आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनेरी टेन्शन: सोने तस्करीचा वाढता धोका

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- चालू खात्यातील वित्तीय तूट कमी करण्यासाठी सरकारने सोन्यावरील आयात शुल्कात दोन टक्के वाढ केली. यामुळे सोन्याची आयात किती कमी होईल हे काळच सांगेल, परंतु आता सोन्याची तस्करी वाढण्याचा धोका वाढला आहे. अधिकार्‍यांनी तस्करी होत नसल्याचा दावा केला असला तरी या क्षेत्रातील जाणकारांनी मात्र चोरट्या वाटेने भरपूर प्रमाणात सोने देशात येत असल्याचे म्हटले आहे. तस्करीच्या माध्यमातून चालू आर्थिक वर्षात 250 टन सोने देशात येईल, असे मत जाणकारांनी व्यक्त केले.

दिल्ली बुलियन अँड ज्वेलरी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष व्ही. के. गोयल यांच्या मते भारतीय संस्कृतीत सोन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक रितीरिवाज सोन्याशिवाय पूर्णच होत नाहीत. त्यामुळे सोन्याला कायम मागणी असते. एखाद्या घरात मूल जन्माला आले तरी सोने खरेदी करतात, तसेच काही शुभकार्य असेल तर सोन्याशिवाय काहीच चालत नाही. वर्षभरात अनेक असे मुहूर्त आहेत, ज्यावर या पिवळ्या धातूची खरेदी शुभ मानली जाते. अशा स्थितीत सरकारने कितीही प्रयत्न केले तरी सोन्याची खरेदी कमी होणार नाही. सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यास तस्करी करणार्‍यांचे चांगलेच फावणार आहे.

ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरीचे माजी अध्यक्ष व नेमीचंद बलदवाचे संचालक बछराज यांनी रॉयटर्स जीएफएमएसद्वारा जागतिक सुवर्ण परिषदेसाठी करण्यात आलेल्या एका अहवालाचा हवाला देत सांगितले, 2012 या वर्षात तस्करीच्या वाटेने 100 टन सोने भारतात आले. सध्या बाजारात ज्या बातम्या आहेत त्यानुसार यंदा 200 ते 250 टन सोने चोरट्या वाटेने देशात येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, 16 जानेवारी 2012 पर्यंत देशात आयात होणार्‍या सोन्यावरसोन्याचा आयात भाव कितीही असला तरी तोळ्यामागे 300 रुपये शुल्क लागायचे. 17 जानेवारी 2012 पासून हा दर आयात शुल्काला जोडण्यात आला व शुल्क दोन टक्के करण्यात आले. 17 मार्च 2012 रोजी यात वाढ करून आयात शुल्क चार टक्के करण्यात आले. 21 जानेवारी 2013 मध्ये यात पुन्हा दोन टक्के वाढ होऊन आयात शुल्क सहा टक्के झाले आणि पाच जूनपासून ते आठ टक्के करण्यात आले. त्याआधी रिझर्व्ह बँकेने सोने तारण कर्जासाठी बँकांवर अनेक निर्बंध घातले. सोने आयातीला आळा बसण्यासाठी हे उपाय करण्यात आले. कस्टम विभागाच्या एका अधिकार्‍याने सांगितले की, सोन्याची तस्करी वाढली असली तरी त्यात किंचित वाढ झाली आहे, परंतु चिंता करण्यासारखी बाब नाही.