आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आता प्रत्येक जण मिळवू शकतो पेन्शन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाढती महागाई, मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांचे वाढते प्रमाण अशा या ना त्या कारणाने प्रत्येकालाच आपल्या सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्याची चिंता वाटत असते. कारण नियमित मिळणारा पगार बंद झालेला असतो; पण खर्च तर चालूच असतात. बचतही केलेली असते. पण इन्फ्लेशनच्या भस्मासुरापुढे त्याचा कितपत टिकाव लागेल हासुद्धा प्रश्नच असतो. अशा वेळेस पेन्शनचा खूप आधार वाटतो. आजकाल पेन्शनची सुविधा खूप कमी ठिकाणी असते. या परिस्थितीत एका नियमित उत्पन्नाची गरज फार भासते.
जर सुरुवातीपासूनच नियोजन केले तर प्रत्येक जण पेन्शन मिळवू शकतो. यासाठी एक तर थोडे थोडे पैसे दरमहा गुंतवत राहावे किंवा सेवानिवृत्तीच्या वेळी एखादी मोठी रक्कम हातात आल्यास ती गुंतवावी. यात आपण बँक एफडी, पोस्ट एमआयएस (पोस्टाची मंथली स्किम), सरकारचा पीएफआरडीए प्लॅन, अशा गुंतवणुकी करू शकतो अथवा विमा कंपन्यांच्या पॉलिसीज घेऊ शकतो. या गुंतवणुकीतून आपल्याला दरमहा ठरावीक रक्कम पेन्शन म्हणून मिळू शकते.
थोडी जोखीम घ्यायची तयारी असेल तर पेन्शन मिळवण्याचा अजून एक उत्तम पर्याय आहे. तो म्हणजे म्युच्युअल फंडचे एसडब्ल्यूपी (सिस्टेमॅटिक विथड्रॉवल प्लॅन) हे आॅप्शन हे सिप (सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन)च्या बरोबर विरुद्ध म्हणता येईल. ज्याप्रमाणे सिपमध्ये नियमितपणे एक ठरावीक रक्कम भरावयाची असते त्याप्रमाणे एसडब्ल्यूपीमध्ये एक ठरावीक रक्कम नियमितपणे काढता येते. यामागची मूळ कल्पना अशी आहे की, प्रथम म्युच्युअल फंडाच्या चांगला परतावा देणाºया एखाद्या इक्विटी योजनेत मोठी रक्कम (3-4 लाख वा त्याहून अधिक) गुंतवावी व एसडब्ल्यूपी आॅप्शन द्यावे. यानंतर एक वर्ष थांबावे, ज्यामुळे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्सपासून आपली सुटका होईल. यानंतर योजनेवर मिळणाºया परताव्यातून दरमहा आपण निवडलेली रक्कम आपल्याला पेन्शन म्हणून मिळेल. ही इक्विटीमधील योजना असल्याने आपल्याला कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यावी लागेल; पण इन्फ्लेशनवर यामुळे मात केली जाईल. तसेच मिळणाºया पेन्शनवर कर लागणार नाही. यासाठी योजना निवडताना विचारपूर्वक निवडावी.
म्युच्युअल फंडाच्याच एमआयपी (मंथली इन्कम प्लॅन) म्हणूनही योजना आहेत. त्या मंथली इन्कम म्हणून परताव्यातून डिव्हिडंड देतात; परंतु त्यांना डिव्हिडंड नियमितपणे देणे बंधनकारक नसते. याउलट आपण एसडब्ल्यूपी आॅप्शन दिल्यावर नियमितपणे विथड्रॉवलची रक्कम देणे बंधनकारक असते. त्यामुळे आपणास खात्रीशीररीत्या पेन्शन मिळते. सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य आनंदाने घालवण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. त्यामुळेच नोकरीमधून पेन्शन मिळणार नसेल तरी निराश होण्याचे कारण नाही. कारण तुमची डोळसपणे केलेली गुंतवणूकच मिळवून देईल तुम्हाला पेन्शन.
(लेखिका आयएफए, गुंतवणूक सल्लागार आहेत)