आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Electricity Companies Give Powerfull Return To Share Holders

वीजनिर्मिती कंपन्यांच्या समभागांनी दिला पॉवरबाज परतावा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली,/मुंबई - आर्थिक विषयावरील केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने (सीसीईए) शुक्रवारी वीजनिर्मिती करणा-या कंपन्यांना दरवाढीस अनुमती दिली. यामुळे घसरणीच्या अस्वलावर स्वार असलेल्या बाजारात वीजनिर्मिती क्षेत्रातील समभागातील तेजीने गुंतवणूकदारांच्या पदरात चांगला परतावा टाकला. या निर्णयामुळे वीजनिर्मिती कंपन्यांच्या समभागात दोन टक्क्यांपर्यंत तेजी आली. पॉवर शेअर्समधील यो तेजीने पॉवरबाज परतावा दिल्याने गुंतवणूकदारांना घसरणीत दिलासा मिळाला.


सातत्याने घसरणारा रुपया आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने दिलेल्या संकेतामुळे गुंतवणूकदारांची झोप उडाली आहे. याचाच परिणाम होऊन गुरुवारी सेन्सेक्स 529 अंकांनी आपटला होता. मात्र, शुक्रवारी शेअर बाजारात तेजी आली. सीसीईएच्या निर्णयामुळे वीज ग्राहकांना भुर्दंड सोसावा लागणार आहे. रुपयाच्या अवमूल्यनाने वीजनिर्मितीसाठी आयात कराव्या लागणा-या कोळशासाठी कंपन्यांना जास्त दाम मोजावे लागत आहे. सीसीईएने हा बोजा ग्राहकांवर टाकण्यास म्हणजेच वीज दरवाढीला अनुमती दिली. या निर्णयाने गुंतवणूकदारांना नवी संधी मिळाली. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (एनटीपीसी), टाटा पॉवर लिमिटेड आणि पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपन्यांच्या समभागांवर शुक्रवारी गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या. मुंबई शेअर बाजारात (बीसीई) एनटीपीसीचे शेअर्स 2.11 टक्क्यांनी वाढले. पॉवर ग्रिडचे समभाग 1.18 टक्के वधारले तर टाटा पॉवरचे शेअर्स 0.74 टक्के वाढीसह बंद झाले.


सरकारच्या निर्णयाबाबत अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सांगितले, आर्थिक विषयावरील कॅबिनेट समितीने वीजनिर्मितीसाठी आयात कराव्या लागणा-या कोळशासाठी येणारा खर्च ग्राहकांकडून वसूल करण्यास परवानगी दिली आहे. यामुळे देशातील विजेच्या दरात वाढ होणार आहे. प्रतियुनिटसाठी ही वाढ नाममात्र असेल व आयात कोळशाच्या किमतीवर ही वाढ अवलंबून असेल असे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले.
देशभरातील विजेच्या दरात आता 15 ते 17 टक्के वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. देशात 2009 नंतर स्थापन झालेल्या 78,000 मेगावॅट क्षमतेच्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांसाठी हा दरवाढीचा निर्णय लागू होईल. यात 38,000 मेगावॅटच्या नव्या प्रकल्पांचाही समावेश आहे.


बीएसई : ऊर्जा समभागांची शुक्रवारची चाल
कंपनी खुला भाव बंद भाव परतावा
एनटीपीसी 140 रु. 143.05 रु. 2.11 टक्के
पॉवर ग्रिड 105.05रु. 107.15 रु. 1.18 टक्के
टाटा पॉवर 81 रु. 81.60 रु. 0.74 टक्के