आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Davos Forum: Sabmilar,Kargil, Zurich Airport, Jetro Egar To Invest In Maharashtra

दाओस परिषद: सॅबमिलर, कारगिल, झुरिच विमानतळ, जेट्रो महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी उत्सुक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दाओस - खाद्यतेल क्षेत्रातील कारगिल, मद्यनिर्मिती व शीतपेय निर्मिती क्षेत्रातील सॅबमिलर, जेट्रो आणि झुरिच विमानतळ या कंपन्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीस उत्सुक असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. सध्या स्वित्झर्लंडमधील दाओस येथे जागतिक आर्थिक परिषदेची बैठक सुरू आहे. राज्यात
गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री चव्हाण सध्या दाओस येथे आहेत.
त्यांनी या चारही कंपन्यांच्या पदाधिका-यांशी चर्चा केली. त्या वेळी या कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीस अनुकूलता दर्शवली.
झुरिच विमानतळाचे सीईओ थॉमस केर्न यांच्यासह त्यांच्या अधिका-यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री चव्हाण यांच्याशी चर्चा केली. झुरिच हा तीन धावपट्ट्या असणारा आणि ए-380 सारखी मोठी विमाने उतरण्याची क्षमता
असणारा विमानतळ आहे. चर्चेपूर्वी मुख्यमंत्र्यांनी या विमानतळाची पाहणी केली. नवी मुंबई, पुणे आणि नागपुरात नव्याने उभारण्यात येणा-या विमानतळांविषयी शिष्टमंडळाला माहिती दिली. राज्यातील नव्या प्रकल्पात गुंतवणुकीची इच्छा असल्याचे थॉमस यांनी सांगितले.
कारगिलही इच्छुक :
खाद्यतेल उत्पादन क्षेत्रातील अमेरिकेची आघाडीची कंपनी कारगिल या बहुराष्ट्रीय कंपनीचे सीईओ डेव्हिड मॅकलेनन यांच्याशी मुख्यमंत्री चव्हाण यांनी चर्चा केली. कारगिलला महाराष्ट्रात मोठा विस्तार करायचा असल्याचे मॅकलेनन यांनी सांगितले. महाराष्ट्र हे मका व सोयाबीनचे आगर असून महाराष्ट्रातील नव्या प्रकल्पासाठी फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्रात येणार असल्याचे मॅकलिनन यांनी स्पष्ट केले.
सॅबमिलरची नजर विदर्भावर :
शीतपेय आणि मद्यनिर्मिती क्षेत्रातील ग्रेट ब्रिटनच्या सॅबमिलर कंपनीने विदर्भ विशेषत: नागपुरात गुंतवणुकीसाठी उत्सुक असल्याचे म्हटले आहे.
काय आहेत या कंपन्या?
० झुरिच विमानतळ ही कंपनी विमानतळ निर्मितीत आघाडीची मानली जाते. कंपनीने झुरिच येथे तीन धावपट्ट्यांचा विमानतळ उभारला आहे.
० सॅबमिलर कंपनीचा सध्या वाळूज (औरंगाबाद) येथे मद्यनिर्मिती प्रकल्प आहे. फोस्टर्स, ग्रोल्स, पिल्सनर हे कंपनीचे ब्रँड लोकप्रिय आहेत.
० कारगिल कंपनी सध्या पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. कंपनीचे संपूर्णा चक्की आटा, जेमिनी, स्वीकार हे खाद्यतेल प्रसिद्ध आहेत.
० जेट्रो ही जपानमधील उद्योजकांची संघटना आहे. महाराष्ट्रात सध्या 277 जपानी उद्योग कार्यरत आहेत. ब्रिजस्टोन, निप्पो, कोमात्सू हे त्यापैकीच.
सुपा-पारनेर येथे जपानी इन्व्हेस्टमेंट झोन
जपान एक्स्टर्नल ट्रेड ऑर्गनायझेशन (जेट्रो) या जपानी उद्योजकांच्या शिष्टमंडळाशी मुख्यमंत्री चव्हाण यांनी चर्चा केली. जेट्रोचे अध्यक्ष हिरोयुकी इशिगे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील सुपा-पारनेर येथे जपानी इन्व्हेस्टमेंट झोन उभारण्यासंर्दभातील माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. महाराष्ट्रातील विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांत सहभागासाठी जेट्रोने औत्सुक्य दाखवले.
विकसनशील अर्थव्यवस्था मजबूत
विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थांनी मागील दहा वर्षांत चांगली वाढ दर्शवली आहे. त्यात भारताचा क्रम बराच वरचा आहे, असे मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे उपव्यवस्थापकीय संचालक मिन झू यांनी व्यक्त केले. उगवत्या अर्थव्यवस्थांसमोरील आव्हाने या विषयांवर आयोजित परिसंवादात ते बोलत होते.
भारतीय अर्थव्यवस्था तर सुपर हायवे
जगात खरीखुरी लोकशाही नांदणा-या भारताचे भवितव्य उज्ज्वल असून भारतीय अर्थव्यवस्था ही अत्यंत वेगवान महामार्ग (सुपर हायवे) असल्याचे मत प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ थॉमस फ्राइडमॅन यांनी व्यक्त केले. त्यांचे ‘वर्ल्ड इज फ्लॅट’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे. ते म्हणाले, अनेक जण मला भारत आणि चीनविषयी विचारणा करतात. दोन्ही सुपर हायवे आहेत, मात्र वेगवेगळे आहेत. भारतात काही बाबींची कमतरता आहे. या महामार्गावरील काही पथदिवे बंद आहेत.
निर्मिती क्षेत्रात 100 दशलक्ष रोजगार संधीदाओस । भारतीय मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात 100 दशलक्ष रोजगाराच्या संधी असल्याचे मत केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री आनंद शर्मा यांनी व्यक्त केले. जागतिक आर्थिक परिषदेसाठी जगभरातून आलेल्या उद्योजकांच्या गाठीभेटी शर्मा यांनी घेतल्या. त्यांनी सांगितले, देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात उत्पादक क्षेत्राचा वाटा 16 टक्क्यांवरून 25 टक्के करण्याचे लक्ष्य आहे. त्यामुळे या क्षेत्रात 2022 पर्यंत 100 दशलक्ष कुशल रोजगार निर्माण होणार आहेत.
इतक्यात धोक्याची घंटा नको : माँटेकसिंग
भारतीय अर्थव्यवस्थेची मुळे घट्ट असून सध्या पाच टक्के विकास दर असणा-या अर्थव्यस्थेबाबत इतक्यात कोणीही धोक्याची घंटी वाजवू नये, अशा शब्दांत नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष माँटेकसिंग अहलुवालिया यांनी अर्थव्यवस्थेबाबत आत्मविश्वास व्यक्त केला. दाओस जागतिक आर्थिक परिषदेतील एका परिसंवादात ते बोलत होते. ते म्हणाले, येणारे सरकारही अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर राहण्यासाठी व सध्याची धोरणे पुढे चालू ठेवण्यासाठी निश्चितच प्रयत्न करेल. सध्या विकासाचा दर पाच टक्के आहे. सहा टक्के दराने व दीर्घकाळात साडेसात टक्के दराने विकसित होण्याची या अर्थव्यवस्थेत क्षमता आहे. त्यामुळे कोणीही भारताच्या आर्थिक स्थितीबाबत बाट दाखवू नये. आगामी निवडणुकांनंतर कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी ते आर्थिक सुधारणा सुरूच ठेवेल याबाबत शंका नाही. आमचा भर थेट विदेशी गुंतवणुकीवर राहील.