मुंबई/नवी दिल्ली - अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कार्यक्रम केंद्र सरकारने जाहीर केला आहे. त्यामुळे बाजारात अर्थसंकल्पापूर्वीची तेजी बघायला मिळाली. त्यातूनही बाजारात सातत्याने निधीचा ओघ येत असल्यामुळे बाजारात झालेल्या तुफान खरेदीत सेन्सेक्स आणि निफ्टी यांनी पुन्हा एकदा नव्या उच्चांकाची नोंद केली.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक २८,८४३.०९ अंकांच्या कमाल पातळीवर उघडला आणि त्याने दिवसभरात २८,९५८.१० अंकांची कमाल पातळी गाठली. दिवसअखेर सेन्सेक्स १०४.१९ अंकांनी वाढून २८,८८८.८६ अंकांच्या पातळीवर बंद झाला. सेन्सेक्सने मंगळवारचा २८,८२९.२९ अंकांचा विक्रम मोडून काढला. गेल्या पाच सत्रांत सेन्सेक्सने १५४२.०४ अंकांची कमाई केली आहे. राष्ट्रीय बाजारातील निफ्टीचा निर्देशांकदेखील दिवसभरात ८७४१.८५ अंकांची पातळी ओलांडून ८७०७.९० अंकांच्या नव्या कमाल पातळीवर गेला. निफ्टी दिवसअखेर ३३.९० अंकांनी वाढून ८७२९.९० अंकांच्या कमाल पातळीवर बंद झाला. जागतिक शेअर बाजारातील सकारात्मक कल, संमिश्र पातळीवर बंद झालेला आशियाई शेअर बाजार, युरोपातील मध्यवर्ती बँक स्टिम्युलस पॅकेजसाठी उपाययोजना करण्याबाबत पावले उचलण्याच्या अपेक्षेतून युरोप शेअर बाजारातही तेजीचे वातावरण होते. रिझर्व्ह बँकेच्या व्याजदर कपातीनंतर विदेशी निधी संस्थांकडूनही मोठ्या प्रमाणावर निधीचा ओघ येत आहे.
सोन्याला तेजीची झळाळी, चांदी ४० हजार पार
देशातील लग्नसराई आणि जागतिक सराफा बाजारातील सकारात्मक कल यामुळे सराफा बाजारात सलग पाचव्या दिवशी तेजी दिसून आली. राजधानी दिल्लीच्या सराफ्यात सोने तोळ्यामागे ३२० रुपयांनी वाढून २८,५०० वर पोहोचले. हा सोन्याचा पाच महिन्यांचा उच्चांक आहे. चांदीही किलोमागे ९५० रुपयांनी चकाकून ४०,१५० झाली. चांदीने चार महिन्यांनंतर ४० हजारांचा टप्पा पार केला. सराफा व्यापा-यांनी सांगितले, लग्नसराईमुळे सोन्याला चांगली मागणी आहे. त्यातच जागतिक बाजारातून चांगले संकेत मिळाल्याने सोन्याच्या किमती वाढल्या. औद्योगिक क्षेत्रातून चांगली मागणी आल्याचा फायदा चांदीला झाला. सिंगापूर सराफ्यात सोने औंसमागे (२८.३४ ग्रॅम)०.६ टक्क्यांनी वाजून १३०३.६३ डॉलरवर पोहोचले. ऑगस्ट २०१४ नंतर प्रथमच सोन्याने ही पातळी नोंदवली आहे. देशातील सराफ्यात मागील पाच सत्रांत सोने तोळ्यामागे ११८० रुपयांनी वाढले आहे.
रुपयाला तरतरी : विदेशी मुद्रा विनिमय बाजारात सलग पाचव्या सत्रात रुपयाने डॉलर ची धुलाई केली. डॉलरच्या तुलनेत रुपयाने ६ पैशांची कमाई करत ६१.६३ पर्यंत मजल मारली. वितरकांनी सांगितले, बँका आणि निर्यातदारांनी डॉलरची विक्री केल्यामुळे रुपयाला बळ आले.