आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्झिट पोलचा धमाका, तेजीचा धडाका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पाच राज्यांवर भाजपचे राज्य येणार असल्याचे संकेत विविध एक्झिट पोलने दिल्यानंतर बाजारात तेजीचे वारे घुमले. खुश झालेल्या गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदीचा धडाका लावल्याने निर्देशांकांनी उच्चाकांचा धडाका लावला. तिकडे रुपयाने डॉलरची यथेच्छ धुलाई करत एक महिन्याच्या उच्चांकासह एकसष्टी पातळीत प्रवेश केला. लग्नसराईमुळे सोन्याला मागणी आली आणि सोने तेजीने चकाकले.
सेन्सेक्सचा महिन्याचा उच्चांक
एक्झिट पोलच्या संकेताने खुश झालेल्या गुंतवणूकदारांनी गुरुवारी सत्राच्या प्रारंभापासूनच खरेदीचा धडाका लावला. त्यामुळे सेन्सेक्स 249.10 अंकांनी वाढून 20,957.81 वर बंद झाला. निफ्टीने 80.15 अंकांच्या कमाईसह 6241.10 ही पातळी गाठली. इंट्राडे व्यवहारात एकवेळ सेन्सेक्सने 21,165.6 पर्यंत मजल मारली होती. नंतर मात्र नफा वसुलीमुळे पातळी खाली आली. सेन्सेक्सच्या यादीतील 30 पैकी 20 समभाग उसळले. तर 13 क्षेत्रीय निर्देशांकांपैकी बँक आणि भांडवली वस्तू क्षेत्रीय निर्देशांकासह नऊ निर्देशांक चमकले. एक्झिट पोलमध्ये भाजपची सरशी होत असल्याचे कल पाहून बाजार सुखावला आणि तेजी आल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. आशिया आणि युरोपातील बहुतेक बाजारात तेजीचे वातावरण होते.
तेजीचे मानकरी
आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, लार्सन अँड टुब्रो, भेल, मारुती सुझुकी, कोल इंडिया.
रुपया 30 पैशांनी वाढून 61.75
एक्झिट पोलने भाजपने पारडे जड असल्याचे संकेत दिल्याचा फायदा रुपयालाही झाला. शेअर बाजारातून विदेशी गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केल्याने डॉलरच्या तुलनेत रुपया वधारला. रुपयाने 30 पैशांची कमाई करत 61.75 पातळीपर्यंत मजल मारली. निर्यातदार आणि बँकांकडून डॉलरची जोरादार विक्री केल्याने रुपयाला बळ मिळाले.
गुंतवणूकदारांनी पुढे काय करावे
0 सेन्सक्स पुन्हा एकदा 21 हजारांच्या उंबरठय़ावर आहे. अशा वेळी गुंतवणूकदारांनी काय करावे याबाबत आनंद राठी ब्रोकर्सचे वरिष्ठ व्यवस्थापक विश्वनाथ बोदाडे यांनी दिलेल्या टिप्स :
0 सजगतेने संधी शोधा व त्या कॅश करा. बर्‍याच गोष्टी बाजारात नव्याने घडत आहेत. त्यासाठी योग्य धोरण आखून संधीचा लाभ घ्या
0 नेहमी ब्ल्यू चिप कंपन्यांत गुंतवणूक करा. बाजाराच्या जास्त प्रेमात पडू नका, मात्र नफ्यावर प्रेम करा.
0 बाय ऑन डीपनुसार म्हणजेच घसरणीच्या वेळी खरेदी आणि तेजीत विक्री हा नियम लक्षात ठेवून व्यवहार करा.
मागणीमुळे सोने चकाकले
सध्या सुरू असलेली लग्नसराई आणि जागतिक सराफा बाजारातील सकारात्मक कल यामुळे गुरुवारी सोने तेजीने लखलखले. राजधानी दिल्लीच्या सराफ्यात सोने तोळ्यामागे 450 रुपयांनी वाढून 31,250 झाले. गेल्या दोन सत्रांपासून सोन्याच्या किमतीत घसरण होती. चांदीतील घसरण मात्र कायम राहिली. चांदी किलोमागे 200 रुपयांनी घटून 43,800 झाली. नाणे तयार करणारे आणि औद्योगिक क्षेत्रातून मागणी नसल्याचा फटका चांदीच्या किमतीला बसला. सराफा व्यापार्‍यांनी सांगितले, लग्नसराईमुळे सोन्याला चांगली मागणी होती, त्यातच स्टॉकिस्टांनी चांगली खरेदी केल्याने सोने वधारले. न्यूयॉर्क बाजारात सोने औंसमागे (28.34 ग्रॅम) 19 डॉलरने वाढून 1243.30 डॉलरपर्यंत पोहोचले. देशातील सराफा बाजारात गेल्या दोन सत्रांत सोने तोळ्यामागे 725 रुपयांनी स्वस्त झाले होते. चांदीतील घसरण तिसर्‍या सत्रांतही कायम राहिली गेल्या दोन सत्रांत चांदी किलोमागे 1075 रुपये स्वस्त झाली आहे.