आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुटसुटीत करप्रणाली, देशी उद्योगाला चालना मिळावी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


सध्या आपली अर्थव्यवस्था विदेशी संस्थांवर विसंबून आहे. स्वावलंबी होण्यासाठी हे चित्र पुसणे आवश्यक आहे. त्यासाठी देशातील उद्योगांना चालना मिळायला हवी, परंतु त्यासाठी अर्थमंत्र्यांनी भरीव तरतुदी करणे आवश्यक आहे. आगामी अर्थसंकल्पाविषयी बजाज ऑटोचे सल्लागार सी. पी. त्रिपाठी यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा त्यांच्याच शब्दांत....
सरकारला सध्या महसूल हवा आहे, तर सर्वसामान्यांना कम्फर्ट. अर्थमंत्र्यांनी या दोन्ही बाबींचा सुवर्णमध्य साधत तरतुदी करायला हव्यात.

येत्या 28 तारखेला जाहीर होणा-या अर्थसंकल्पाकडे सर्वांचेच लक्ष आहे. नेमके काय होणार याबाबत उत्सुकता आहे. मला वाटते, या बजेटमध्ये करप्रणाली, थेट विदेशी गुंतवणूक (एफडीआय), जीएसटी यावरील तरतुदींबाबत अधिक उत्सुकता आहे.

गुंतवणूक
सरकारला सध्या महसूल हवा आहे, आणि सर्वसामान्यांना कम्फर्ट हवा आहे. अर्थमंत्र्यांनी या दोन्ही बाबींचा सुवर्णमध्य साधत तरतुदी करायला हव्यात. आपला शेअर बाजार विदेशी गुंतवणूकदार संस्थांवर (एफआयआय) अवलंबून आहे. हे अवलंबित्व कमी करण्यासाठी तरतूद असावी. स्थानिक पैसा या बाजारात फिरला पाहिजे. किरकोळ गुंतवणूकदारांच्या हिताच्या, योजना जाणीवपूर्वक आखल्या जाव्यात.

एफडीआय
सरकारने रिटेल क्षेत्रात एफडीआयला मुभा दिली आहे. हे कशासाठी ? देशातील उद्योगांना चालना देणारे धोरण असावे. केवळ मूठभर लोकांचे हित पाहून चालणार नाही. देशातील सूक्ष्म, लघु तसेच मध्यम उद्योगांना बहर येईल, असे धोरण आखावे. त्यासाठीच्या भरीव तरतुदी अर्थसंकल्पात दिसाव्यात.

ऑटो क्षेत्र
सरकार आयात वाहनावर अधिक भर का देते हे समजत नाही. याबाबत गांभीर्याने विचार व्हायला हवा. विदेशी गाड्यांसाठी देशातील पैसा मोठ्या प्रमाणात बाहेर जातो. विदेशी वाहनांच्या असेंब्लीवर जास्त खर्च होत आहे. हे टाळण्यासाठी सरकारने लहान कारच्या उत्पादनाला प्रोत्साहन द्यायला हवे. पेट्रोलच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न व्हावेत. युटिलिटी वाहनांना चालना देणा-या तरतुदी असाव्यात.

कर प्रणाली
माझे उत्पन्न इतके आहे, त्यावर किती कर लागणार आहे? या साध्या प्रश्नाची उकल होणारी सुटसुटीत, सुलभ, साधी कर पद्धती असावी. आकारणीत छुपे कर नसावेत. पारदर्शकता असावी. जीएसटी (माल व सेवा कर) लागू होत नसेल तर तोपर्यंत यासाठी एक साधी, सोपी पद्धत आणावी.