आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election Propaganda Materials Buying Increase, Divya Marathi

युती,आघाडी तुटली अन् प्रचार साहित्याच्या विक्रीत आली तेजी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - युती आणि आघाडीतला तिढा संपेपर्यंत निवडणूक प्रचार साहित्य बाजार थंड पडला होता, परंतु युती - आघाडीत बिघाडी झाली आणि या बाजारात चांगली तेजी आली आहे. उमेदवारांची संख्या वाढल्यामुळे ही विक्री २० टक्क्यांनी वाढली असून ब-याच ठिकाणी प्रचार साहित्याचा तुटवडा निर्माण झाला आहे.

लालबागचा परिसर म्हणजे विविध राजकीय पक्षांचे झेंडे, चिन्हांची मुद्रा असलेले टी शर्ट, मफलर, टोप्या, बिल्ला आदी विविध साहित्य मिळण्याचे माहेरघर. या भागातल्या एका पदपथावर जवळपास आठ ते दहा दुकाने आहेत. प्रचारासाठी अवघे काही दिवस उरल्याने साहित्य खरेदीसाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांची लगीनघाई सुरू आहे. विशेष म्हणजे भाजप- सेना, काँग्रेस - राष्ट्रवादी यांनी काडीमोड घेतल्यानंतर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची राळ उठवली असली तरी या दुकानांमध्ये सर्व पक्ष गुण्यागोविंदाने नांदत असल्याचे चित्र बघायला मिळते.
युती, आघाडीतील जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याने उमेदवारांची नावे जाहीर होत नव्हती. त्यामुळे लालबागमध्ये कोणीही फ‍िरकले नाही, पण युती तुटल्यानंतर मात्र निवडणूक प्रचार साहित्य विक्रीचा वेग वाढला. काँग्रेस- राष्ट्रवादी आणि शिवसेना - भाजप यांच्यात इतके वर्षे युती असल्यामुळे संख्या मर्यादित होती, परंतु आता सगळेच वेगळे झाल्यामुळे प्रचार साहित्याची मागणी वाढली आहे. ब-याच प्रचार साहित्याचा तुटवडा निर्माण झाल्याचे पारेख ब्रदर्सचे मालक दिलीप पारेख यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

उमेदवारी जाहीर झाल्यापासून ते निवडणुकीच्या तारखेपर्यंत प्रचारासाठी कमी कालावधी असल्याने प्रत्येकाची प्रचार साहित्य पदरात पाडून घेण्याची धडपड सुरू आहे. नव्याने मोठी ऑर्डर घेऊन ती ठरावीक वेळेत पूर्ण करून देण्यासाठी या दुकानदारांचीदेखील दमछाक होत आहे.

प्रचार साहित्याची मागणी वाढलेली असली तरी किमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. पण मुळात अहमदाबाद, सुरत, दिल्ली येथून मालच येत नसल्याने तुटवडा निर्माण झाला आहे, असे पारेख म्हणाले. बॅजेस, मफलर, टोप्यांना जास्त मागणी असल्याचे ‘तेंडुलकर्स’चे एस. ए. तेंडुलकर यांनी सांगितले.

निवडणूक प्रचार साहित्याची विक्री २० टक्क्यांनी वाढली आहे. अजूनही १० पीसेसची अधिक ऑर्डर असली तरी ती पूर्ण करून देण्यासाठी पुरेसा कालावधी नाही, असे अन्य एका प्रचारसाहित्य विक्रेत्याने सांगितले.

डमी मतदान यंत्र देणार मतदारांना धडे
प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी व्होटिंग मशीनवर बटण दाबताना अनेक मतदारांचा गोंधळ होतो. हा गोंधळ न होता मतदारांना आपल्या उमेदवाराला योग्य प्रकारे मतदान करता येण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यासाठी एक डमी मतदान यंत्रदेखील बाजारात आले आहे.