आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुपयाच्या अवमूल्यनाने निर्यातदार हैराण; सततच्या घसरणीने उत्पादन खर्च वाढणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या होणा-या सातत्यपूर्ण अवमूल्यनाने आयातदारांसह निर्यातदारांचे धाबे दणाणले आहे. छोट्या निर्यातदारांना मात्र रुपया घसरल्याचा लाभ होत आहे. शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रुपया 56.50 या 11 महिन्यांच्या नीचांकी पातळीत बंद झाला. रुपयाच्या अवमूल्यनाने कच्च्या तेलाच्या किमती वाढतील आणि त्यामुळे महागाईत आणखी भर पडेल, अशी शक्यता निर्यातदारांनी व्यक्त केली. यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ होईल, अशी भीती व्यक्त होत आहे.


निर्यातदारांच्या मते, खरेदीदारांच्या समोर विविध वस्तूंच्या किमती कोट करण्यात सर्वाधिक अडचण येते. रुपयाच्या किमतीतील सातत्याने होणा-या घसरणीचा काहीच फायदा होत नाही. यंदा केवळ मे महिन्यातच डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात 4.8 टक्के घसरण झाली आहे. गेल्या आठवडाभरात रुपयाचे मूल्य 87 पैशांनी घटले आहे.
अभियांत्रिकी निर्यात प्रोत्साहन मंडळाचे (ईईपीसी) उपसंचालक सुरंजन गुप्ता यांच्या मते, रुपयातील सातत्याच्या चढ-उतारामुळे निर्यातदारांचा संभ्रम वाढतो. अनेक वेळा निर्यातदार आणि घसरणीच्या आशेने आपले देणे कॅश करणे टाळतो आणि जर डॉलर कमकुवत झाला तर निर्यातदाराला काहीच फायदा होत नाही. घसरणीच्या काळात खरेदीदाराच्या समोर किंमत कोट करणे अवघड होऊन बसते. दिल्ली एक्स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष तिलकराज मानकताला यांच्या मते, रुपयाच्या घसरणीमुळे अल्पकाळासाठी निर्यातदारांना काहीच फायदा होत नसला तरी दीर्घकाळाचा विचार केल्यास या घसरणीचा उलटा परिणाम होण्याची शक्यता असते. ज्या निर्यातदारांनी हेज केलेले नाही, त्यांना अशा घसरणीमुळे मोठे नुकसान सोसावे लागते. त्यामुळे देशाच्या चालू खात्यातील वित्तीय तूट आणखी वाढते. डिसेंबर-जानेवारी या काळात चालू खात्यातील तूट सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या (जीडीपी) 6.7 टक्क्यांपर्यंत पोहोचली होती. मानकताला यांच्या मते, रुपयाच्या मूल्यात जास्त किंवा सातत्याने घट झाल्यास खरेदीदारही तेवढ्या फरकाची मागणी निर्यातदाराकडे करतो. यामुळे निर्यातदाराला फायदा होत नाही.


महागाई वाढणार
निर्यातदारांच्या मते, रुपयाच्या अवमूल्यनाचा सर्वात मोठा धोका म्हणजे महागाईत वाढ होणे. महागाई वाढल्याने उत्पादन खर्चात वाढ होण्याची शक्यता असते. असे झाल्यास बाजारातील स्पर्धात्मक क्षमतेवर परिणाम होऊन नुकसान होते.


4.8 टक्के मेमधील रुपयाची घसरण
56.50 पातळीमुळे रुपयाने गाठला 11 महिन्यांचा नीचांक