आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात सोने मागणीत ३९% वाढ, सप्टेंबर तिमाहीत २२५.१ टन सोन्याला मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दागिन्यांच्या विक्रीत झालेल्या वाढीमुळे जुलै-सप्टेंबर या तिमाहीत देशातील सोन्याच्या मागणीत ३९ टक्के वाढ झाल्याचे जागतिक सुवर्ण परिषदेच्या अहवालात म्हटले आहे. वर्ष २०१३च्या याच तिमाहीच्या तुलनेत सोन्याची मागणी २२५.१ टनांवर पोहोचली आहे.
जागतिक सुवर्ण परिषदेच्या अहवालानुसार, गेल्या वर्षी जुलै-सप्टेंबर तिमाहीत ४२,८२९.६ कोटी रुपयांचे साेने खरेदी झाली. यंदाच्या तिमाहीत हे प्रमाण ३१ टक्क्यांनी वाढून ५६,२१९.३ कोटी रुपये झाले आहे. दागिन्यांच्या मागणीत ५१ टक्के वाढ होऊन ती ४५,६८१.६ कोटींवर पोहोचली. गेल्या वर्षीच्या तिस-या तिमाहीत हे प्रमाण ३०,३४६.५ कोटी होते.
गेल्या वर्षी सप्टेंबर तिमाहीत सरकारने सोन्यावर लादलेल्या निर्बंधामुळे मागणीत घट दिसून आली होती. मात्र, यंदाच्या तिमाहीत या निर्बंधांचा फारसा परिणाम दिसला नसल्याचे या अहवालात म्हटले आहे.
अवैध मार्गावर अंकुश हवा :
सोने आयातीवर २०१३ मध्ये सरकारने अनेक निर्बंध टाकले. तसेच यंदा दिवाळीत मागणीत वाढ दिसून आली. त्यामुळे मागणी काही प्रमाणात घटली असली तरी अवैध मार्गाने, तस्करीद्वारे मोठ्या प्रमाणात सोने आयात होते. त्यावर अंकुश ठेवायला हवा. नवे सरकार कशी पावले उचलते हे पाहणे महत्त्वाचे राहील. सोमसुंदरम, एमडी (भारत), जागतिक सुवर्ण परिषद
गुंतवणूक मात्र घटली
दागिन्यांमुळे सोन्याची मागणी वाढली असली तरी गुंतवणुकीसाठी सोन्याच्या मागणीत सप्टेंबर तिमाहीत १० टक्के घट झाली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत ४७.१ टन सोन्याची गुंतवणूक झाली होती, यंदा ती घटून ४२.२ टक्क्यांवर आली आहे.