आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंदीमुळे निर्यातीला सूर गवसेना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली । पाश्चिमात्य बाजारपेठांमधील वाढत्या आर्थिक अनिश्चिततेच्या वातावरणाचा देशाच्या निर्यातीला वारंवार फटका बसला आहे. जून महिन्यात सलग दुस-यांना निर्यात 5.45 टक्क्यांनी घटून ती वार्षिक आधारावर 25 अब्ज डॉलर्सवर गेली आहे. निर्यातीबरोबरच आयात देखील यंदाच्या जूनमध्ये 13.46 टक्क्यांनी लक्षणीय घसरून 35.37 अब्ज डॉलर्सवर आली आहे. परिणामी व्यापार तूट 10.3 अब्ज डॉलर्स नोंद झाली आहे. अगोदरच्या वर्षी याच कालावधीतीच्या तुलनेत ही निर्यात घसरण 40.8 अब्ज डॉलर इतकी आहे.
वाणिज्य मंत्रालयाने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून या तिमाही कालावधीत निर्यात 1.7 टक्क्यांनी घसरून 75.2 अब्ज डॉलरवर आली आहे. अगोदरच्या वर्षात याच कालावधीत ही निर्यात 76.5 अब्ज डॉलर्सची झाली होती. परंतु तो ग्राफ यंदा कायम राहू शकला नाही. त्यात घसरण दिसून आली. आयातही याच कालावधीत 6.10 टक्क्यांनी घसरून ती अगोदरच्या आर्थिक वर्षातल्या 122.74 अब्ज डॉलर्सवरून 115.25 अब्ज डॉलर्सवर आली आहे. परिणामी तिमाहीत व्यापार तूट 40 अब्ज डॉलर्स नोंद झाली आहे.
जागतिक आर्थिक मंदीमुळे जगभरातील व्यापारात लक्षणीय घट झाली असून त्याचा परिणाम देशाच्या निर्यातीवर झाला असल्याचे वाणिज्य सचिव एस. आर. राव यांनी सांगितले. अनेक देशांत आर्थिक आघाडीवर संमीश्र वातावरण असल्याने त्याचा परिणाम निर्यातीवर दिसून येत आहे. हा परिणाम आणखी काही दिवस असाच कायम राहण्याचा विश्लेषकांचा अंदाज आहे. तेल आणि बिगर तेल आयात देखील जून महिन्यात अनुक्रमे 4.43 टक्के आणि 17.80 टक्क्यांनी घसरून ती अनुक्रमे 12.68 अब्ज डॉलर्स आणि 22.68 अब्ज डॉलर्सची झाली आहे. एप्रिल ते जून या तिमाहीतील तेल आयात 5.48 टक्क्यांनी वाढून ती 39.42 अब्ज डॉलर्सवरून 41.58 अब्ज डॉलर्सवर गेली आहे. बिगर तेल आयात 11.57 टक्क्यांनी घसरून 73.67 अब्ज डॉलर्सवर आली.