आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंतवणूकदारांनी आढावा घेण्याचा कंटाळा करू नये

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


श्रीयुत काळे हे नियमाने म्युचुअल फंडच्या योजनांमध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार, परंतु गुंतवणुकीचा आढावा घेण्याचा त्यांना कंटाळा असतो. आपल्यापैकी अनेकांना आपल्या गुंतवणूक सल्लागाराला ‘नवीन काय?’ असे विचारायची सवय असते. श्रीयुत काळे त्याचेच उदाहरण. कालांतराने त्यांच्या गुंतवणूक संचात अनेक योजना झाल्या. नवीन योजनांपैकी काहींनी योग्य परतावा दिलेलाही नव्हता. 15-20 योजनांनंतर त्यांना लक्षात आले की, कुठेतरी चूक होतीये.

गुंतवणूक संचात अनेक योजना असल्याचा तोटा हा होतो की, गुंतवणुकीचा योग्य आढावा घेता येत नाही. एक योजना चांगला परतावा देत असेल, पण इतर योजना परतावा देत नसतील तर एकूण परतावा कमीच दिसतो. त्या योजना ज्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात त्यामध्येही पुनारावृत्ती होण्याची शक्यता असते.

म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करताना संचात 5-६ योजनाच असाव्यात. उत्तम परतावा देणा-या विस्तारित डायव्हर्सिफाइड लार्ज कॅप (Diversified) Large Cap योजना हा संचाचा मुख्य भाग असावा व त्यानंतर आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार इतर योजनांमध्ये गुंतवणूक करावी. जसे की, सेक्टर फंडमधील योजना, स्मॉलकॅप योजना , मिडकॅप योजना वगैरे. दर 3-4 महिन्यांनी आपल्या गुंतवणूक संचाचा आढावा घ्यावा. हे फार आवश्यक आहे. शेअर बाजाराप्रमाणे पैसे कमी-जास्त होणारच, पण काही मोठे बदल आहेत का? उदा. फंड व्यवस्थापकामध्ये बदल, फंड हाउसेसचे एकत्रीकरण वगैरे हे पाहावे.

गुंतवणूक संच तयार करताना
स्वत:ला पुढील प्रश्न विचारावेत

* गुंतवणूक किती काळासाठी करावयाची आहे?
कमी कालावधीसाठी डेब्ट योजनांमध्ये अथवा लिक्विड योजनांमध्ये गुंतवणूक करावी. मध्यम कालावधीसाठी बॅलन्स्ड फंड अथवा एफएमपीमध्ये पैसे गुंतवावेत. 3-5 वर्षांपर्यंत न लागणारे पैसे इक्विटी फंडमध्ये गुंतवावेत.
* योजनांमधील विभागणी कशी असावी?
गुंतवणुकीचा इक्विटी भाग जास्त असल्यास विस्तारित (डायव्हर्सिफाइड) ईएलएसएस, मिडकॅप , स्मॉलकॅप योजनांमध्ये, डेब्ट भागासाठी डेब्ट योजना व इतर भाग बॅलन्स्ड, एमआयपीमध्ये गुंतवावा.
* किती जोखीम घेण्याची तयारी आहे?
थोडी जोखीम घेण्याची तयारी असल्यास इक्विटी फंडमध्ये गुंतवणूक करावी. जास्त जोखीम घेता येत असेल तर सेक्टोरल फंडमध्ये पैसे गुंतवावेत. पण जर सेन्सेक्सप्रमाणे आपले पैसे कमी-जास्त होताना पाहता येत नसेल तर लिक्विड फंडमध्ये पैसे ठेवावेत. जोखीम जास्त तर परतावाही जास्त हे लक्षात असू द्यावे.
* फंड हाउस कुठले निवडावे?

वेगवेगळ्या फंड हाउसेसमध्ये म्हणजे म्युच्युअल फंडच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करावी, म्हणजे जोखीम विभागली जाते. त्या योजना योग्य परतावा देणा-या आहेत ना याची खात्री करून घ्यावी.
* योजनेची कामगिरी कशी आहे?
म्युचुअल फंडच्या योजनेची कामगिरी तपासताना तिची तुलना त्याच कॅटेगरीतील योजनेशी करणे फार आवश्यक ठरते. तुलनेशिवाय नुसत्याच एखाद्या योजनेच्या कामगिरीच्या आकडेवारीला फारसा अर्थ नसतो.
* फंडचा व्यवस्थापक किती अनुभवी आहे?
योजनेच्या व्यवस्थापक अथवा व्यवस्थापकीय टीमचा अनुभव चांगला असल्यास त्या योजनेची कामगिरी चांगली असण्याची जास्त शक्यता असते.
* टॅक्ससंबंधित गोष्टी काय आहेत?

इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्किम्स (ईएलएसएस) यांना ८0 सी चा टॅक्स बेनिफिट मिळतो. इतर योजनांना 1 वर्षानंतर कमी किंवा शून्य टॅक्स लागतो.आपल्या गुंतवणूक संचात खूप योजना झाल्या असतील तर एकदम पैसे काढून घेण्यापेक्षा कमी परतावा देणा-या योजना त्याच फंड हाउसमधल्या जास्त परतावा देणा-या योजनामध्ये स्विच कराव्यात. अगदीच परतावा न देणा-या योजनांमधील पैसे काढूनही घ्यावेत.परतावा देणा-या योजनेतून नफा काढून घेऊन न चालणारी योजना परतावा देईल म्हणून वाट पाहण्यापेक्षा बराच काळ होऊनही परतावा न देणा-या योजनेतून बाहेर पडणेच योग्य. त्या वेळी एक्झिट लोड किंवा इतर चार्जेस लागतात का याकडे लक्ष द्यावे. योजनांचे उद्दिष्ट पाहावे.योजना स्मॉलकॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करते की लार्जकॅप की मिडकॅप हे पाहावे. योजनेची गुंतवणुकीची पद्धत काय आहे म्हणजे ती फायद्यात चाललेल्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवते-ग्रोथ की सध्या फायद्यात नसलेल्या, पण प्रगतीची क्षमता असणा-या कंपन्यांमध्ये - व्हॅल्यू की दोन्हीमध्ये थोडे थोडे - ब्लेंड हे पाहावे,म्हणजे ती योजना किती खर्चीक आहे ते कळते. गुंतवणूक करताना आपल्यासमोर उद्दिष्ट असावे व त्या उद्दिष्टाशी मिळत्या जुळत्या योजनेत गुंतवणूक करावी.

aboli2308@gmail.com