नवी दिल्ली- ई- कॉमर्स क्षेत्रातील आघाडीची वेबसाइट flipkart ला 'बिग बिलियन डे' चांगलाच महागात पडला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) flipkart वर दंडान्मक कारवाईचा बडगा उगारला असून तब्बल एक हजार कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. flipkartवर थेट रिटेल व्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच परकीय चलन व्यवस्थापन कायद्याचे (फेमा कायदा) उल्लंघन केल्याचे इडीने बजावलेल्या नोटीशीत म्हटले आहे.
flipkart ने गेल्या आठवड्यात 'बिग बिलियन डे' ही मेगा ऑफर दिली होती. जवळपास 70 विविध प्रकारच्या वस्तूंवर मोठी सवलतच्या दरात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. 'बिग बिलियन डे'ची देशभरात व्यापक प्रमाणात जाहिरातही करण्यात आली होती. परंतु, सेल सुरू होताच ग्राहकांची एकच झुंबड पडल्याने वेबसाइट काही क्षणात क्रॅश झाली होती. त्यामुळे बहुतांश ग्राहक निराश झाले होते.
यामुळे किरकोळ व्यापार्यांनी flipkart विरोधात केंद्रीय वाणिज्य मंत्री निर्मला सीतारमण यांची भेट घेऊन तक्रार केली होती. निर्मला सीतारमण यांनी या प्रकरणी दखल घेऊन अंमलबजावणी संचलनालयाला Flipkart वर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
ई-कॉमर्स कंपन्यांना थेट रिटेल व्यवहार करण्याची परवानगी नाही. flipkart ने परदेशी सब्सिडरीद्वारे भारतात गुंतवणूक केली आहे. flipkart ने एफडीआयच्या माध्यमातून 18 कोटी डॉलर्सची कमाई केली आहे. पण ई-कॉमर्सद्वारे मल्टिब्रॅण्डमध्ये एफडीआय जमा करणे म्हणजे फेमाचं उल्लंघन असल्याचे अंमलबजावणी संचलनालयाने म्हटले आहे.