आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Degree Holders Becom Businessman Through Online Traning

पदवीधरांना रोजगाराभिमुख बनविण्यासाठी मोफत व्यावसायिक, उच्चशिक्षण मिळणार ऑनलाइन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पहिला अभ्यासक्रम येत्या
ऑक्टोबरपासून सुरू होणार

भारतीय पदवीधरांना रोजगाराभिमुख बनविण्यासाठी आवश्यक असणारे उच्च शिक्षण आणि व्यावसायिक अभ्यासक्रम आता ऑनलाइन शिकवले जाणार आहेत. त्यासाठी देशातल्या 7 प्रमुख आयआयटी संस्था, इन्फोसिस, टीसीएस आणि कॉग्निजंट यासारखे नामवंत आयटी उद्योग आणि नॅस्कॉम एकत्र आले असून पहिला अभ्यासक्रम येत्या ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.


अमेरिकेत ‘मॅसिव्ह ओपन
ऑनलाइन कोर्सेस’ चळवळ

अमेरिकेमध्ये ‘मॅसिव्ह ओपन ऑनलाइन कोर्सेस’ या नावाचे उच्च शिक्षणाची ही ऑनलाइन चळवळ जानेवारी 2012 मध्ये एका स्टार्टअप कंपनीने सुरू केली आणि अवघ्या दीड वर्षात जगभरातल्या उच्च शिक्षणक्षेत्रात त्यांनी मोठी क्रांती घडवून आणली. कारण हे सर्व अभ्यासक्रम मोफत आहेत. आता हीच योजना भारतात अधिकृतपणे येत्या ऑक्टोबरपासून सुरू होत आहे.


हे ऑनलाइन अभ्यासक्रम म्हणजे विद्यापीठातील प्रत्यक्ष वर्गशिक्षणाला तगडा पर्याय आहे, असे मात्र या योजनाकर्त्यांचे अजिबात म्हणणे नाही. पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतरही रोजगार मिळवण्यासाठी किंवा आपल्या व्यवसायात अधिक प्रगती करण्यासाठी विविध प्रकारच्या लहान-मोठ्या अभ्यासक्रमांची गरज असते. अशी गरज या उपक्रमांमधून पुरवली जाणार आहे. या भूमिकेतून हे अभ्यासक्रम सुरू झाले आहेत आणि ते अत्यंत उपयुक्त ठरत आहेत.


23 विद्यापीठे एकत्र, प्रथम एमआयटी, हार्वर्ड
विद्यापीठांनी येऊन ईडीएक्स ऑनलाइन
प्रशिक्षण सुरू केले होते

2010 मध्ये उडासिटी आणि कर्सरा या दोन स्टार्टअप कंपन्यांनी प्रथम हा उपक्रम सुरू केला. त्यांच्यामागे स्टॅनफोर्ड, कोलंबिया, मिशिगन ही विद्यापीठे उभी राहिली. पाठोपाठ एमआयटी आणि हार्वर्ड विद्यापीठांनी एकत्र येऊन ईडीएक्स या नावाने ऑनलाइन प्रशिक्षण सुरू केले. ब्रिटनही यामध्ये उतरला असून जगातल्या 23 नामवंत विद्यापीठांना बरोबर घेऊन ‘फ्युचरलर्न’ अभ्यासक्रम सप्टेंबरपासून सुरू करीत आहे. पाठोपाठ असे अभ्यासक्रम भारतातही सुरू होतील.


मुंबई आयआयटीचे
अभ्यासक्रम आता जगभर ऑनलाइन

अमेरिका ब्रिटनमध्ये सुरू झालेली ही चळवळ एवढ्या लवकर भारतात कशी पोचली, याचे अनेकांना आश्चर्य वाटेल. पण त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे अमेरिकन प्रयोगाच्या यशात भारताचा मोठा आणि दुहेरी वाटा आहे. मुंबई आणि दिल्ली आयआयटी या दोन्ही संस्था अमेरिकन उपक्रमात सुरुवातीपासून सहभागी आहेत. मुंबई आयआयटीचे अनेक अभ्यासक्रम आता जगभर ऑनलाइन शिकवले जातात. शिवाय अमेरिकेतील या ऑनलाइन संस्थांमधून प्रशिक्षण घेणा-यांची संख्या भारतात सर्वात मोठी आहे. अमेरिकेच्या खालोखाल सर्वाधिक भारतीय विद्यार्थी, हे अभ्यासक्रम पूर्ण करीत आहेत आणि याचा त्यांना मोठा उपयोग होतो आहे.
अमेरिकेतील या संस्था भारताकडे एक सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून पाहात आहेत. कर्सरा आणि इडीएक्स या दोन्ही संस्थांनी भारतातील आयआयटींसह अनेक नामवंत शिक्षणसंस्था आणि उद्योगांशी सहकार्याचा हात पुढे केला.


