आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणीत घट: आयातीचा इलेक्ट्रिकल उद्योगाला शॉक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मंदावलेली मागणी, वाढती आयात आणि प्रकल्प अंमलबजावणीला झालेला विलंब याचा मोठा फटका विद्युत उपकरणांचे उत्पादन करणार्‍या कंपन्यांना बसला आहे. याचा परिणाम म्हणजे विद्युत उपकरण उद्योगाने गेल्या दहा वर्षांत पहिल्यांदाच आठ टक्के नकारात्मक वाढीची नोंद केली आहे.
सुमारे 25 अब्ज डॉलरची उलाढाल असलेल्या इलेक्ट्रिकल उपकरण उद्योगाने 2011 - 12 या वर्षात 6.6 टक्के वाढ नोंदवली होती. सरकारी क्षेत्रातील पारेषण आणि वितरण कंपन्यांकडून प्रकल्प अंमलबजावणीला झालेला विलंब आणि आर्थिक मंदी यामुळे कर्ज पुरवठ्यात अडचणी येत आहेत. परिणामी या क्षेत्रासमोर आव्हानात्मक वातावरण निर्माण झाले असल्याचे ‘इंडियन इलेक्ट्रिकल अ‍ॅँड इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन’ (इमा) या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या वार्षिक माहिती अहवालात म्हटले आहे. मागणीत झालेली घट, आयातीचा वाढता भार आणि अनुकूल सुधारणात्मक उपाययोजनांचा अभाव यामुळे या क्षेत्राने दहा वर्षांत पहिल्यांदाच आठ टक्के नकारात्मक वाढ साध्य केल्याचे ‘इमा’चे अध्यक्ष जे.जी. कुलकर्णी यांनी सांगितले. आर्थिक वाढीसाठी सक्षम वीजपुरवठा हा मुख्य घटक असल्याकडे लक्ष वेधतानाच कुलकर्णी यांनी वाढत्या आयातीपासून या क्षेत्राला संरक्षण द्यावे, अशी विनंती केली आहे.

चीन, कोरिया, आफ्रिकेची डोकेदुखी
चीन, दक्षिण कोरिया, आफ्रिकेतून इलेक्ट्रिकल उपकरणांची वाढती आयात देशातील कंपन्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे. गेल्या आर्थिक वर्षात इलेक्ट्रिकल उपकरणांची आयात 20 टक्क्यांपेक्षा जास्त वाढली असून उत्पादनाला फटका बसला आहे. आफ्रिका आणि अन्य देशांमधील मागणीमुळे आयात वाढली आहे.