आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर वधारला- माहिती तंत्रज्ञान, बँक क्षेत्रातील समभागांना मोठी मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -वॉलस्ट्रीट शेअर बाजारात आलेली तेजी, भांडवल बाजारात मोठ्या प्रमाणावर येत असलेला निधीचा ओघ आणि त्यातच माहिती तंत्रज्ञान आणि बॅँकांच्या समभागांची तुफान खरेदी झाल्यामुळे सेन्सेक्स 119 अंकांची वाढ नोंदवली. सेन्सेक्स तीन आठवड्यातील उच्चांकी पातळीवर बंद झाला.


अगोदरच्या सत्रातील 41.88 अंकांच्या वाढीनंतर सौदापूर्ती सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी सेन्सेक्स 118.99 अंकांनी वाढून 21,193.58 अंकांच्या पातळीवर बंद झाला. या अगोदर 10 डिसेंबरला सेन्सेक्स या पातळीवर बंद झाला होता. अमेरिकेतील बेरोजगारांचे प्रमाण घटल्यामुळे तेथील अर्थव्यवस्थेला पुन्हा नवी उभारी येऊ लागली असून सॉफ्टवेअर निर्यातीत वाढ होण्याची अपेक्षा बाजारात निर्माण झाली आहे. त्यामुळे बाजारात टीसीएस, इन्फोसिस आणि विप्रो या आयटी समभागांना लक्षणीय मागणी आली. त्यामुळे सेन्सेक्सच्या 119 अंकांच्या भरारीत 71 अंकांची भर तर आयटी समभागांनीच घातली. केवळ आयटीच नाही, तर एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँकेच्या समभागांची चांगली खरेदी झाली. डिसेंबरमधील डेरिव्हेटिव्हज व्यवहारांची मुदत गुरुवारी संपल्यामुळे गुंतवणूकदार आपला रोखासंग्रह मजबूत करण्याच्या मूडमध्ये होते. राष्‍ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक 34.90 अंकांनी वाढून 6313.80 अंकांच्या पातळीवर बंद झाला.