आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिरे, दागिने निर्यात : सलग तिसर्‍या महिन्यात झळाळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पुरवठ्यातील अडचणी दूर झाल्यामुळे देशातील हिरे आणि दागिन्यांची निर्यात सलग तिसर्‍या महिन्यात वधारून ऑक्टोबरमध्ये 19,800 कोटी रुपयांच्या पातळीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. हिरे आणि दागिने निर्यात प्रोत्साहन परिषदेने हा अंदाज व्यक्त केला आहे.

गेल्या वर्षी याच कालावधीत म्हणजे दिवाळीच्या काळात 14,475 कोटी रुपयांची निर्यात झाली होती. या तुलनेत यंदा ऑक्टोबर महिन्यात ही निर्यात 36 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज परिषदेने व्यक्त केला आहे. चालू खात्यातील तूट भरून काढण्यासाठी सरकारने सोन्याची आयात रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या. त्यासाठी या मौल्यवान पिवळ्या धातूवरील आयात शुल्क 10 टक्क्यापर्यंत वाढवले तसेच व्यापार्‍यांना आयात केलेल्या एकूण सोन्यापैकी 20 टक्के निर्यात बंधनकारक केली. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत सोन्याच्या पुरवठ्याची चणचण निर्माण झाली. पुरवठ्यातील तुटवड्याचा निर्यातीला फटका बसला. परिमाण स्वरूपातील सोन्याचे प्रमाणदेखील मासिक आधारावर घसरले, परंतु ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये मात्र या निर्यातीमध्ये सुधारणा झाली.

ऑगस्ट आणि सप्टेंबरमधील सोने आयातीची पातळी लक्षात घेता मौल्यवान धातूच्या पुरवठ्यात झालेली सुधारणा आणि सणासुदीतील मागणीमुळे ऑक्टोबरमध्ये ही निर्यात 15 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज हिरे आणि दागिने निर्यात प्रोत्साहन परिषदेचे अध्यक्ष विपुल शहा यांनी व्यक्त केला. सोने निर्यातीसंदर्भात या मौल्यवान धातूच्या पुरवठ्याबाबतच्या नियमांत स्पष्टता आल्यानंतर आणखी वेग येण्याची शक्यता आहे. नाताळातील मागणीमुळे देखील निर्यातीला बळकटी मिळण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

आगामी काळातही गती मिळणार
अमेरिका, युरोप, संयुक्त अरब अमिरात आणि हॉँगकॉँग या देशांमध्ये हिरे आणि दागिन्यांची सर्वात जास्त निर्यात केली जाते. चालू आर्थिक वर्षातील निर्यातीचा एकूण कल लक्षात घेता येत्या काही महिन्यात निर्यातीला आणखी गती मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिरे आणि दागिने निर्यात ही गेल्या वर्षातल्या एकूण निर्यातीच्या तुलनेत अर्धी म्हणजे 39 अब्ज डॉलर म्हणजे 2,12,638 कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. उरलेल्या निर्यातीमध्ये हिरे, अन्य रंगीत हिरे आणि मौल्यवान खड्यांचा समावेश असेल असेही शहा म्हणाले.