आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dull Situation In Share Market Due To Ruppes Develution

रुपयाच्या घसरणीमुळे शेअर बाजारात पुन्हा चिंता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्षभरापूर्वी रुपयाचे मूल्यांकन जगभरात कमी झाले होते. त्या वेळेस जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीची लाट होती. ती अजूनही आहेच. भारतीय अर्थव्यवस्थेत मागील वर्षभरात विकासात्मक धोरणे अमलात आणली, ज्यामुळे मधल्या काही काळात भांडवली व कमोडिटी बाजारात उत्साह व स्थिरता होती. आता पुन्हा रुपयाच्या घसरणीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा संथगतीने विकास वर्तवला जातोय. मुळात रुपया घसरणीची कारणीमीमांसा त्याचा अर्थव्यवस्थेशी व भांडवली बाजाराशी असलेला संबंध जाणावा त्यासाठीच.


रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
रिझर्व्ह बँकेसमोर महागाई दर आणि वित्तीय तोटा आटोक्यात आणण्याचे आव्हान आहे. यामुळे येणा-या पतधोरणात व्याजदर कपातीची शक्यता अवघड असल्याचे भाकीत आरबीआय गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी सुचवले आहे, ज्यामुळे बाजारात रुपयाची पत कमी झाली व शेअर बाजारात नफा नोंदणीद्वारे उतार निदर्शनास आला आहे.


अमेरिकन डॉलर
अमेरिकन डॉलर व डॉलर इंडेक्समध्ये मूल्यवर्धन झाल्यामुळे जगातील इतर चलनांची पत कमी झाली आहे. यामागे दोन प्रमुख कारणे म्हणजे अमेरिकी अर्थव्यवस्थेत झालेले सुधार व कामगार निर्देशांकात झालेली रोजगार वाढ आहेत.


युरोझोन आणि चीन अर्थव्यवस्था
ग्रीस, स्पेन, पोर्तुगाल, इटली, सायप्रस यासारख्या आर्थिक मंदीच्या लाटेत अडकलेल्या देशांना आर्थिक मदत युरोपियन सेंट्रल बँक व इतर आर्थिक संस्थांकडून जाहीर करण्यात आली, ज्यामुळे युरोपियन देशांचे चलन युरोवर दबाव आला आहे व अमेरिकन डॉलरच्या तुलनेत युरोची पत घसरली आहे. त्याचबरोबर चीनची अर्थव्यवस्था जी जगातील दुस-या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे तिथे विकासदरात अपेक्षेपेक्षा कमी प्रमाणात वाढ झाली. ज्यामुळे चीनमधील उत्पादन क्षेत्राला फटका बसला असल्याची चिन्हे असल्याचे मत अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केले व जगभरात धातू जसे - सोने, चांदी, तांबे, निकेल, अ‍ॅल्युमिनियमचे भाव गडगडले व डॉलरमध्ये गुंतवणूक वाढल्याने बाजारात अधिक बळावला.


भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल
भारताने वर्षभरात रिटेल नागरी उड्डयन केबल (डिजिटायझेशन) क्षेत्रात आमूलाग्र धोरण बदल केले आहे, ज्यामुळे आंतरराष्‍ट्रीय बाजारात भारताला चांगले स्थान प्राप्त होण्यास मदत झाली व भांडवली बाजारात परदेशी संस्थांकडून गुतवणुकीस चालना मिळाली. परंतु सततच्या भ्रष्टाचार व इतर घोटाळ्यांमुळे आणि मुदतपूर्व निवडणुकांची शक्यता या कारणांमुळे आंतरराष्‍ट्रीय बाजारात भारताबद्दल गुंतवणुकीबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे, ज्यामुळे रुपयावर दबाव निर्माण झाला आणि आंतरराष्‍ट्रीय पातळीवर नॉन डिलिव्हरेबल फॉरवडर््स (एनडीफ) करार बाजारात चलन बाजारात रुपयाची घसरण झाली व मोठ्या प्रमाणावर भारतात विदेशी संस्थांकडून गुंतवणूक होऊनही रुपयाचे अवमूल्यांकन झाले आहे. आयातीकरिता देण्यात येणारा पैसा डॉलरच्या माध्यमातून देण्यात येतो.
त्यामुळे आयातदार उद्योगधंदे जसे - सोने व चांदी, कच्च्या तेलाच्या कंपन्या यांनी रुपयाच्या घसरणीमुळे अधिक पैसा डॉलरच्या रूपात मोजावा लागत आहे. रुपया घसरणीचा निर्यातदारांना फायदा होतो, परंतु आयात-निर्यात तफावतीमुळे अर्थव्यवस्थेतील वित्तीय तुटीत भर पडते. नजीकच्या काळात रुपयाची पत सुधारण्यासाठी केंद्र शासन व आरबीआय यांना संयुक्तपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. ज्यामुळे सोने, चांदी, कच्च्या तेलाच्या किमती कमी होतील व भांडवली बाजारात उत्साह टिकून राहील. या सर्व बाबींचा विचार करून परिस्थितीस अनुसरून योग्य ते धोरण सरकार अमलात आणेल व देशाच्या विकासाला गती मिळेल, अशी आशा आहे.