आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डॉलर महागल्याने डाळी, खाद्यतेलांच्या किंमतीत वाढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - रुपयाच्या तुलनेत डॉलर महाग झाल्याने डाळी आणि खाद्यतेलाची आयात महागली आहे. त्यामुळे देशातील बाजारपेठेत डाळींसह खाद्यतेलांच्या किमतीत तेजी येण्याची शक्यता आहे. गुरुवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाने 61.80 अशी विक्रमी नीचांकी पातळी गाठली होती. या पातळीवरून रुपया काहीसा सावरला असला तरी आगामी काळात घसरणीचा हा कल कायम राहण्याची शक्यता आहे.


रिका ग्लोबल इम्पॅक्स लिमिटेडचे संचालक करण अग्रवाल यांनी सांगितले की, डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने डाळींची आयात महाग झाली आहे. सध्या सौदे चढ्या भावात होत आहेत. याचा परिणाम देशातील बाजारात डाळींचे भाव वाढण्यात होणार आहे. कॅनडा येथून आयात होणा-या पिवळ्या वाटाण्याचे भाव मुंबईत पोहोचल्यानंतर क्विंटलमागे 2850 रुपये झाले आहेत. मागील महिन्यात हे भाव 2600 रुपये होते.


डाळीचे आयातदार संतोष उपाध्याय यांनी सांगितले की, आस्ट्रेलियातून येणा-या हरभ-याचे भाव मुंबईत 2900 रुपये, लेमन (पिवळी) तूर 3751 रुपये, टांझानिया येथील मुगाचे भाव 5000 रुपये ते 5300 रुपये प्रतिक्विंटल आहेत.


डाळींचे सध्याचे भाव
पिवळा वाटाणा 2850 रुपये प्रतिक्विंटल
ऑस्ट्रेलिया हरभरा 2900 रुपये प्रतिक्विंटल
पिवळी तूर 3751 रुपये प्रतिक्विंटल
मूग 5000-5300 रुपये प्रतिक्विंटल
म्यानमार उडीद 3275 रुपये प्रतिक्विंटल
आरबीडी पामोलिन 800 डॉलर प्रतिटन
क्रूड पामतेल 790 डॉलर प्रतिटन


खाद्यतेलांची जास्त उपलब्धता
सॉल्व्हंट एक्सट्रेक्ट्स असोसिएशन ऑफ इंडियाचे (एसईए) कार्यकारी संचालक डॉ. बी. व्ही. मेहता यांनी सांगितले की, जागतिक बाजारात जास्त प्रमाणात खाद्यतेल उपलब्ध आहेत. त्यामुळे देशातील बाजारात खाद्यतेलाचे भाव गतवर्षीच्या तुलनेत 20 टक्क्यांनी कमी आहेत. मात्र, डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने देशातील खाद्यतेलांच्या किमतीत क्विंटलमागे 150 ते 200 रुपयांची तेजी येण्याची शक्यता आहे. मुंबई बंदराचा विचार केल्यास आयात आरबीडी पामोलिन तेलाचा भाव वाढून टनामागे 800 डॉलरवर (सी अँड एफ) पोहोचला आहे. दिल्ली व्हेजिटेबल ऑइल ट्रेडर्स असोसिएशनचे सचिव हेमंत गुप्ता यांनी सांगितले, मोहरीच्या तेलाच्या 660 ते 665 रुपये, सोया रिफाइंड तेलाचा भाव 640-645 रुपये, आरबीडी पामोलिन बंदर पोहोच भाव 530 रुपये, क्रूड पामतेलाचा बंदरपोहोच भाव 500 रुपये होता.