भारतीय बाजारपेठांवर अ‍ॅप्स उत्पादकांचे लक्ष
भारतातील विद्यार्थ्यांसमोर इंटरनेट कनेक्टिव्हिटीची मोठी अडचण वीजटंचाईमुळे आहे, हे लक्षात घेऊन नवे नवे प्रयोगही केले जात आहेत. नामवंत शिक्षकांचे व्हिडिओ नेटवरून उपलब्ध करून दिले जातात. ते विद्यार्थ्यांनी डाऊनलोड करून घ्यावेत आणि वेळ मिळेल तेव्हा पाहावेत, अशी व्यवस्था आहे. विषय नीट समजून घेण्यासाठी आणि शंका समाधानासाठी प्रश्नमंजूषा, सामूहिक चर्चा असे कार्यक्रमही ऑनलाइन चालतात आणि परीक्षाही ऑनलाइन देता येते. ज्यांच्याजवळ स्वत:चे कॉम्प्युटर नाहीत, अशांसाठी टॅब्लेट अ‍ॅप्स आणि मोबाइल अ‍ॅप्स बनवले जात आहेत. भारत सरकार दीड हजार रुपयांत ‘आकाश’ हे टॅब्लेट उपलब्ध करून देणार असल्यामुळे या नव्या बाजारपेठेवर अ‍ॅप्स उत्पादकांनी आपले लक्ष केंद्रित केले आहे.


अभ्यासक्रम मोफत आणि ऑनलाइन
असल्यामुळे उत्साहाने प्रवेश पण पुढे टिकाव नाही

पुस्तके, वर्गखोल्या आणि देशांच्या सीमा ओलांडून सुरू झालेला हा उच्च शिक्षणाचा उपक्रम क्रांतिकारक ठरला असला, तरी तो अद्याप बाल्यावस्थेत आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. प्रशिक्षण देण्यासाठी व्हिडिओ व्याख्याने, प्रश्नमंजूषा, सामूहिक चर्चा घेतल्या जात असल्या, तरी परीक्षा घेऊन त्याची अ‍ॅसेसमेंट कशी करायची आणि सर्टिफिकेट कसे द्यायचे, याबद्दल या संस्था अजूनही विविध प्रयोग करीत आहेत. पण लवकरच त्यावर तोडगा निघेल, यात शंका नाही. शाळा व महाविद्यालयांत विद्यार्थ्यांची गळती मोठ्या प्रमाणात होते, हे आपण पाहतो. इथे तर या गळतीचे प्रमाण 90 टक्के आहे. अभ्यासक्रम मोफत आणि ऑनलाइन असल्यामुळे विद्यार्थी उत्साहाने प्रवेश घेतात पण पुढे टिकत नाहीत. त्यासाठी या संस्थांतील तज्ज्ञ नवे नवे प्रयोग करीत आहेत. त्यात लवकरच यश येऊन गळती थांबेल आणि सर्टिफिकेटला उद्योगांची मान्यता मिळेल, असे तज्ञांना वाटते.


मुक्त विद्यापीठांसारखी क्रांती ऑनलाइन कोर्सेस
घडवतील जिथे लाखो रुपये मोजावे लागतात तिथे
आता मोफत ऑनलाइन शिक्षण उपलब्ध

योग्य वयात शिक्षण घेऊ न शकलेल्या, पण शिकू इच्छिणा-यांना मुक्त विद्यापीठांनी एक महत्त्वाचे दालन खुले करून दिले. तशीच मोठी क्रांती या ऑनलाइन अभ्यासक्रमांनी घडवली आहे. नामवंत उच्च शिक्षणसंस्थेत एखादा अभ्यासक्रम पूर्ण करायला लाखो रुपये मोजावे लागले असते, तो आता मोफत आणि ऑनलाइन उपलब्ध होत आहे. ज्यांनी हे अभ्यासक्रम पूर्ण केले, त्यांना आपले आयुष्य आणि उद्योग व्यवसाय पूर्णपणे बदलल्याचाच अनुभव आला. अशा अभ्यासक्रमांतून घडलेल्या परिवर्तनाच्या कथा लोकांसमोर येतील, तसे या अभ्यासक्रमांचे महत्त्व निश्चितच वाढेल. भारतीय तरुणांच्या गरजा लक्षात घेऊन हा उपक्रम भारतात सुरू झाला, हे महत्त्वाचे आहे. हळूहळू इतर अनेक क्षेत्रातले अभ्यासक्रम ऑनलाइन सुरू करा, असा आग्रह भारतीय उद्योगच धरतील.


(लेखक व्हिडिओकॉन समूहाचे अध्यक्ष आहेत)