आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखंडित विद्युत पुरवठा हवा, ऊर्जा मंत्रालयाची अपेक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - केंद्रातील नव्या सरकारने चोवीस तास वीजपुरवठा आणि इंधन तुटवड्यातील पोकळी भरून काढणे यावर सगळ्यात जास्त लक्ष केंद्रित करावे, अशी अपेक्षा ऊर्जा मंत्रालयाने व्यक्त केली आहे. याबाबतचे एक सादरीकरणही मंत्रालयाने नवे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केले आहे.
देशातील जल ऊर्जेतील विपुल संधी, पारेषण क्षेत्रातील सुधारणा तसेच वीज वितरण कंपन्यांची आर्थिक व्यवहार्यता या दृष्टीनेदेखील सरकारने पावले उचलण्याची गरज आहे. कोळसा खाणींना पर्यावरणात्मक आणि वन मंजुर्‍यांना वेग देऊन इंधन तुटवडा कमी करता येऊ शकेल याकडेही ऊर्जा मंत्रालयाने लक्ष वेधले आहे. देशातील कोळसा उत्पादनाची गती मंदावल्यामुळे औष्णिक प्रकल्पांच्या क्षमतांमध्ये वाढही झालेली नाही. भूसंपादनातील विलंब, पर्यावरण आणि वन मंजुरी आदी विविध गोष्टी यासाठी कारणीभूत असल्याचे मंत्रालयाने आपल्या 14 पानी सादरीकरणात म्हटले आहे.
अंमलबजावणीच्या अंतिम टप्प्यावर असलेल्या ऊर्जा प्रकल्पांसाठी असलेल्या कोळसा खाणी रद्द करण्यात आल्या असून त्याचाही नव्या सरकारने आढावा तसेच देशातील वायू उत्पादनात वाढ करणे, प्रस्तावित वायू किमतीत वाढीमुळे वीज दरवाढीवर मर्यादा घालणे त्याचप्रमाणे इंधन पुरवठ्याची खात्री न मिळाल्यामुळे रखडलेल्या ऊर्जा निर्मिती प्रकल्पांना आर्थिकदृष्ट्या दिलासा द्यावा, असेही ऊर्जा मंत्रालयाने सुचवले आहे.