आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जाची थकबाकी कधीच ठेवू नका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्ज थकबाकीदार बनणे आपल्या प्रतिमेसाठी चांगले नाही. कर्ज परिस्थितीमुळे राहिले असेल किंवा जाणूनबुजून थकवले असले तरी प्रतिमेवर डाग पडणारच. मग रक्कम कितीही छोटी किंवा मोठी असली तरी फरक पडत नाही, प्रतिमा डागाळतेच. ब-याचदा अनेक जण एकाच वेळी अनेक कर्जे घेतात. त्याचे नियोजन आणि व्यवस्थापन योग्य ठेवत नाहीत. त्यामुळे थकबाकी वाढते. वाढती महागाई बचतीवर घाला घालते. त्या प्रमाणात उत्पन्न वाढत नाही. व्याजाचे दर कमी होण्याऐवजी वाढतच जातात. यामुळेच अनुत्पादक खर्चात (एनपीए) वाढ होत आहे. कर्जाची परतफेड करणे अवघड झाले आहे. कर्जाची परतफेड करताना अनेकदा आकस्मिक खर्च येतो. एखाद्या वेळी ईएमआय चुकणे आणि नियमितपणे ईएमआय न भरणे या दोन्ही भिन्न बाबी आहेत. कर्ज थकबाकीदार होण्यापासून वाचण्यापूर्वी या शब्दाचा नेमका अर्थ माहिती असणे आवश्यक आहे. जेव्हा एखादी व्यक्ती कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी पूर्ण करत नाही तेव्हा ते कर्ज थकबाकीदार(लोन डिफॉल्टर) म्हणून नोंदले जाते. थकबाकीचा कालावधी वाढत जातो तशा समस्या वाढत जातात. बँक किंवा वित्तीय संस्था कर्जदाराची संपत्ती जप्त करतात. समजा एक किंवा दोन हप्ते राहिले असतील तर योग्य ते दंड शुल्क भरून कर्ज पुन्हा नियमित करता येते.


कर्जाचे सिद्धांत : सध्या परिस्थिती अत्यंत नाट्यमयरीत्या बदलते आहे. मात्र आपली क्षमता आणि भविष्यातील संभाव्य अडचणी यांचा विचार करूनच नेहमी कर्ज घ्यावे. भविष्य अनिश्चित आहे हे कायम लक्षात ठेवावे. व्याजदर वाढत आहेत. कर्ज फेडण्यास अडचणी येऊ शकतात, याचा विचार करावा. फेडण्याच्या क्षमतेनुसार कर्ज घ्यावे.
बचत करावी : कर्ज परतफेडीच्या नादात बचतीकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे नियमित बचत होईल याकडे लक्ष द्यावे. खर्चाचे अंदाजपत्रक तयार करावे आणि शिल्लक रक्कम एका वेगळ्या बँक खात्यात जमा करावी. अत्यंत अडचणीच्या काळातच या खात्यातून रक्कम काढावी. यामुळे कर्ज थकबाकीपासून दूर राहता येईल. समजा एकाच वेळी मोठी रक्कम हाती आल्यास ती बँकेत जमा करून हप्त्यांची फेररचना करण्यास बँकेस सांगावे.


कर्ज देणा-याशी चर्चा हवी : समजा तुम्ही थकबाकीदार असाल किंवा तशी स्थिती असेल तर कर्ज ज्यांच्याकडून घेतले आहे, त्यांच्याशी चर्चा करा. तुमच्या सोयीनुसार कर्जाची फेररचनाही होऊ शकते. मात्र, तुम्ही यापूर्वी नियमित कर्जाची परतफेड केली असेल तरच हे शक्य होईल.


आगाऊ हप्ता हाती ठेवा : एका आगाऊ मासिक हप्त्याइतकी रक्कम नेहमी तुमच्याकडे हवी. यामुळे आपत्कालीन स्थितीत ईएमआयमध्ये खंड पडणार नाही.उदाहरणार्थ : समजा तुमचा मासिक हप्ता 10 हजार रुपये आहे, तर तुमच्या खात्यात किमान 20 हजार रुपये असायला हवेत.


जप्ती टाळा : समजा कर्जाची रक्कम कमी असेल, तर शक्यतो ती लवकरात लवकर फेडा. समजा तुमच्याकडे एखादी मालमत्ता असेल तर ती विकून जप्ती टाळा. जप्त संपत्तीवर बँकेचा मालकीहक्क निर्माण होतो. त्यामुळे शक्यतो इतर स्थावर मालमत्ता विकून जप्ती टाळावी.


कर्जाचा कालावधी वाढवा, रक्कम घटवा : कर्ज देणारा आणि घेणारा यांच्यातील परस्पर सामंजस्यावर हे शक्य आहे. कर्जफेड करण्यास अडचणी येत असतील तर आपण आपल्या कर्जाची फेररचना करू शकतो. कर्जाचा कालावधी वाढवून घ्या आणि मासिक हप्त्याची रक्कम कमी करून घ्या.


बँक बदला : कर्जाची परतफेड करण्याच्या अटींमध्ये व्याजाचे दर महत्त्वाचे असतात. इतर बँकांच्या तुलनेत तुम्ही सध्या जास्त व्याज देत आहात असे निदर्शनास आल्यास आपले कर्ज खाते इतर बँकेत वळवता येते. त्यामुळे काही अटी शिथिल होतील.


लेखक bankbazaar.com
चे सीईओ आहेत.