आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घसरण : सेन्सेक्स, रुपया, सोने-चांदी! सोने 275 रुपयांनी घसरले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- बुधवारचा दिवस बाजारासाठी घसरणीचा ठरला. सेन्सेक्स 129, तर निफ्टी 39 अंकांनी घसरले. दुसरीकडे रुपयातही 24 पैशांची घट नोंदवण्यात आली. सोन्या-चांदीच्या दरांत अनुक्रमे 275 रुपये व 540 रुपयांची घसरण नोंदवण्यात आली.
मान्सून वेग घेत नसल्याने त्याचा परिणाम देशाच्या आर्थिक वृद्धीवर होण्याची काळजी आणि जागतिक बाजारांत सुस्तीच्या वातावरणामुळे मुंबई शेअर बाजाराचा बीएसई निर्देशांक 129.21 अंकांनी घसरून 17, 489.14 अंकांवर बंद झाला. याच प्रमाणे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 39.05 अंकांनी घटून 5,306.30 अंकांवर बंद झाला. निर्देशांकातील 30 पैकी 25 कंपन्यांनी घसरणीसह बंद झाला. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आयटीसीने 2 टक्के तोटा नोंदवला. मंगळवारी सेन्सेक्सने चार महिन्यांचा उच्चांक गाठत 226 अंकांची वाढ नोंदवली होती.
ब्रोकर्सनी सांगितले की, मान्सूनची सरासरी कमी नोंदवली गेल्याने सरकारच्या आर्थिक वृद्धीदर वाढवण्याच्या प्रयत्नांवर विपरित परिणाम होऊ शकतो. यामुळे चालू तिमाहीत कंपन्यांच्या व्यवसायाचे आकडे रोडावू शकतात. या शंकांनी बाजारात विक्रीचा मारा सुरू झाला. भारतीय शेतीचा आधार असलेला मान्सून देशात सर्व ठिकाणी सक्रीय झाला असला तरी पाऊस सरासरीपेक्षा 23 टक्क्यांनी घटला असल्याच्या हवामान खात्याच्या वृत्तानंतर बाजाराने आणखीच कच खाल्ली. दुसरीकडे यूरोपीय बाजार घसरणीसह उघडले. यामुळे शेअर बाजाराच्या काळजीत भर पडली. वाहन कंपन्यांवर सर्वाधिक विक्रीचा दबाव होता.
‘लेट डॉलर रश’चा फटका- बाजार बंद होत असताना शेवटच्या क्षणी डॉलरला जोरदार मागणी आल्यामुळे रुपयात 24 पैशांची घसरण नोंदवण्यात आली. सरतेशेवटी डॉलरच्या तुलनेत रुपया 55.63 रुपयांवर बंद झाला. सेन्सेक्समध्ये घसरणीचा कल असल्यानेही डॉलरची मागणी वाढली. मात्र, परकीय गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केल्यामुळे रुपयात मोठी घसरण थांबली. रुपयात एक वेळ 55.73 अशी घसरण झाली होती.
सुवर्णखरेदीचा गोल्डन चान्स!- मागणीत घसरणीमुळे राष्ट्रीय सराफा बाजारात बुधवारी प्रतितोळा 275 रुपयांची घसरण नोंदवत सोन्याच्या दराने (99.5 स्टँडर्ड) 29,200 रुपयांची पातळी गाठली. प्युअर गोल्डही (99.9) 275 रुपयांनी स्वस्त होऊन 29,325 रुपये प्रतितोळ्यावर आले. चांदीचे दर किलोमागे 540 रुपयांनी घटून 53,210 रुपयांवर बंद झाले. औरंगाबाद सराफा बाजारातही सोने 250 रुपयांनी स्वस्त झाले. येथे सोन्याचे दर 29,900 रुपये प्रतितोळा झाले. 600 रुपयांच्या घसरणीसह चांदी 52,900 रुपये प्रतिकिलोवर गेली.