मुंबई - औद्योगिक उत्पादनात वाढ, महागाईत झालेली घट यानंतर आता निर्यात चक्र देखील गतिमान झाले आहे. जून महिन्यात सलग दुस-या महिन्यात निर्यात 10.22 टक्के अशी दोन अंकी वाढ साध्य करून 26.47 अब्ज डॉलरवर गेली आहे. अगोदरच्या वर्षात याच कालावधीत 24.02 अब्ज डॉलरची निर्यात झाली होती. परंतु सोन्याच्या निर्यातीमुळे मात्र व्यापार तूट 11.76 अब्ज डॉलरपर्यंत वाढली आहे.
एप्रिल ते जून या कालावधीतील निर्यातीमध्ये देखील 9.31 टक्क्यांनी वाढ होऊन ती 80.11 अब्ज डॉलरवर गेली आहे. परंतु मे महिन्याच्या तुलनेत आढावा कालावधीत कमी झाली आहे. कारण मे महिन्यात त्यात 12.4 टक्क्यांनी वाढ झाली होती. व्यापार तूट जूनमध्ये वाढली असून ती मे महिन्यातील 11.23 अब्ज डॉलरवरून 11.28 अब्ज डॉलरवर गेली आहे. गेल्या वर्षाच्या ऑक्टोबरपासून नकारात्मक वाढीची नोंद केल्यानंतर जून महिन्यात सोन्याची आयात लक्षणीय 65.13 टक्क्यांनी वाढून ती अगोदरच्या वर्षातल्या याच कालावधीतील 1.88 वरून 3.12 अब्ज डॉलरवर गेली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सोने आयात 1.3 अब्ज डॉलर (62.5 टक्के वाढ) होती. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार जूनमधील आयात वार्षिक आधारावर 8.33 टक्क्यांनी वाढून 38.24 अब्ज डॉलरवर गेली आहे. सेवा निर्यातीची आकडेवारीदेखील पहिल्यांदाच जाहीर झाली असून ती मे मध्ये 13.9 अब्ज डॉलरवर गेली आहे.
आयात क्षेत्रात पोषक घट
वनस्पती तेल 21.3 %
कोळसा 5.5 %
रासायने 18.78 %
लोह आणि पोलाद 18.24 %
इलेक्ट्रॉनिक वस्तू 8 %
मौल्यवान खडे 2.2 %
चांदी 53.3 %
प्रकल्प वस्तू 40.39 %
वाहतूक उपकरणे 10.86 %
यंत्र उपकरणे 7.39 %
कापूस 45.34 %
नकारात्मक वाढीचे निर्यात क्षेत्र
चहा 13.78 %
कॉफी 8.75 %
लोह खनिज 66 %
इलेक्ट्रॉनिक वस्तू 24.5 %
जागतिक मागणीत सुधारणा झाल्यामुळे निर्यातीला दोन अंकी वाढ नोंदवता आली. प्रगत तसेच उगवत्या बाजारपेठांमधील मागणीत सुधारणा होत असल्याने हा कल असाच कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षात निर्यात अधिक चांगल्या प्रमाणात होण्याची अपेक्षा आहे. रफिक अहमद, अध्यक्ष, एफआयईओ