आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक आखाडा : उमेदवारांचा प्राप्तिकर तपासणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जे उमेदवार विजयी होतील त्यांना खासदारपद मिळणार आहे, मात्र जे उमेदवार निकालात दुसर्‍या, तिसर्‍या स्थानावर राहतील त्यांच्यावर मात्र प्राप्तिकर विभागाकडून तपासणीचा भुंगा मागे लागणार आहे. प्राप्तिकर विभागाकडून या उमेदवारांच्या आर्थिक कुंडलीच्या तपासणीचा निर्णय झाला आहे. उमेदावारांनी दिलेल्या संपत्तीच्या विवरणपत्राची चौकशी होणार आहे. निकालात पहिल्या, दुसर्‍या आणि तिसर्‍या स्थानावर राहिलेल्या उमेदवारांच्या संपत्तीवर प्राप्तिकर विभागाची करडी नजर राहणार आहे.
सध्या लोकसभा निवडणुकीचा आखाडा ऐन रंगात आला आहे. त्या रंगाचा बेरंग करणारा निर्णय प्राप्तिकर विभागाने घेतला आहे. असे असले तरी निवडणूक निकालाच्या आकडेवारीत चौथ्या किंवा त्यापेक्षा जास्त क्रमांकाची मते मिळवणार्‍या उमेदवारांना मात्र दिलासा मिळणार आहे. कारण त्यांचे विवरणपत्र तपासले जाणार नसल्याचे प्राप्तिकर विभागाने स्पष्ट केले. एका लोकसभा मतदारसंघात अनेक उमेदवार असतात त्यामुळे प्रत्येक उमेदवाराची आर्थिक कुंडली तपासणे शक्य नसल्याचे प्राप्तिकर विभागाने स्पष्ट केले.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (सीबीडीटी) आर. के. तिवारी यांनी सांगितले, सर्वच उमेदवारांच्या स्थावर व जंगम मालमत्तेची तपासणी करणे शक्य नाही. देशात 500 च्या वर लोकसभा मतदारसंघ आहेत. प्रत्येक मतदारसंघातून दहापेक्षा जास्त उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतात. या सर्व उमेदवारांच्या संपत्तीची तपासणी, चौकशी करण्यासाठी जास्त कर्मचारी लागतील, तेवढे कर्मचारी मंडळाकडे नाहीत. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघातील दोन किंवा तीन उमेदवारांच्या विवरणपत्रांची तपासणी करणे शक्य आहे. दोन किंवा तीन उमेदवारांच्या विवरणपत्र तपासणीसाठी काय निकष लावणार असे विचारले असता ते म्हणाले, जो उमेदवार विजयी होईल त्यांच्या विवरणपत्राची तपासणी तर होईलच शिवाय निकालात दुसर्‍या व तिसर्‍या क्रमांकांची मते मिळवण्यार्‍या उमेदवारांच्या विवरणपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे.
प्राप्तिकर विभागाच्या अधिकार्‍याच्या मते, ज्या उमेदवाराच्या आर्थिक विवरणाची तपासणी सुरू होईल तेव्हा उमेदवाराने अर्जासोबत सादर केलेल विवरणपत्र समोर ठेवून त्यानुसार तपासणी होईल. त्यात नमूद करण्यात आलेले स्थावर व जंगम संपत्तीचे आकडे एकत्र केले जातील. त्यानंतर प्रत्यक्ष पडताळणी केली जाईल. त्यानंतर त्या उमेदवाराचे वार्षिक रिटर्नची चौकशी होइल. रिटर्नमध्ये जाहीर करण्यात आलेली रक्कम आणि विवरणपत्रातील रक्कम यांचा ताळमेळ लावला जाईल. ताळेबंद जुळला नाही तर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
आर्थिक कुंडली मांडणार
०लोकसभा निवडणुकीत उमेदवार जिंकून येवो अथवा पराभूत होवो प्राप्तिकर विभाग त्यांची आर्थिक कुंडली तपासणार आहे.
०निकालात पहिल्या तीन क्रमांकावर असणार्‍या उमेदवारांच्या संपत्तीची तपासणी करणार.
०वार्षिक रिटर्न आणि शपथपत्रातील रक्कम यांची पडताळणी होणार