आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थव्यवस्था हवी ज्ञानाधारित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेवाक्षेत्रात आपण घेतलेली मोठी झेप, विद्यापीठे आणि बी-स्कूलची वाढती संख्या, यामुळे आपला समाज ज्ञानाधारित समाज झाला आहे, अशा भ्रमात आपण वावरत आहोत. अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या काही सर्वेक्षणांनी हा भ्रम पोकळ असल्याचे दाखवून दिले आहे. जगातल्या 74 देशांतील पाचवीतल्या विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण एका जागतिक संस्थेने केले. त्यामध्ये त्या विद्यार्थ्यांची विज्ञान, गणित आणि वाचनक्षमता या विषयांची चाचणी घेण्यात आली. 74 देशांत आपण या सर्वेक्षणात शेवटून दुसरे आहोत. ‘प्रथम’ या संस्थेने केलेल्या शाळांच्या सर्वेक्षणातही विद्यार्थ्यांची शैक्षणिक कुवत अगदीच कमी असल्याचे दिसून आले आहे.
उत्पादनाबरोबरच ज्ञानावर आधारित सेवाक्षेत्रामध्येही आपली झेप
जागतिकीकरण आणि आर्थिक उदारीकरणामुळे आपली अर्थव्यवस्था अनेक क्षेत्रांत वेगाने प्रगती करीत आहे. उत्पादनाबरोबरच ज्ञानावर आधारित सेवाक्षेत्रामध्येही आपण मोठी झेप घेतली आहे. सन 2020 पर्यंत भारत आर्थिक महासत्ता होणार, असेही आपण म्हणतो आहोत. सरकारनेही वीजनिर्मितीसह वेगवेगळ्या क्षेत्रात मोठे प्रकल्प हाती घेतले आहेत. यामुळे अर्थव्यवस्था पुढील दहा वर्षांत गतीने वाढेल, यात शंका नाही. पण ते होण्यामध्ये मोठी अडचण आहे, ती कुशल मनुष्यबळाची आणि ज्ञानाधारित अर्थव्यवस्था दृढ करण्याची. आजपर्यंत सर्वच अर्थव्यवस्था मुख्यत: औद्योगिक होत्या. साहजिकच त्यांना लागणारे मनुष्यबळही सीमित आणि विशिष्ट प्रकारचे होते. ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेकडे जाताना कुशल मनुष्यबळाच्या संकल्पना आणि गरजाच बदलत जातात. त्याचा विचार तातडीने होणे आवश्यक बनले आहे.
भारतातील बहुतेक शिक्षण संस्थांना जागतिक सर्वेक्षणात रँकिंगच नाही, पाचशे-शंभरात एखादी संस्था
उच्च शिक्षणातही आपल्या संस्थांची स्थिती यापेक्षा फारशी वेगळी नाही. जागतिक सर्वेक्षणामध्ये आपल्याकडील बहुसंख्य संस्थांना कोणतेही रँकिंग मिळवता येत नाही. काही निवडक संस्था पहिल्या 500 मध्ये आणि एखादीच पहिल्या 100 मध्ये झळकते. या सर्वेक्षणांच्या निकषांबाबत अनेक प्रश्न उभे करता येतील हे खरे असले तरी सर्वसाधारणपणे आपली शिक्षण पद्धती जागतिक दर्जाच्या जवळ विद्यार्थ्यांना पोहोचवत नाही हे मान्यच केले पाहिजे. तरीही अनेक जण उत्तम यश मिळवताना दिसतात, ते त्यांची पार्श्वभूमी, सृजनशीलता आणि कर्तृत्व यामुळेच. विद्यार्थ्यांमध्ये या गोष्टींची वाढ केल्याशिवाय आपले कुशल मनुष्यबळाचे प्रश्न सुटणार नाहीत.
