आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुण्‍याच्‍या डेक्‍कन वॉटर ट्रिटमेंटची गगन भरारी, विदेशातून मिळवली सहा कोटींची ऑर्डर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुण्‍यातील डेक्‍कन वॉटर ट्रिटमेंट कंपनीने अटकेपार झेंडा फडकवताना परदेशातून तब्‍बल 6.2 कोटी डॉलर किंमतीच्‍या सौर उर्जा प्रकल्‍पाची ऑर्डर मिळवून अभूतपूर्व कामगिरी केली आहे. डेक्‍कन कंपनीने भारतातील अति दुर्गम भागापासून सोमालियासारख्‍या युद्धग्रस्‍त देशातही आपला व्‍यवसाय विस्‍तार केलेला आहे. कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनिर्बन सरकार यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली.

या करारामुळे रुपया घसरलेला असतानाही 100 कोटी रुपये किमतीचे महागडे परकीय चलन देशाला मिळणार आहे. 31 मेगावॉट क्षमतेचा हा प्रकल्प असून त्यासाठी कंपनीकडून फोटोव्होल्टेक पद्धतीचा वापर केला जाणार आहे. नैरोबीतील पीडमोन्ट इन्व्हेस्टमेंटकडून ही ऑर्डर मिळाली आहे. हे तंत्र वापरणारे सध्या जगात 100 देश आहेत, आणि अशी ऑर्डर मिळालेला भारत हा त्यापैकी एक आहे. विदर्भात मोठ्या प्रमाणात कंपनी काम करत आहे. तसेच मध्य प्रदेश आणि गोवा या राज्यातही कंपनीने विस्तार केला असल्‍याची माहिती सरकार यांनी दिली.

पुण्याजवळ खराडी येथे कंपनीचा प्रकल्प असून 1998 मध्ये केवळ 10 कोटी रुपये भांडवल गुंतवून सुरु केलेल्या या कंपनीने 50 लाखावरून 100 कोटी रुपये उलाढालीचा टप्पा गाठला आहे. सध्या कंपनीकडे 500 कोटी रुपयांच्या ऑर्डर आहेत असे नमूद करून ते म्हणाले, की सोमालियातील युद्धाने नष्ट झालेले मोगादिशु येथील सर्व पायाभूत सुविधा उभारणीसाठी कंपनीच्‍या अध्यक्षांची सल्लागार म्हणून निवड झालेली आहे. एक प्रकारे भारताचे प्रतिनिधित्व कंपनी करत आहे. त्याच प्रमाणे ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलंड सरकारसाठी कंपीन गेली तीन वर्षे काम करत आहे. कंपनीत तब्‍बल 200 कर्मचारी काम करत आहेत .
परदेशातील अनुभव सांगताना सरकार म्हणाले, की सौर उर्जा प्रकल्पासाठी कंपनीने जी किंमत निविदेत दिली त्यापेक्षा एक डॉलरही जास्त द्यावा लागत नाही इतकी प्रशासनात पारदर्शकता आहे. हे आपल्या सरकारने शिकण्यासारखे आहे. सोमालिया आणि गडचिरोली दोन्हीकडे प्रतिकूल स्थिती असताना कंपनीने उत्तम काम केले आहे. सौर ऊर्जेबाबत सरकारी धोरण मात्र अपेक्षा पूर्ण करत नाही. कारण मनुष्यबळ, तंत्रज्ञान आणि क्षमता या तिन्हीबाबत कंपनीला मोठा पल्ला गाठावा लागेल त्यासाठी आणखी प्रोत्साहन गरजेचे आहे.

अनिर्बन सरकारांचा मराठी बाणा
डेक्कन वॉटर ट्रिटमेंटची मालकी सरकार या बंगाली उद्योजकाकडे असूनही तेथे 80 टक्के कर्मचारी मराठी आहेत आणि स्वतः अनिर्बन सरकार उत्तम मराठी बोलतात. त्यांचे शालेय शिक्षण पुण्यात सेंट जोसेफमध्ये तर अभियांत्रिकी पदवी त्यांनी शासकीय महाविद्यालयातून मिळविली आहे. ते केवळ पुणेकर नव्हेत तर निखळ राष्ट्रप्रेमी आहेत.