आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील डेब्ट मार्केटवर विदेशी वित्तीय गुंतवणूक संस्था फिदा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - यंदाच्या वर्षात विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी (एफआयआय) भारतीय रोखे (डेब्ट) बाजारात आतापर्यंत 2.5 अब्ज डॉलरची (सुमारे 13,480 कोटी रुपये) गुंतवणूक केली आहे. एकट्या मार्च महिन्यात एफआयआयने 1.2 अब्ज डॉलर (6,532 कोटी रुपये) डेब्ट बाजारात ओतले असल्याचे सेबीकडील आकडेवारीत म्हटले आहे.


या आकडेवारीनुसार, विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी एक मार्च ते 26 मार्च या काळात 24,089 कोटींचे रोखे खरेदी केली, तर 17,557 कोटी रुपयांचे रोखे विकले. त्यामुळे एकूण गुंतवणूक 6,532 कोटी रुपये झाली. एफआयआयने मार्चमध्ये शेअर बाजारात 8,557 कोटींचा निधी ओतला. शेअर बाजारातील एफआयआयची एकूण गुंतवणूक आता 55,055 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. एक एप्रिलपासून विदेशी गुंतवणुकीवरील काही बंधने शिथिल करण्यात येतील, असे केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी गेल्या आठवड्यात जाहीर केले होते. त्यानुसार सरकारी रोखे व कॉर्पोरेट रोखे या मुख्य श्रेणीवरील बंधने एक एप्र्रिलपासून रद्द होणार आहेत. आता सरकारी रोख्यांत गुंतवणुकीसाठी विदेशी संस्थांना 25 अब्ज डॉलर्स आणि कंपन्यांकडून जारी होणा-या रोख्यांत 51 अब्ज डॉलर गुंतवण्याची मुभा मिळणार आहे.


विक्रमी आवक
गेल्या वर्षी 2012 मध्ये विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी भारतीय रोखे बाजारात 35 हजार कोटींचा निधी ओतला होता. गेल्या दोन वर्षांतील ही सर्वाधिक रक्कम आहे. रोख्यांत गुंतवणुकीसाठीची वाढीव मर्यादा आणि रुपयाचे अवमूल्यन या दोन बाबी यासाठी कारणीभूत ठरल्या. देशात 25 मार्चपर्यंत नोंदणीकृत एफआयआयची संख्या 1,760 आहे. त्यांच्या एकूण उपखात्यांची संख्या 6,331 एवढी आहे.