काही सरकारी खाती आणि उद्योगसमूहांनी पुढाकार घेतला. वीज क्षेत्रामध्ये येणारे संभाव्य प्रकल्प लक्षात घेता आपल्याला 10 लाख कुशल आणि 5 लाख अकुशल कामगार लागणार आहेत. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या विविध महामंडळांनी आपापल्या क्षेत्रातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था ताब्यात घेऊन तिथे आवश्यक ते नवे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. अनेक उद्योगसमूह आपला प्रत्येक कर्मचारी किमान पदवीधर किंवा अधिक शिकलेला असावा यासाठी सवलती व प्रोत्साहन देत आहेत. यासंदर्भात भारत फोर्जची कामगिरी लक्षणीय आहे. अनेक उद्योगसमूह कर्मचारी प्रशिक्षणासाठी स्वत:च बिझनेस स्कूल सुरू करीत आहेत. त्यामुळे त्यांना आवश्यक असणारे कर्मचारी प्रशिक्षण घेऊन बाहेर पडतील.
शैक्षणिक संस्था, विज्ञान संशोधन संस्था आणि उद्योग संस्था एकत्र येणे आवश्यक
ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेची आणि कुशल मनुष्यबळाची गरज मात्र या प्रयत्नांनी पूर्णत: भागणारी नाही. शिवाय सृजनशील अर्थव्यवस्थेकडे आपला प्रवास सुरू होणेही महत्त्वाचे आहे. यासाठी शैक्षणिक संस्था, विज्ञान संशोधन संस्था आणि उद्योग संस्था एकाच भागात एकत्र येणे आवश्यक आहे. उद्योगांच्या गरजा, समाजाच्या गरजा यांचे आकलन करून संशोधन संस्थांनी आणि विद्यापीठातील विविध विभागांनी प्रयोग केले, तर त्यातून नव्या उत्पादनांची, संकल्पनांची एक मालिका तयार होऊ शकते. आज हे तीनही घटक स्वतंत्रपणे वाटचाल करीत आहेत. त्यामुळे उद्योग आणि सेवाक्षेत्रांना हवे असणारे अभ्यासक्रम विद्यापीठांत सुरू होत नाहीत. विद्यापीठ आणि संशोधन संस्थांत होणा-या संशोधनाचा वापर नवी उत्पादने तयार करण्यासाठी होताना दिसत नाही. एकच उदाहरण देतो, पुण्याजवळ वाहन, र्फोजिंग असे अनेक मोठे उद्योग उभे राहिले आहेत. उत्पादनाची तंत्रे आणि धातू पूर्णपणे बदलली आहेत. साहजिकच त्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षित वेल्डर्स आज मिळत नाहीत. म्हणून अनेक उद्योग अडचणीत आहेत.
यासाठी देशात काही ठिकाणी वर उल्लेख केल्याप्रमाणे काही पायलट प्रकल्प उभे करणे गरजेचे आहे. त्यासाठी ‘लर्न’ अशी संकल्पना यापूर्वी मांडली गेली आहे. यात र्लनिंग, एज्युकेशन आणि रिसर्च नोड यांचा समावेश आहे. आजच्या भाषेत याला एज्युकेशन क्लस्टर असे म्हणता येईल. अशी क्लस्टर्स देशात 5-6 ठिकाणी उभी राहायला हवीत. त्यामध्ये एखादी विज्ञान संशोधन संस्था आणि विद्यापीठ मध्यवर्ती धरून 2-3 मोठे उद्योग आणि मोठ्या संख्येने, येथील संशोधनावर आधारित छोटे नवे उद्योग, यामधून हे क्लस्टर तयार होईल. अशा प्रयोगांतून ज्ञानाधारित अर्थव्यवस्था एकीकडे मजबूत करता येईल आणि दुसरीकडे सृजनशीलतेला अधिकाधिक वाव देत, प्रयोग करीत सृजनशील अर्थव्यवस्थेच्या दिशेने जाता येईल. आपल्या अर्थव्यवस्थेची गती वेगाने वाढवायची असेल तर मनुष्यबळ विकासाचे हे प्रश्न तातडीने सोडवावे लागतील. त्याबरोबरच आपला समाज ज्ञानाधारित होण्यासाठी सर्वच शैक्षणिक संस्थांचा दर्जा आग्रहपूर्वक वाढवावा लागेल.
(लेखक व्हिडिओकॉन समूहाचे अध्यक्ष आहेत.)