आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वस्त आयातीमुळे साखर झाली कडू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - देशातील एकूण मागणीच्या तुलनेत यंदा अतिरिक्त उत्पादन झाले असताना त्यात दुर्दैवाची बाब म्हणजे स्वस्त आयातीमुळे साखरेला किमतीशी जोरदार स्पर्धा करावी लागली. दहा टक्के इतके कमी आयात शुल्क आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घटलेल्या किमती यामुळे कच्च्या आणि प्रक्रिया केलेल्या साखरेची मोठी आवक देशात होत असून त्यामुळे भारतीय साखर उद्योगाला मोठा फटका बसत असल्याकडे ‘कॉन्फेडरेशन आॅफ इंडियन इंडस्ट्रीज’ने लक्ष वेधले आहे. स्वस्त साखर आयातीला निर्बंध घालण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने आयात शुल्कात वाढ करावी, अशी मागणी देखील ‘सीआयआय’ने केली आहे.

देशातल्या 22.5 दशलक्ष टनांच्या मागणीच्या तुलनेत यंदा किमान 24 दशलक्ष टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. याचा अर्थ बाजारात 1.5 दशलक्ष टन अतिरिक्त साखर उपलब्ध राहणार आहे; परंतु पाकिस्तानकडून होणारी प्रक्रियात्मक साखर आणि ब्राझीलकडून होणा-या कच्च्या साखरेमुळे भारतीय साखर उद्योगाला स्पर्धेत टिकाव धरणे कठीण होत चालले आहे. केंद्र सरकारने या आयातीला आळा घालण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज असल्याचे मत लक्ष्य स्ट्रॅटेजिकचे अध्यक्ष आणि सीआयआयच्या साखरेवरील कृती गटाचे सहअध्यक्ष पी. रामबाबू यांनी व्यक्त केले.
ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देण्यात भारतीय साखर उद्योगाचे मोठे योगदान असले तरी हा उद्योग केंद्र आणि राज्य सरकार अशा दुहेरी नियंत्रणात अडकला आहे. त्याच्याच जोडीला अलीकडेच देशभरातील उसाच्या किमतीत झालेल्या वाढीचा सामनादेखील या उद्योगाला करावा लागत आहे. दुस -या बाजूला कमी आयात शुल्कामुळे साखरेची स्वस्त आयात डोकेदुखी ठरली असून त्यामुळे या उद्योगाला मोठ्या प्रमाणावर तोटा सहन करावा लागत आहे. सरकारने 10 टक्के असलेले आयात शुल्क वाढवून 30 टक्क्यांवर न्यावे आणि देशातील साखर उद्योगाला न्याय द्यावा याकडे सीआयआयच्या साखरेवरील कृती गटाचे सहअध्यक्ष अजित श्रीराम यांनी लक्ष वेधले आहे.