आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divisional Farming Alternative For Agriculture Field

कृषी क्षेत्रातील अडचणींवर गटशेती पर्याय, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांचे मत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आपल्या देशात 70 टक्के लघु शेतकरी असून यांत्रिकीकरणाचा वापर मर्यादित आहे. सामूहिक-संघटित शेती केल्यास या मर्यादांवर मात करता येऊ शकते, असे मत पुणे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी व्यक्त केले.
बारामती येथे सुरू असलेल्या पहिल्या ग्रामीण आंतरराष्‍ट्रीय उद्योजकता परिषदेअंतर्गत कृषी उद्योजकतेच्या संधी या विषयावर ते बोलत होते. या वेळी आयएसएपी या संस्थेचे सुदर्शन सूर्यवंशी, टीसीएस या संस्थेच्या एम-कृषी या प्रकल्पाचे प्रमुख राजेश उरकुडे, हैदराबादस्थित आयकॅप या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अब्दुल रेहमान इलियास व राष्‍ट्रीय शेती-विपणन संस्थेचे निर्देशक डॉ. रमेश मित्तल उपस्थित होते.

प्रभाकर देशमुख म्हणाले, सध्या मातीतील सुपीकता कमी होत आहे. तसेच गेल्या तीस वर्षात जमिनीतील नायट्रोजनचे प्रमाण कमी झाले आहे. यावर सेंद्रिय शेती फायदेशीर ठरू शकेल. तसेच सामूहिक पद्धतीने शेतीव्यवसाय केल्यास यांत्रिकीकरणाचा वापर करणे अधिक सुकर होईल. पण त्याचबरोबर योग्य प्रकारे शेतमालाचे ग्रेडिंग व पॅकिंग केल्यास शेतमालाच्या गुणवत्तेमध्ये सुधारणाही होईल. सामूहिक शेतीमुळे महिलांना निर्णय प्रक्रियेत सहभागी होता येईल. तसेच अडथळ्यांचे योग्य प्रकारे व्यवस्थापन झाल्यास अनेक संधी निर्माण होऊ शकतील, असा विश्वासही देशमुख यांनी व्यक्त केला.

कृषी उद्योजकतेबाबत मार्गदर्शन करताना टीसीएस या संस्थेच्या एम-कृषी या प्रकल्पाचे प्रमुख राजेश उरकुडे म्हणाले, सध्या शेतक-यांच्या मनामध्ये माझ्या उत्पादनाला योग्य किंमत मिळेल का? रास्त दरात संस्थात्मक कर्जे मिळतील का? गुणवत्तापूर्ण खते-कीटकनाशके मिळतील का? असे नानाविध प्रश्न शेतक-यांंपुढे उभे असतात. यावर मात करण्यासाठी कृषी उद्योजकता फायदेशीर ठरू शकेल.

ऐतिहासिक काळापासून भारतामध्ये शेतीचा निरंतर विकास होत गेला आहे. शेतीला पूरक अशी ग्रामीण उद्योजकता विकसित झाल्यास संशोधनाला अधिक वेग येऊन हा विकास असाच पुढे होत राहील. तसेच शेतीविषयक ज्ञानाचे योग्य व्यवस्थापन व अंमलबजावणी केल्यास शेतीक्षेत्रात वेगाने प्रगती घडून येईल, असे शेतीशी संबंधित संशोधनविषयक बाबी अधोरेखित करताना अब्दुल रेहमान इलियास म्हणाले.