आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निफ्टी मर्यादित कक्षेत राहण्याची शक्यता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागील आठवड्यात देशातील शेअर बाजार अपेक्षेप्रमाणे तेजी कमावून बंद झाले. फेडरल रिझर्व्हच्या रोखे खरेदी कपातीकडे बाजाराने विशेष लक्ष दिले नाही. मागील आठवड्यात या स्तंभात फेडरल रिझर्व्हच्या बैठकीनंतर बाजारात काही प्रमाणात नफा वसुली आणि कन्सोलिडेशन दिसून येईल आणि नंतर तेजी येईल, असे नमूद केले होते. अगदी लिहिल्याप्रमाणेच घडले. गुरुवारी निप्टी 50.50 अंक घसरून बंद झाला. शुक्रवारी त्यात 107.60 अंकांची तेजी दिसून आली. सोमवारी 6317.50चा उच्चांक गाठल्यानंतर मंगळवारी निफ्टी 6268.40 वर बंद झाला. जगातील प्रमुख बाजारात सध्या नाताळ सुट्यांचा मोसम आहे. ते लक्षात घेऊन गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला. मात्र, बाजारात सकारात्मक कल आहे. गुरुवारी डिसेंबरमधील वायदा सौद्यांची अंतिम तिथी आहे. त्यामुळे बाजारात अस्थैर्य दिसून येईल.
जागतिक पातळीवर नाताळच्या सुट्यांमुळे प्रमुख बाजारांकडून तूर्तास काही संकेत मिळण्याची शक्यता कमी आहे. असे असले तरी चीन आणि अमेरिकेच्या बाजारांकडून संकेत मिळण्याची शक्यता आहे. अमेरिकेत शुक्रवारी बेरोजगारीची आकडेवारी जाहीर होईल. बाजाराचे त्याकडे लक्ष राहील. देशातील आघाडीवर या आठवड्यात काही विशेष घडामोडी नाहीत. त्यामुळे गुरुवारी चढ-उताराच्या हिंदोळ्यात बाजारात काही प्रमाणात तेजी दिसून येईल. शुक्रवारी नरमाईसह एकतर्फी हालचाल दिसून येईल. वर्षअखेर लक्षात घेता फंड आपल्या गुंतवणूक पोर्टफोलिओची रचना नव्याने करताना दिसून येतील. त्यांच्याकडून काही प्रमाणात खरेदी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारात काही सतर्कतेसह काही प्रमाणात सकारात्मक वातावरण राहण्याची शक्यता आहे.
तांत्रिकदृष्ट्या बँक निफ्टी पुन्हा एकदा सकारात्मक संकेत देत आहे. त्याला वरच्या दिशेने 11,451 या पातळीवर अर्थपूर्ण अडथळा होण्याची शक्यता आहे. यावर बारकाईने नजर ठेवावी. चांगल्या व्हॉल्युमसह बँक निफ्टीने हा स्तर पार केल्यास बँक निफ्टीत चांगली तेजी दिसण्याची शक्यता आहे. असे झाले तर त्याला पहिला अडथळा 11,580 वर होईल. त्यानंतर लवकरच त्याला 11,622 वर दुसरा अडथळा होईल. मात्र, 11,283च्या खाली बंद झाल्यास बँक निफ्टीत आणखी घसरण होऊ शकते. ही घसरण त्याला 11,048 पर्यंत खाली खेचू शकते. निफ्टीच्या बाबत सांगायचे झाले, तर निफ्टी मर्यादित कक्षेत राहण्याची शक्यता आहे. वरच्या दिशेने 6312 वर अडथळा, तर 6232 वर आधार आहे. दोन्ही बाजूंनी निफ्टी कोणत्याही दिशेने या स्तराच्या बाहेर पडल्यास शॉर्ट टर्म कल निश्चितीसाठी ते पूरक ठरणार आहे. निफ्टी खाली येण्याची शक्यता कमी आहे. मात्र, बाजारातील कलाच्या बाबतीत या दोन्ही पातळ्यांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
शेअर्सच्या बाबतीत या आठवड्यात इन्फोसिस लिमिटेड, आयडीएफसी लिमिटेड आणि एबीबी लिमिटेड हे समभाग चार्टवर उत्तम दिसताहेत. इन्फोसिसचा मागील बंद भाव 3421 रुपये आहे. त्याचे पुढील टार्गेट 3522 रुपये आणि स्टॉप लॉस 3421 रुपये आहे. आयडीएफसीचा मागील बंद भाव 106.50 रुपये आहे. त्याचे पुढील लक्ष्य 111 रुपये आणि स्टॉप लॉस 101 रुपये आहे, तर एबीबी इंडियाचा मागील बंद भाव 678.25 रुपये आहे. त्याचे पुढील टार्गेट 687 रुपये आणि स्टॉप लॉस 667 रुपये आहे.
- लेखक टेक्निकल अ‍ॅनालिस्ट आणि
moneyvistas.comचे सीईओ आहेत.