आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिझेल कार आकर्षक करण्यावर भर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - डिझेल आणि पेट्रोलच्या किमतीतील फरक कमी होत असल्याने डिझेल कारची मागणी घटली आहे. डिझेल कारची मागणी टिकून राहावी यासाठी ऑटो कंपन्या डिझेल कार आकर्षक बनवण्यावर भर देत आहेत.

या क्षेत्रातील सूत्रांच्या माहितीनुसार, ज्या कार निर्मात्या कंपन्यांचा डिझेल कारचा पोर्टफोलिओ मोठा आहे अशा कंपन्या आपल्या क्षमतेपेक्षा ५० टक्केच उत्पादन करत आहेत. काही वितरकांच्या मते, कंपन्यांनी आता डिझेल आणि पेट्रोल कारच्या किमतीतील अंतर कमी करण्यास सुरुवात केली आहे. काहींनी पेट्रोल कारच्या किमती वाढवल्या आहेत तर काहींनी डिझेल कारवर आकर्षक सवलत देण्यास सुरुवात केली आहे. जेडी पॉवर अशियाचे कार्यकारी संचालक मोहित अरोरा यांच्या मते,या बदलत्या कलाचा सर्वात जास्त परिणाम महिंद्रा अँड महिंद्रा आणि टाटा मोटर्स सारख्या बड्या कंपन्यांवर झाला आहे.

आर्थिक वर्ष २०१३ मध्ये कारच्या विक्रीत डिझेल कारचा वाटा ५८ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. नोव्हेंबरमध्ये तर हा आलेख ६२ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. मागील तीन वर्षांत प्रथमच डिझेल कारच्या विक्रीत घट दिसून आली आहे. पेट्रोल कारची विक्री १३ ते १४ टक्क्यांनी वाढली आहे. पेट्रोल कारची वाढती मागणी लक्षात घेऊन कंपन्यांनी कंबर कसली आहे. टाटा मोटार्सने आधीच रेवेट्रॉन पेट्रोल इंजिन आणले आहे. महिंद्राही आपले नवे पेट्रोल इंजिन बाजारात आणण्याच्या तयारीत आहे.

असे बदल होणार
अरोरा यांच्या मते, डिझेल कारची मागणी वाढण्यासाठी कार उत्पादक कंपन्या इंजिनाचा आकार घटवण्याबरोबरच त्या इंधन किफायतशीर बनवण्यावर भर देण्याची शक्यता आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटारचे (टीकेएम) उपाध्यक्ष शेखर विश्वनाथन यांनी आपल्या कंपनीच्या योजनेबाबत काही ठोस सांगितले नसले तरी, सर्व कंपन्या आपले प्रॉडक्ट उत्तम राहील यादृष्टीने काम करताहेत. विशेष म्हणजे, देशातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी मारुती सुझुकीने आपल्या ८०० सीसी डिझेल इंजिनाची किंमत नियंत्रणात कशी राहील याकडे सुरुवातीपासूनच लक्ष केंद्रित केले आहे. हे इंजिन सेलेरिओ, वॅगन आर आणि लवकर सादर होणार्‍या हलक्या व्यावसायिक वाहनात (एलसीव्ही) लावण्यात येण्याची शक्यता आहे. याशिवाय मारुती डिझेल कारच्या किमती ५० हजार रुपयांपर्यंत कमी करण्याचे उपाय शोधत आहे. सध्या पेट्रोल कारच्या तुलनेत डिझेल कारसाठी एक ते दीड लाख रुपये जास्त द्यावे लागतात.

छोटे इंजिन ठरणार गेम चेंजर
जाणकारांच्या मते, डिझेल कारची मागणी वाढवण्यात छोटे इंजिन गेम चेंजर ठरू शकतात. असे असले तरी शेव्हरले सारख्या कंपन्यांना याचा अद्याप फायदा उठवता आलेला नाही. शेव्हरलेच्या बीटमध्ये डिझेल इंजिन आहे. मात्र, मारुतीच्या छोट्या ८०० सीसी इंजिनामुळे एंट्री लेव्हल कारच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे डिझेल कारच्या विक्रीत वाढ होण्याची शक्यता आहे. आगामी काळात पेट्रोल व डिझेलचे भाव एकाचवेळी वाढण्याची शक्यता आहे.

- ओरिजनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर्सला (ओईएम) आपल्या धोरणाचा पुन्हा एकदा आढावा घ्यावा लागणार आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांना विक्रीची आघाडी मजबूत करावी लागणार आहे. - मोहित अरोरा, ईडी, जेडी पॉवर, अशिया

- सवलतींचा ट्रेंड पूर्णपणे बदलला आहे. कार कंपन्यांना पेट्रोल-डिझेल कारच्या मागणीत नियंत्रण आणि संतुलन राखावे लागणार आहे. - पुनीत गुप्ता, आयएचएस ऑटोमोटिव्ह सेल्स फोरकास्टिंग