आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंदी चक्राचे परिवर्तन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

असे म्हणतात की, ‘चेंज अलोन इज एटर्नल, पर्पेच्युअल अँड इम्मोर्टल.’ याचा अर्थ असा की, परिवर्तन हे एकच सनातन आणि चिरंजीव आहे. जी व्यक्ती वेळेनुसार व काळानुसार स्वत:ला बदलवते तीच कठीण परिस्थितीमध्ये कायमत्व टिकवून ठेवू शकते. वित्तीय क्षेत्रातील सततचे बदल आणि त्यामुळे आपल्या संचीत भांडवलातील वाढणारे नुकसान आणि मंदी चक्राचा वाढणारा वेग यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदार चक्रावला आहे. मंदीचा अंधार आणि अनिश्चितता यांच्या सान्निध्यातसुद्धा चाणाक्ष गुंतवणूकदारांना तेजीच्या प्रकाशाचे कवडसे बघायला मिळतायेत. संधी नेहमी मंदीतच मिळते. तेजीचा बैल पुनश्च धावेल असे संकेत मिळत आहेत. वैशाखवणवा आणि मंदीचे तांडव आता राष्ट्रपतींच्या निवडणूक आणि मान्सूनच्या गतीवर अवलंबून आहे. रिझर्व्ह बॅँकेने रेपो रेट कमी केल्याने आता कमी दरात कर्ज देण्याचे सूतोवाच सार्वजनिक बॅँका करीत आहेत.
रियल इस्टेटमधील गुंतवणुकीवर सरकारचा डोळा आहे हे नुकतेच संसदेत काळ्या पैशासंदर्भात श्वेतपत्रिका काढली त्यावरून लक्षात आले आहे. या रियल इस्टेटमधील गुंतवणूक जमिनीत की बांधकामात हा अभ्यासाचा आणि सल्ल्याचा विषय आहे. सोन्यातील गुंतवणूक आता पहिल्यासारखा उत्पन्न परतावा देईल असे मला तरी सध्या वाटत नाही. एकरात जागा घेऊन ती स्क्वेअर फुटात कशी विकायची हे शास्त्र आहे. रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करताना उपलब्धता, परवडणे आणि अपेक्षा समजावून घेऊन भांडवल आणि भांडवलशाहीचे साम्राज्य कसे चालते ते समजावून घेणे महत्त्वाचे ठरेल.
मंदी चक्र समजून घेण्यासाठी मागील मंदी चक्राचा इतिहास तपासणे गरजेचे आहे. मंदी चक्र सध्या गरागरा फिरते आहे. कारण भारतीय चलन रुपयाची आंतरराष्ट्रीय बाजारातील घटती लोकप्रियता, विदेशी गुंतवणूकदारांचे भारताविषयीचे मत, एफडीआय/एफआयआय बॅँक मनी, रेटिंग डाऊन ग्रेड, वाढते व्याजदर, वित्तीय तूट, संपत्ती निर्माणाऐवजी संपत्ती संरक्षणाला दिले जाणारे महत्त्व, महागाई, वाढत्या क्रूड आॅइलच्या किमती, गार इश्यू म्युच्युअल फंडातील एंट्री लोड, निर्गुंतवणुकीतील सरकारची इच्छाशक्ती, पायाभूत सुविधा, युरोपातील वाढती अनिश्चितता, क ोळसा खाणीतील वाढत जाणारे रहस्य, मनमोहन सिंग यांचे मौन, विकास दरात आलेली घट, भ्रष्टाचार, रियल इस्टेटचे अनरियल भाव यामुळे फंड/ बाजार आऊट झाले. परिणामत: फंडामेंटल विक असल्याने गुंतवणुकीचा फंडा बघून गुंतवणूकदार मेंटल झाला आहे. मेंटल झाल्यावर फंडामेंटलला कोण विचारतो? मंदीमध्ये सर्वत्र निराशा. त्यामुळे सुरुवातीला आर्थिक, नंतर प्रत्यक्ष आणि आता बौद्धिक आऊट होण्याचे चित्र दिसते आहे. ज्या वेळी गुंतवणूकदार चिंता आणि निराशेच्या आहारी जातो त्या वेळी मंदीचे आयुष्य पूर्ण होते आणि तेजीचा जन्म होतो. भय, निराशा, आतंक आणि आत्मसमर्पण होते. सर्वत्र निराशा आणि अनुत्साह दिसतो. लोक हिंसक होतात. परिवर्तन तेथूनच सुरू होते. विनाश, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, प्रांतवाद, भ्रष्टाचार, घोटाळे आणि राजकीय नेतृत्व धूसर दिसते. सर्वसामान्य तर सोडा, परंतु जाणकार नाही म्हणतात त्या वेळी आपण आशादायी व्हावे, तेजीत यावे.
जॉर्ज मेरिडियर यांनी परिवर्तनाची व्याख्या देताना सांगितले की, ‘चेंज इज द स्ट्रॉँगेस्ट सन आॅफ लाइफ’ याचा अर्थ परिवर्तन जीवनाचा सर्वात बलवान पुत्र आहे. म्हणूनच आपण परिवर्तनाच्या या संधीचा फायदा घ्यायला हवा. गुंतवणुकीत आशादायी व्हायला हवे. परिवर्तन होते तेव्हा क्रोधी, क्षुब्ध, विक्षुब्ध होण्याऐवजी शांत, शुद्ध आणि नम्र व्हावे. वेळेची प्रतीक्षा करावी. प्रतीक्षा करणाराच शेवटी जलसा करतो. नकारात्मक विचारसरणीऐवजी सकारात्मक विचारसरणी ठेवून सहिष्णुता, क्षमाभाव यांना प्राधान्य द्यावे. विचलित न होता साहसी व्हावे.
शेअर बाजारात गुंतवणूक करणारे परिवर्तनाचा सामना करतात. गुंतवणूक करताना व्यक्तिविशेष अथवा ब्रॅँड बघून किंवा कंपनीची प्रसिद्धी बघून गुंतवणूक करणे टाळावे. थोडेसे नुकसान सोसून भल्या मोठ्या नफ्याची संधी दाखवणारा शोधावा, परंतु लालची होऊ नये. थोडक्यात, शेअर बाजाराचा ‘प्राइस टू बुक’ ही थिअरी लक्षात घेतल्यास ‘प्राइस टू बुक 3’च्या घरात आल्यास पुढील वर्षभरात 25 ते 30 टक्के नफा मिळतो हे वारंवार सिद्ध झाले आहे. शेअर बाजारात सेन्सेक्स दर दहा वर्षांनी किमान सहापट वाढतो, असा इतिहास आहे. 1979 मध्ये सेन्सेक्स 100 होता. तो 1988 मध्ये 600 झाला. 1998 मध्ये हाच सेन्सेक्स 3600 होता. 2008 मध्ये 21600 झाला होता. त्यामुळे 2014 मध्ये किती? याचा निर्णय आपण घ्यायचा आहे. बाजारात या तेजी-मंदीच्या खेळात प्रत्येकालाच खेळणे व जिंकणे जमणार नाही. फक्त त्यासाठी चांगला सल्लागार कोच म्हणून हवा. आपली त्यावर श्रद्धा हवी आणि आपल्यात सबुरी हवी. हे सर्व प्राप्त करण्यासाठी आपला संपर्क हवा.
iudit@sify.com