचा विपरीत फटका या क्षेत्रातील रोजगारांचे प्रमाण आणि संधींना पण बसला आहे. सर्वेक्षणाद्वारे स्पष्ट झालेली अन्य आश्चर्याची बाब म्हणजे सद्य:स्थितीत उद्योगनिहाय रोजगार संधींमध्ये सर्वाधिक वाढ ही शिक्षण क्षेत्रात असून, त्याची टक्केवारी 14 टक्के असून, त्याखालोखाल बँका, वित्तीय सेवा व विमा क्षेत्रातील रोजगारातील वाढीचे प्रमाण सहा टक्के असे नमूद करण्यात आले आहे.

गुंतवणूक नाही, औद्योगिक क्षेत्रातील नगण्य फायदा, वाढत्या आर्थिक तोट्याचे आणि नुकसानीचे दुहेरी संकट : नोकरी-रोजगारांच्या या बदलत्या आणि ढासळत्या संख्या आणि टक्केवारीमागे अमेरिका व इंग्लंडमध्ये अद्यापही स्थिरावलेली मंदी, डॉलरच्या तुलनेत रुपयाची मोठ्या प्रमाणावर झालेली घसरण ही कारणे प्रामुख्याने पुढे आली असून, सर्वेक्षणानुसार त्याला जोड मिळाली आहे, ती मोठ्या संख्येत अपूर्णावस्थेत राहिलेल्या प्रकल्पांची. 1999 च्या महा-मंदीनंतर आर्थिक क्षेत्रात मोठी जोखीम उठविणार्‍यांची संख्या आणि प्रमाण आता जवळजवळ नगण्य झाले आहे. त्यालाच जोड मिळाली आहे ती औद्योगिक क्षेत्रातील अपुरा व नगण्य स्वरूपातील फायदा व वाढत्या आर्थिक तोटा आणि नुकसानीची. या दुहेरी संकटांमुळे उद्योग आणि उद्योजक नव्या गुंतवणुकीच्या संदर्भात पुरेसे धास्तावलेले असून, त्याचा अपरिहार्य परिणाम पण रोजगारांच्या संधींवर घटत्या स्वरूपात झाला आहे.

वाहन उद्योगाला बसलेला फटक्याने रोजगार थंडावले : पुणे आणि परिसरातील औद्योगिक सद्यस्थिती व रोजगारांच्या संदर्भात ‘अ‍ॅसोचेम’च्या या सर्वेक्षणात दोन महत्त्वाचे मुद्दे नमूद करण्यात आले आहेत. त्यानुसार पुण्यातील संगणक सेवाक्षेत्राला सध्या विकासाच्या संदर्भात पूरक स्थिती निर्माण झाली असली तरी वाहन उद्योगाला बसलेल्या व्यावसायिक फटक्याचा परिणाम या उद्योगावर अपरिहार्यपणे झाला आहे, असे होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पुणे-चाकण परिसरात परंपरागत स्वरूपात वाहननिर्मिती व्यवसाय मोठ्या संख्येत प्रस्थापित झाले असून, वाहन-व्यवसायावर नकारात्मक परिणाम झाल्यास त्याचा अपरिहार्य परिणाम पुण्यातील वाहन उद्योगाला पूरक व्यवसायावर होतोच होतो. त्यामुळे पुणे आणि परिसरातील वाहन उद्योगाला सुटे भाग पुरविणार्‍या उद्योगात गेल्या सुमारे दोनवर्षांपासून एकीकडे नवे रोजगार थंडावले असतानाच कामगारांच्या कामावरून काढून टाकण्याचे प्रमाण कायमच राहिले आहे. परिणामी पुणे आणि परिसरातील रोजगार संधींमध्ये मोठीच घसरण झाली आहे.