आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इन्फोसिसमुळे सेन्सेक्स फुस्स; 257 अंकाची आपटी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- कंपन्यांचे तिमाही आर्थिक निकाल चांगले लागण्याची बाजाराची अपेक्षा इन्फोसिस टेक्नॉलॉजीजच्या कामगिरीने फार धुळीला मिळाली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर असलेल्या या कंपनीने महसुलामध्ये भविष्यामध्ये घट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. परंतु हा अंदाज बाजाराच्या अपेक्षेपेक्षा जास्त असल्यामुळे गुंतवणूकदारांचा मूड गेला. त्यामुळे मे महिन्यात औद्योगिक उत्पादनात झालेल्या थोड्याफार वाढीचा कोणताही सकारात्मक परिणाम न होता सेन्सेक्स एकाच दिवसात 257 अंकांनी आपटला.
सकाळी बाजार उघडण्याच्या आतच इन्फोसिसने जून अखेर संपलेल्या पहिल्या तिमाहीत खराब कामगिरी करताना 2,289 कोटी रुपयांचा संकलिन निव्वळ नफा तर 9616 कोटी रुपयांच्या विक्रीची नोंद केली. इन्फोसिसच्या या निकालामुळे बाजाराचा हिरमोड झालाच. पण त्याहीपेक्षा पुढील तिमाहीत कंपनीचा महसुल घटण्याचेच संकेत दिल्यामुळे बाजारात विक्रीचा मारा सुरू झाला. याचा सगळ्यात जास्त फटका टीसीएस, विप्रोसह अन्य माहिती तंत्रज्ञान कंपन्यांना बसला. परिणामी बीएसई आयटी निर्देशांकाची सर्वात जास्त म्हणजे 5.11 अंकांनी घसरगुंडी झाली.
सेन्सेक्स मधल्या सत्रात 300 अंकांनी गडगडला होता. निर्देशांक दिवस अखेर 256.59 अंकांनी घसरून 17,232.55 अंकांच्या पातळीवर बंद झाला. एक जूननंतर सेन्सेक्सची ही सगळ्यात मोठी घसरगुंडी आहे. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक देखील 71.05 अंकांनी घसरून 5235.25 अंकांच्या पातळीवर बंद झाला. आशियाई शेअर बाजारातील नरमाई आणि युरोप शेअर बाजारातही तसेच वातावरण असल्याने भारती एअरटेल, महिंद्र, टाटा मोटर्स आणि एल अँड टी या बड्या कंपन्यांसह 21 समभागांना फटका बसला.
मे महिन्यातील औद्योगिक कामगिरीत थोडीफार सुधारणा झाल्याने आश्चर्याचा धक्का बसला आहे. पंतु औद्योगिक वृध्दीची अंतिम आकडेवारी मात्र निराशाजनक असेल असा अंदाज एम्के ग्लोबल फायनान्शियल सहप्रमुख धनंजय सिन्हा यांनी व्यक्त केले.
टीएसएस, इन्फोसिसचा तिमाही नफा वाढला
चालू वित्तवर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी टीसीएसच्या एकूण निव्वळ नफ्यात 37.39 टक्क्यांनी तगडी वाढ झाली आहे. कंपनीने मे-जून कालावधीत 3,317.68 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. या कालावधीत कंपनीने एकूण 14, 868.71 कोटी रुपयांचे उत्पन्न कमावले आहे. याआधीच्या वर्षात समान कालावधीत हा आकडा 10,797.02 कोटी रुपये इतका होता.
इन्फोसिस : देशातील दुसरी सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसच्या निव्वळ नफ्यात 32.92 टक्क्यांनी मोठी वाढ झाली. कंपनीचा नफा 2,289 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. 2012-12 वित्तवर्षातील पहिल्या तिमाहीत इन्फोसिसने 1,722 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. बीएसईला दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल-जून तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 28.47 टक्क्यांनी वाढून 9,616 कोटी रुपयांवर पोहोचले.
टॉप लुझर्स- भारती एअरटेल, महिंद्र अँड महिंद्र, टाटा मोटर्स, एल अँड टी, जिंदाल स्टील, टाटा स्टील, बजाज ऑटो, स्टर्लाइट इंडस्ट्रीज, एचडीएफसी
टॉप गेनर्स- ओएनजीसी, हिरो मोटोकॉर्प