आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ड्यूटी फ्री’ विदेशी मद्याची चटक, केरळ, पंजाब सर्वात दारूबाज

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - आयात होणा-या ‘ड्युटी फ्री’ विलायती मद्याची धुंदी देशात ओसंडून वाहू लागली आहे. विदेशी मद्याची आयात येत्या तीन वर्षात दुपटीने वाढून 550 लाख लिटरवर जाण्याचा अंदाज आहे. केरळ आणि पंजाब या राज्यांमध्ये मद्याचा सर्वाधिक खप आहे. देशात 16 टक्के दारू एकट्या केरळात तर 14 टक्के पंजाबात पिली जाते.
भारतीयांत विलायती मद्याची ‘क्रेझ’ आहे. गेल्या दोन दशकांत विदेशात जाणा-या भारतीयांची संख्या वाढली आहे. मायदेशी परतणारे बहुसंख्य भारतीय ‘ड्युटी फ्री’ दालनांमधून मद्याची खरेदी करू लागले आहेत. अ‍ॅसोचेमच्या अभ्यासातून ही बाब पुढे आली आहे. सध्याची विलायती मद्याची आयात 280 लाख लिटर आहे. आंध्र प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, तामिळनाडू व पश्चिम बंगाल ही राज्ये मद्यप्राशनात आघाडीवर आहे. अ‍ॅसोचेमचे मुख्य सचिव डी. एस. रावत म्हणाले, मद्यप्रेमी तरुण व्यावसायिक व उद्योजकांचा कल विलायती ब्रँडकडे झुकतोय. देशीऐवजी त्यांना विलायती ‘नशा’ आवडत आहे. परदेशात जाणारे भारतीय ड्युटी फ्री दुकानांमधून प्राधान्याने मद्य खरेदी करीत आहेत.
भारतीयांचे वाढते ‘मद्यप्रेम’
देशातील मद्याचा खप दरवर्षी 30 टक्क्यांनी वाढतोय. सध्या वर्षाला 7 हजार दशलक्ष लिटर दारू रिचवली जाते. 2015 पर्यंत मद्याचा खप 20 हजार दशलक्ष लिटरवर पोचेल. मद्यप्रेमातून देशाला 52 हजार कोटींचा महसूल मिळाला. तीन वर्षात हा महसूल दोन लाख कोटींवर पोहोचेल.
वाइनची चढती कमान
2008 मध्ये वाइनची बाजारपेठ 800 कोटी होती. वर्षअखेरपर्यंत ती 2700 कोटींवर जाईल. 4 वर्षांपूर्वी वाइनचा खप 40 लाख 60 हजार लिटर होता. यंदा तो 140 लाख 70 हजार लिटरवर पोचेल.
‘व्होडका’ लोकप्रिय
व्होडकाला ‘नवख्यां’ची पहिली पसंती मिळत आहे. याचा खप वर्षाला 25 टक्क्यांनी वाढत असून तो यंदा 100 लाख लिटर होईल.