आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर बाजार खाली आल्यानंतर घाबरून जाऊन विक्री नको

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोष्टी आज वेगाने बदलत आहेत
सत्य - दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करणे, लहान- मोठ्या चढ-उतारांचा आपल्यावर परिणाम होऊ न देणे हा गुंतवणुकीचा राजमार्ग आहे. अनेकदा गुंतवणूकदार म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवतात व दुस-या दिवशीपासून पैसे किती वाढले हे पाहायला सुरुवात करतात किंवा एका वर्षात किती होतील असा विचार करतात. त्यात शेअर बाजार खाली आला की घाबरून जाऊन विक्री केली जाते. खरोखर पैशांची गरज आहे अशातला भाग नसतो. असाही विचार केला जातो की, सर्व गोष्टी इतक्या वेगाने बदलत आहेत तर पुढचा भरवसा कोणी द्यावा? हे जरी खरे असले तरी योग्य गुंतवणूक दीर्घ मुदतीत नेहमीच पैसे मिळवून देते.


एफडी सर्वात सुरक्षित व जोखीममुक्त गुंतवणूक आहे
सत्य - एफडी (फिक्स्ड डिपॉझिट) मुदत ठेवींमध्ये जर सर्व पैसे गुंतवले तर ते सुरक्षित असू शकतील, पण जोखीममुक्त आहेत, असे समजणे मात्र चुकीचे ठरेल. कारण त्याला चलनवाढीची जोखीम असते. चलनवाढ समजून घेण्यासाठी एक छोटीशी गोष्ट बघू. कोणे एके काळी रामनगर नावाचे एक गाव होते. त्या गावात खूप चांगले कापड एका लहान कारखान्यात तयार व्हायचे. गावातल्या सगळ्यांना पुरून थोडे उरायचेदेखील. एके दिवशी एक व्यापारी दुस-या गावाहून तेथे आला. व्यापारीच असल्याने त्याला कापडाची पारख होती. त्याने उरलेले कापड विकत घेतले व आपल्या गावी जाऊन विकले. त्यात त्याला खूप फायदा झाला. असे त्याने अनेकदा केले. आता त्याचे उरलेल्या कापडावर समाधान होईना. रामनगरच्या कारखान्याच्या व्यवस्थापकाला थोडे जास्तीचे पैसे देऊन त्याने आपल्या बाजूला करून घेतले व उरलेल्या कापडाहून अधिक कापड आपल्या गावाला नेले. सणासुदीचे दिवस आले. रामनगरमध्ये कापडाची मागणी वाढली; पण कापड कमी पडले. लोक तेच कापड जास्त भावात घ्यायला तयार होते, त्यामुळे व्यवस्थापकाने कापडाचे भाव वाढवले. अशा रीतीने रामनगरमध्ये चलनवाढीचा जन्म झाला. पुढे रामनगरचे व व्यापा-याचे काय झाले हा दुस-या गोष्टीचा विषय आहे. पण ही चलनवाढीची जोखीम लक्षात घेणे मात्र फार आवश्यक आहे. त्यामुळेच सर्व पैसे एफडीमध्ये गुंतवले तर ते थोडा काळ समाधान देतीलही, पण पुढे चालून ते घातक ठरू शकेल.


शेअर बाजार कोसळला / अस्थिर झाला ?
विक्री करा व बाहेर पडा
काळे यांनी एका कंपनीचे काही शेअर्स घेतले. दुस-या दिवशी त्यांनी त्या शेअर्सर्ची किंमत वाढलेली पहिली व ते खुश झाले. त्यानंतर मात्र बाजारच खाली आला व शेअर्सचे भाव कमी झाले. काळे यांनी खरेदी किंमत मिळाली तरी विक्री करण्याचा निश्चय केला व शेअर्समध्ये गुंतवणूक केल्याबद्दल ते स्वत:ला दोष देऊ लागले. काही काळाने काळे यांना खरेदी किमत मिळाली व त्यांनी लगेचच शेअर्स विकून टाकले. पण काय सांगावे ! पुढे त्याच कंपनीच्या शेअर्सची किंमत 10%, 20%, 30% अशी वाढतच गेली. आता काळे खरेदी किमतीला विक्री केल्याबद्दल स्वत:ला दोष देऊ लागले. आपल्यापैकी अनेकांची शेअर बाजारातील गुंतवणूक याच प्रकारची असते याची पुरेपुर कल्पना नसते. पण जे मोठे गुंतवणूकदार आहेत ते मात्र काही वेगळेच सांगतात.
वॉरन बफेच्या मते तर तुम्ही खरेदी केल्यानंतर पुढची दहा वर्षे किमत खाली गेल्यास उत्तम. कारण मुळात गुंतवणूक करतानाच चांगल्या कंपनीत केलेली असते व तिची बाजारातील किंमत काही कारणाने कमी जरी झाली तरी तुम्ही अजून शेअर्स घेऊ शकता. दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केलेली असल्याने पुढच्या तीस वर्षांनंतर भावाची (दर) काळजी करावी जेव्हा विक्री करण्याची वेळ येईल. तसे बघितले तर एखादी चांगली कंपनी जेव्हा थोड्या काळासाठी काही कारणाने अडचणीत आलेली असते तीच तिचे शेअर्स खरेदी करण्याची योग्य वेळ होय. कारण तिची किंमत कमी असली तरी मूल्य अधिक असते. अस्थिर बाजारावर म्युच्युअल फंडमध्ये सिप करून मात करता येते. मात्र, मध्येच विक्री केल्याने सिपचा मूळ उद्देशच नाहीसा होतो. म्हणजे चढत्या दरात खरेदी होते व जेव्हा कमी दरात जास्त युनिट्स मिळण्याची वेळ येते तेव्हा विक्री केलेली असते. त्यामुळेच सेन्सेक्सचे खाली येणे ही एक संधी समजली पाहिजे. 2000 चा टेक्नॉलॉजी क्रॅश, 2001 - 2003 चा खाली आलेला सेन्सेक्स व 200८-200९ चा कोसळलेला बाजार, प्रश्न हा आहे की, आपण तेव्हा खरेदी केली का?