आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूरदर्शनचे लवकरच मोबाइल फोनवर ‘स्मार्ट’ दर्शन !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- विविध प्रकारच्या गॅजेट्सवर खासगी वाहिन्यांनी कब्जा केलेला असला तरी आता प्रसार भारतीनेदेखील ‘स्मार्ट’ होण्याचा विचार करताना ‘स्मार्टफोन’चा आधार घेतला आहे. त्यामुळे आता स्मार्टफोनबरोबरच टॅब्लेट किंवा लॅपटॉपवर ‘दूरदर्शन’ आणि प्रसार भारतीच्या अन्य 19 वाहिन्या नजीकच्या काळात ‘चकटफू’ बघता येणार आहेत.

प्रसार भारती या राष्ट्रीय स्तरावरील प्रसारण कंपनीने आपल्या मोबाइल टीव्ही सेवेचा विस्तार करण्याची आक्रमक योजना आखली आहे. त्यानुसार किमान 40 शहरांमध्ये ही सेवा सुरू करण्याचा प्रसार भारतीचा मानस आहे. त्यातील पहिल्या दहा शहरात हे वर्ष संपण्याच्या आत ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.

प्रसार भारतीचा हा पहिलाच प्रयत्न नाही. या अगोदर मोबाइल टीव्ही सेवेची चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर दिल्लीमध्ये 2007 मध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा सुरू करण्यात आली; परंतु त्या वेळी वापरण्यात आलेल्या तंत्रज्ञानामुळे केवळ 10 किलोमीटर परिघामध्येच ही सेवा मिळू शकत होती. आता ‘डिजिटल व्हिडिओ ब्रॉडकास्ट टेरेस्ट्रियल (डीव्हीबी-टी 2)’ तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येणार आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे 90 किलोमीटरच्या परिघात ‘सिग्नल’ पोहोचू शकेल, असे मत अधिकृत सूत्रांनी व्यक्त केले.

स्वतंत्र पथक
मोबाइल टीव्ही प्रकल्पाच्या तांत्रिक बाबी सोडवण्यासाठी दूरदर्शनचा अभियांत्रिकी विभाग लक्ष घालणार आहे. दूरदर्शन अधिकार्‍यांचे स्वतंत्र पथक मोबाइल टीव्ही वाहिनीवर राष्ट्रीय प्रसारणाला कोणत्या स्वरूपाची माहिती उपलब्ध करून द्यायची याची तपासणी करतील असे या सूत्रांनी सांगितले.

‘बफरिंग’ नसणारी सेवा देणार
नव्या पिढीमध्ये स्मार्टफोन वापरण्याचे प्रमाण लक्षणीय वाढत आहे. ही आधुनिक मोबाइल टीव्ही सेवा सुरू केल्यास या नव्या बाजारपेठेवरची पकड आणखी घट्ट होऊ शकेल, अशी अपेक्षा प्रसार भारतीच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे. दूरचित्रवाणीचे कार्यक्रम किंवा व्हिडिओ बघताना सध्या ते सुरू होण्यासाठी जास्त वेळ लागतो; परंतु या सेवेमध्ये ‘बफरिंग’ अजिबात होत नाही आणि अधिक सुस्पष्ट दिसते. जणू काही एखादा नेहमीच्या हाय डेफिनेशन टीव्ही बघताना जो आनंद मिळतो तोच येथे मिळणार आहे, असेही या अधिकार्‍याने सांगितले.