नवी दिल्ली - देशातील टेलिकॉम क्षेत्रात आगामी काळात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. आगामी वर्षभरात या क्षेत्रात 7000 हून जास्त जणांना नोक-या मिळण्याची शक्यता आहे. टेलिकॉम ऑपरेटर कंपन्यांची संघटना सीओएआयने ही माहिती दिली.
सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या (सीओएआय) मते, टेलिकॉम क्षेत्रासाठी मागील वर्ष अत्यंत खडतर गेले. अनेक कंपन्यांना मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करावी लागली होती. मात्र, आगामी वर्षभरात या क्षेत्रात 10 टक्क्यांहून जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.रिलायन्स जिओ, व्होडाफोन आणि भारती एअरटेल यांसारख्या कंपन्यांची विस्तार योजना पाहता संधी जास्त प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.
रिलायन्स जिओचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी सांगितले, येत्या वर्षभरात 10 हजार जणांना रिलायन्सच्या टेलिकॉम कंपन्यांत रोजगार मिळणार आहेत.व्होडाफोनच्या मते, कंपनीच्या विस्तार योजनेनुसार 1800 जणांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे भारती एअरटेलने नव्या कर्मचारी भरतीची योजना तयार केली असून लवकरच भरती करण्यात येणार आहे.